मुख्य सामग्रीवर वगळा

15 दिवस माझे आणि...

मला पंधरा दिवस बाहेरगावी जाण्याची वेळ आली.

बायको म्हणाली, “पोराला घेऊन मी नाही घरी एकटी राहणार; एक तर तो माझं ऐकत नाही. खूप त्रास देतो. सारखा ओरडतोे.”

“मग जुन्या घरी जा!” असं मी म्हटल्याबरोबर बायकोने जे भांडणाचा सुर सुरू केला की, माझाही तिच्याबरोबर सुर जुळून गेला. अखेर भांडण घराच्या कामावर येऊन ठेपले.

“तुम्ही घरकाम एकदा करून बघा; मग तेव्हा कळेल की किती दमछाक होते ते!” - बायको

यावर मी ते चॅलेंज स्वीकारले, “ठरलं तर मग मी गावाहून शनिवारी घरी येणार आहे. तूपण माहेरी जा आणि डायरेक्ट सोमवारी ये. मी रविवारी अख्खा दिवस घरीच थांबेल. घरातील बाकीचे कामे, दोन वेळची भांडी, स्वयंपाक या सर्व गोष्टी पूर्ण करून रात्री आपण फोनवर चर्चा करू.” असे आमच्या दोघांमध्ये पक्के झाले.



बायकोला दुसर्‍या दिवशी गाडीत बसवून माहेरी रवाना केले. मीही त्याच रात्री कामासाठी बाहेर गावी निघून गेलो.


ती माहेरी अन मी गावी असतांनाच्या काळात नेहमीप्रमाणे फोनवर बोलताना तावा-तावात भांडायचे काही कमी केले नाही. तोपर्यंत मी ‘रविवारचे घर सांभाळायचे’ बाशिंग बांधून घेतले; आणि हिने ‘बघू कसा करतो ते!’ म्हणून बांगड्या वर केल्या.



अखेर मी शनिवारी रात्री थकून भागून घरापाशी आलो; कुलूप उघडता उघडता मेसेज आला. बघितला तर ‘उद्याचे लक्षात आहे ना!’ हे वाचून धाडकन दरवाजा उघडला. बॅग फेकली, कपडे काढले, वचावचा तोंड-हात-पाय धुतले, अंथरून टाकून झोपी गेलो.


रात्री मेसेज वाचून डोक्यात तिडीक गेली होती. बाथरूममधला नळ चालू ठेवून मी झोपी गेलो होतो. पाण्याच्या आवाजाने भर्रकन उठलो तसा बाथरूमकडे पळालो. 


टाकी, हंडे, पंचपात्री, पिण्याचे पाणी, वापरायचे पाणी काहीच नव्हते. पहिले ते काम केले. लगेच पेपर आणि दूध आणण्यासाठी बाहेर पडलो. तिकडून आल्यावर स्वतःची शुद्धी करून घेतली आणि मग देवपूजा केली.


ठरल्याप्रमाणे मी ‘पण’ केला होता ‘घरीच राहायचे. बाहेरून काहीही मागवायचे नाही. घरी तयार करून खायचे.’ तसा स्वयंपाक खोलीत घुसलो. यूट्यूब चालू केले. एखाद-दोन रेसिपी डाऊनलोड केली. त्याप्रमाणे साहित्य घेऊन तीन पदार्थ तयार केले आणि पहिला फोटो हिला पाठवला.


जेवण होता होता मी मोबाईलकडे बघत होतो पण त्यावर बाईसाहेबांनी काहीच रिप्लाय दिला नाही. जेवण झाल्यावर भांडी धुतली त्याचा फोटो पाठवला, कपडे धुतले त्याचा फोटो, घर झाडले-पुसले फोटो टाकला, पाणी भरून ठेवले फोटो पाठवला. मग दुपारचे जेवण, भांडी धुतली. पुन्हा आवरासावर. पुन्हा रात्रीचे जेवण, भांडी धुतली. पुन्हा आवरासावर करून अखेर अंथरुणाकडे वळालो.


कंबर धरून कसेबसे गादीवर पहुडलो. मनात विचार आला की, आपलं बैठं कामच बरं. उगाचच या भांडणात पडलो नि भांडे घासावे लागले. एका दिवसात कंबर क्लीन बोल्ड झाली. पण... नाही... आपला स्वाभिमान गमवायचा नाही! हार मानायची नाही! म्हणून पुन्हा रिप्लाय पाहिला मॅडमनी कुठलीही कमेंट दिली नव्हती.


या बाईला काय म्हणावं कुठल्या जाड कातडीची आहे. अजिबात दयामाया नाही. एक साधा रिप्लायसुद्धा नाही.


मग मीच स्वतःशी पुटपुटलो “तू रिप्लाय दे अथवा देऊ नकोस आपण पैज जिंकली. तोपर्यंत आपण युट्युब बघू.”


संसारातून मुक्तीकडे क्लिप बघता बघता अचानक संडास लागली. धावपळीत क्लिप चालूच ठेवून पटकन संडासाकडे पळालो.गालावर हात ठेवून डोळे किलकिले करून त्या बाबांचे प्रवचन ऐकत होतो. अख्ख्या घरात बाबांचा आवाज घुमत होतो. तेवढ्यात फोन वाजला.


फोडणीला मिरची जरा जास्तच झाली होती. खालून चांगलाच धूर झाला होता. मी आपला वाकतच बाहेर पडलो. नरम गादीवर माझी दुसरी गादी ठेवून. ‘आई गं...’ असा आवाज काढत फोन हातात धरला. हिचा फोन बघून परत आपला स्वाभिमान जागा झाला. दिवसभर एवढा राबलो हे कोणी सांगायचं... अर्थातच आपण... म्हणून अगदी चेहेर्‍यावर उत्साह आणून बायकोला फोन केला. बाईने फोन उचलला, ‘हॅलोऽऽऽ’


डरकाळी फोडणारा आवाज अगदी मनीमाऊ सारखा आल्याने. “काय मॅडम... करून दाखवलं की नाही...!”

हिने बोलण्याला सुरुवातच करतांना पूर्वीच्याच तोर्‍यात मोठ्या आवाजामध्ये उलट तपासणी सुरू केली. गॅस पुसुन ठेवला का?, दूध तापवून त्यावर झाकण ठेवले का?, दरवाजे लावले का?, नळ बंद केले का?, फ्रिजचा दरवाजा व्यवस्थित लावला का? वगैरे-वगैरे विचारायला सुरुवात केली.


मी आयटीत “तू जसं घर ठेवते अगदी तसंच टापटीप ठेवले हो...! नाव ठेवायला जागा ठेवली नाही. उद्या येऊन बघ घर कसे चकाचक ठेवले. तुला फोटोसुद्धा पाठवले आणि तू एकही रिप्लाय नाही दिलास.”

बराच वेळ झाला. तिकडून काही आवाज नाही. बहुतेक बायकोला चुकल्यासारखे झाले असावे. याला एवढे घालून पाडून बोलले. हा उद्या आपली चांगलीच खरडपट्टी काढेल. असा मी तर्क लावला.


बायको नरमेनच हळूहळू बोलू लागली. माझ्या प्रवासाविषयी बालू लागली. माझी काळजी वाहू लागली. मलाही ते जाणवू लागले की ही नरमली. मला तिचे मन दुखवायचे नव्हते. मला जाणीव होती की, दिवसभर हिच्याही मागे वणवण असते. का कुणास ठाऊक संडासमध्ये बसताना संसारातून मुक्तीकडे हे प्रवचन ऐकल्यामुळे कदाचित माझ्या मनात परिवर्तन झाले असावे.

“अगं तू एवढी शांत झालीस मला जाणवते आहे की, तुझ्या मनात आता काय चालू आहे. अगं तुला आठवते का जुने दिवस. आपण जुनं घर सोडलं. घराबाहेर पडलो. आपला वेगळा संसार थाटला. त्याकाळात माझ्याकडून घरामध्ये वागतांना बर्‍याच चुका व्हायच्या. त्याच्याने तुझा खूप मानसिक त्रास व्हायचा पण त्या चुका मी सुधारून आज जे काही करू शकलो ते तुझ्यामुळेच. त्यात तुझा खूप मोठा रोल आहे.


“अहो... असं काही नाही. तुम्ही खरच घर खूप छान ठेवले आणि व्यवस्थित आवरून ठेवले. मला हे सगळं बघून अपराध्यासारखं वाटत आहे. उगाचच एवढं तुम्हाला करायला सांगितले. मला माफ करा तुम्हाला खूप त्रास झाला.” हिचे बोलणे ऐकून प्रेमळपणाने चौकशी करून आपली चूक मान्य केल्यामुळे मी पुरता पघळून गेलो होतो.


“तुमचे कंबर दुखत असेल ना! होना, उगाचच कशाला चायलेंज करत बसले. नाहीतरी उद्या मलाच करायचंय. त्यात काय एवढं विशेष केलं तुम्ही. एक दिवसाने थोडी गम्मत होणार आहे.


पुढचे बोलणे ऐकल्यावर मी परत मूळ स्वभावात आलो. च्यायला खरंच की कमरेचा पूर्ण पीट्टा पडला. उद्या ड्युटीवरपण जायचे आहे. तिलापण घ्यायला जावे लागेल. नंतर भाजी आणून द्या. तेल आणून द्या, पुन्हा तो ‘आणा’ सुरू होणार, गेलं मेलं घोडं गंगेला न्हालं. “अगदी बरोबर बोललीस. उद्यापासून तुलाच करायचे आहे. तर येण्याची कृपा करा आणि आपल्या जबाबदार्‍या घ्या.” असं म्हटल्याबरोबर बायकोपण पूर्वपदावर पोहचल्या “मला वाटलेच होते तुमचे हे गुगलीसारखे बोलणे आणि नाटकं. पूर्वीपासून बघतच आले होते. तुम्ही काही साधेभोळे नाही.... .... .... ...”

अखेर हे भांडण पुन्हा विकोपाला गेले. आम्ही दोघे संसारातून मुक्तीकडे नक्कीच गेलो नाही पण संसारात मात्र परत आलो. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या गाडीच्या स्टीयरिंगवर कोणालाही बसू देणार नाही.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचतो न पोहोचतो काही शासकीय अधिकारी आणि प्रेसमधील मला ओळखणार्‍यांपैकी “तुम्ही इथे!; मग रावसाहेबांबरोबर ते दोघे कोण होते?” असं विचारायला सुरुवात केली. ते काय बोलत होते मला काही समजले नाही. पण इतके सारे लोकं जमल्याने रावसाहेबाविषयी नक्की वाईट बातमी होती. हे नक्की. त्यातील एका मित्राने माझा हात धरून बाजूला नेले. वॉर्ड नंबर सांगून ‘तिथे जा आणि ते दोघे कोण आहेत ते बघ’ असे सांगून पाठवत होता. त्याचा हात झटकत “रावसाहेब कुठे आहे?” मी रागावून प्रश्न केला. “ते...ते.. पोस्टमार्टम रूम मध्ये आहे.” क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि तेथून निघालो. जाता जाता त्याने ‘रावसाहेबांबरोबर तू आणि अण्णा आहेत असे सगळ्यांना वाटले म्हणून त्यांनी तुला आल्या आल्या असे विचारले.’ असं सांगत होता. वार्डात जाऊन नर्सना रावसाहेबाबरोबर अजून दोन व्यक्ती कुठे ऍडमिट आहेत म्हणून विचारले. नर्सने रजिस्टर बघता बघता “ते दोघे नाहीत तिघे आहेत. एक आयसीयूमध्ये ऍडमिट आहे आणि...” बेडकडे बोट करून “ते दोघे तिथे आहेत.” डोळ्यावर, डोक्यावर पट्टी केलेली, हात गळ्यात बांधलेला, सलाईन लावलेली अशा अवस्थेत ते दोघे पडलेले दिसले. कद...

वैष्णव देवींचा प्रवास भाग 1

“अंकल कुछ लेलो ना!” त्या चिमुकलीने तीन-चार स्वेटरचे पॅकिंग दाखवत विचारले. “अगं हे मुलींचे आहे. हे माझ्या काय कामाचे” त्यातलं एक स्वेटर हातात घेऊन बोललो. “अरे ती हिंदीत बोलत आहे. तुझी मराठी समजेल का तिला.” भाऊ हसतच म्हणाला. “मुझे मराठी समझ मे आती है. अंकल, आण्टी के लिए ले लो ना!” खूप आग्रह करत तिने केविलवाणे तोंड केले. “इसकी अभी तक शादी नही हुई है । शादी होने के बाद ले लेंगे !” खवचटपणे रावसाहेब बोलला. थोडा हशा पिकला. “अहो, असं का त्यांना चिडवता! उगीचच आपलं काही तरी” रावसाहेबांची बायको त्याला दटावत बोलल्या. अंकल काही घेणार नाही म्हणून ती पुढे निघून गेली. तेवढ्यात माझा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. “मी बोलतेय. हा माझ्या भावाचा नंबर आहे. तुम्हाला वेळ आहे का?” हा तिचाच फोन होता. घाईघाईने दरवाजाजवळ जाऊन बोलायला लागलो. “माझी तयारी आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना!” तिने हे बोलताच. “अरे वा... थँक्यू थँक्यू” म्हणत जागेवर उडी मारली. माझ्यामागे भाऊ कधी येऊन उभा राहिला समजले नाही. तो अगदी दबक्या आवाजात “अरे अशा वेळी थँक्यू थँक्यू म्हणायचे का?” असे म्हणत त्याने कपाळावर हात मारला. आणि “चालू दे......