मुख्य सामग्रीवर वगळा

माझ्या गाडीच्या स्टीयरिंगवर कोणालाही बसू देणार नाही.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचतो न पोहोचतो काही शासकीय अधिकारी आणि प्रेसमधील मला ओळखणार्‍यांपैकी “तुम्ही इथे!; मग रावसाहेबांबरोबर ते दोघे कोण होते?” असं विचारायला सुरुवात केली.


ते काय बोलत होते मला काही समजले नाही. पण इतके सारे लोकं जमल्याने रावसाहेबाविषयी नक्की वाईट बातमी होती. हे नक्की.

त्यातील एका मित्राने माझा हात धरून बाजूला नेले. वॉर्ड नंबर सांगून ‘तिथे जा आणि ते दोघे कोण आहेत ते बघ’ असे सांगून पाठवत होता. त्याचा हात झटकत “रावसाहेब कुठे आहे?” मी रागावून प्रश्न केला.


“ते...ते.. पोस्टमार्टम रूम मध्ये आहे.”


क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि तेथून निघालो. जाता जाता त्याने ‘रावसाहेबांबरोबर तू आणि अण्णा आहेत असे सगळ्यांना वाटले म्हणून त्यांनी तुला आल्या आल्या असे विचारले.’ असं सांगत होता.


वार्डात जाऊन नर्सना रावसाहेबाबरोबर अजून दोन व्यक्ती कुठे ऍडमिट आहेत म्हणून विचारले. नर्सने रजिस्टर बघता बघता “ते दोघे नाहीत तिघे आहेत. एक आयसीयूमध्ये ऍडमिट आहे आणि...” बेडकडे बोट करून “ते दोघे तिथे आहेत.”


डोळ्यावर, डोक्यावर पट्टी केलेली, हात गळ्यात बांधलेला, सलाईन लावलेली अशा अवस्थेत ते दोघे पडलेले दिसले. कदाचित मी बोलत असताना त्यांनी ऐकलं असावं म्हणून ते दोघेही सावध झाले असावे.


तुम्ही दोघे कोण आहात? तिसरा कोठे आहे? तुम्ही रावसाहेबाला कधीपासून ओळखता? असे भराभर विचारायला सुरुवात केली.


“तुम्ही... भाऊ का?” एक जण उत्तरला


“त्याच्याशी तुला काय करायचंय?” मी दोघांशी रागावूनच बोलत होतो. कारण त्यांच्यामुळे माझा मित्र गेला होता.


“गाडीमध्ये ते तुमचाच म्हणजे तुमचा आणि अण्णांच्या विषयीच बोलत होते.”


“रावसाहेब कसा गेला बोल? मला बाकीचं काही सांगू नको.” मी पुन्हा संतापलो. असं वाटत होतं की, त्यांच्या कानाखाली सनासन वाजवावी. “अरे तुमच्यापायी मी मित्र गमावून बसलो रे... तुम्हाला काही कळतं का तुम्ही काय केलं ते.”


“भाऊ, मला माफ करा... माफ करा... ते मला गाडी चालवायला नाही म्हणत होते. पण मी त्यांची खूप इज्जत करतो. त्यांच्यामुळे मला कुठे पैसा दिसायला लागला होता. म्हणून मीच आग्रह करून गाडी चालवायला बसलो होतो. आम्ही गाडीमध्ये ड्रिंक करत होतो. ते पॅक भरत होते. आमचा खूप मस्त प्रवास चालू होता. रावसाहेबांना ड्रिंक जास्त झाली होती. आम्ही त्यांना ड्रिंक घेऊ नका म्हणून सांगत होतो. ते पॅक वर पॅक घेत असताना तुमचा आणि अण्णांचा विषय काढत रडत होते. आम्ही तिघे ऐकत होतो. ते बोलले की, ‘मी कितीही जरी पिलो तरी माझ्या गाडीच्या स्टीयरिंगवर कोणालाही बसू देत नाही.’ असं म्हणत असतानाच आमच्या गाडी पुढे स्पीड ब्रेकर आला. रस्त्याच्या एका बाजूने एक ट्रक उभा होता आणि मी गाडी कंट्रोल करू शकलो नाही. गाडी खूप स्पीडने ट्रकवर जाऊन आदळली. रावसाहेब गाडीची काच फोडून ट्रकवर आदळले आणि पुढे काय झाले मला काहीच आठवत नाही. मला माफ करा भाऊ मी चुकलो. जर त्यांचे ऐकले असते तर असे झाले नसते.”


तो माझ्या पुढे हात झोडून, रडून, गागून, दयेची याचना करत होता. त्या नालायकांना बघून अजिबात गयावया येत नव्हती. “साल्यांनो त्याच्या जागी तुम्ही मरायला पाहिजे होता.” असं बोलून मागे फिरलो तर वॉर्डातील पेशंट, नर्स आणि पोलीस अधिकारी शांतपणे आमचे बोलणे ऐकत होते.


“थँक्यू भाऊ! तुमच्यामुळे स्टेटमेंट मिळाले. हरामखोर साले. जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तेव्हा बेशुद्ध पडलेलेे होते. त्यात भरपूर पिले होते. त्यामुळे स्टेटमेंट घेता येत नव्हते.” माझ्या खांद्यावर थोपटत पोलीस अधिकारी साहेब बोलत होते. त्यांना नमस्कार करून काहीच न बोलता वॉर्डरूम मधून निघालो.


रावसाहेबाचा हा निरोप घेऊन त्यांच्या घरी कोण जाईल म्हणून मला व डॉक्टर साबळे सांगितले. डॉक्टरांच्या गाडीत बसत असताना त्यांनी रावसाहेबाबद्दल असे प्रकार एक नाही दोन-तीन वेळेस झाल्याचे सांगितले. डॉक्टरांचे एकीकडे फोन वाजत होते. एकीकडे माझ्याशी बोलत होते.


पण माझ लक्ष त्या मुंबई-नाशिकच्या हायवेवर मी आणि रावसाहेब रात्रीचा प्रवास करत होतो. मी पॅक भरत होतो. रावसाहेब गाडी चालवत होता. रस्त्यावर गर्दी नव्हती म्हणून त्याने गाडी जोरात काढली होती. मी बर्‍यापैकी शुद्धीत होतो. रावसाहेबाला मात्र चढली होती. मी त्याला चेष्टेत म्हंटले “तुला चढली आहे. मी गाडी चालवतो. तू इकडे बस.”


मला चिडवण्या करता तो मुद्दाम दुतर्फाजवळ गाडी घेऊन जायचा. मी त्याच्यावर ओरडायचो. त्याला कुणी उपदेशाचे डोस पाजले की, त्याचा संताप व्हायचा. हे मला माहीत होते आणि माझे बोलणे त्याला कधीच पटत नव्हते.


रावसाहेबाने एका सुनसान ठिकाणी गाडी थांबवली. हालत-डुलत गाडीच्या बाहेर पडला. झाडा-झुडपात जाऊन मोकळा होऊन आला. गाडीच्या टपावर एक हात ठेवून माझ्या खिडकीच्या बाजूने येऊन खाली वाकला दुसर्‍या हाताने बोटांच्या अ‍ॅक्शन करत “तुझ्यासारखा भित्रा मित्र तूच. तुझी बैठक इथे नको चालवू. माझा माझ्यावर पूर्ण कंट्रोल आहे. आत्तापर्यंत माझ्या आयुष्याचे सर्व डिसिजन मी घेतले. घाबरू नकोस तुला मी सही सलामत तुझ्या घरी पोहोचवेल. अरे आयुष्याची मजा घे. खा-पी मस्त एन्जॉय कर. तुझे उपदेशाचे डोस मला नको पाजू. मी बघ.” रावसाहेब छातीवर हात ठोकत “एकट्याच्या दमावर कमावलं.” माझ्याकडे हात करत “आला मोठा शहाणा...”


पुन्हा हालत-डुलत ड्रायव्हर साईडचा दरवाजा उघडला. अंग ड्रायव्हर सीटवर झोकून “माझा ग्लास भर. अजून भरपूर रस्ता कापायचा आहे.” माझा गाल स्वतःकडे ओढला “मी कितीजरी पिलो असलो तरी माझ्या गाडीच्या स्टीयरिंगवर कोणालाही बसू देणार नाही.”


मी पॅक भरत “तुझ्या अशा गोष्टींमुळे अण्णा आपल्यामध्ये जास्त राहत नाही.”

“ये गप... त्याच्या स्वभावामुळे तो आपल्यामध्ये राहत नाही. आपण नाही सोडलं त्याला.” रावसाहेब चिडला.

“तुला चढली आहे.” मी

“मला अजून चढायची आहे. तू आता रंगाचा बेरंग करू नकोस. ग्लास भर” रावसाहेब



“अरे तुला पाणी हवं आहे का?” डॉक्टरांनी मांडी हलवत मला विचारले.

“हं... हो... हो...” मी डॉक्टरांच्या हातून पाण्याची बाटली घेतली तशी तोंडाला लावली.

डॉ. साबळेंनी माझ्याकडे बघून “रावसाहेबाचा विचार करतोय का? असं व्हायला नव्हतं पाहिजे. पण काय करणार. त्याचं पिण्याचे प्रमाण वाढले होते.”


“त्याची गाडी...” मी हळूच बोललो.

“बहुतेक गाडी स्पॉटवरच आहे. एवढं मात्र समजलं की गाडीचा पुढचा भाग पूर्ण चेपला आहे.” डॉक्टर


थोड्या वेळाने रावसाहेबांच्या बंगल्यावर पोहचलो. आम्हाला पाहिल्यावर विचारपूस सुरू झाली आणि एकच हंबरडा अख्या घरात फुटला. काही तासाने अ‍ॅम्बुलन्स दारापुढे उभी राहिली. मी गाडीच्या काचेतून वाकून रावसाहेबाला बघत होतो. आणि रावसाहेब आत शांत झोपला होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

15 दिवस माझे आणि...

मला पंधरा दिवस बाहेरगावी जाण्याची वेळ आली. बायको म्हणाली, “पोराला घेऊन मी नाही घरी एकटी राहणार; एक तर तो माझं ऐकत नाही. खूप त्रास देतो. सारखा ओरडतोे.” “मग जुन्या घरी जा!” असं मी म्हटल्याबरोबर बायकोने जे भांडणाचा सुर सुरू केला की, माझाही तिच्याबरोबर सुर जुळून गेला. अखेर भांडण घराच्या कामावर येऊन ठेपले. “तुम्ही घरकाम एकदा करून बघा; मग तेव्हा कळेल की किती दमछाक होते ते!” - बायको यावर मी ते चॅलेंज स्वीकारले, “ठरलं तर मग मी गावाहून शनिवारी घरी येणार आहे. तूपण माहेरी जा आणि डायरेक्ट सोमवारी ये. मी रविवारी अख्खा दिवस घरीच थांबेल. घरातील बाकीचे कामे, दोन वेळची भांडी, स्वयंपाक या सर्व गोष्टी पूर्ण करून रात्री आपण फोनवर चर्चा करू.” असे आमच्या दोघांमध्ये पक्के झाले. बायकोला दुसर्‍या दिवशी गाडीत बसवून माहेरी रवाना केले. मीही त्याच रात्री कामासाठी बाहेर गावी निघून गेलो. ती माहेरी अन मी गावी असतांनाच्या काळात नेहमीप्रमाणे फोनवर बोलताना तावा-तावात भांडायचे काही कमी केले नाही. तोपर्यंत मी ‘रविवारचे घर सांभाळायचे’ बाशिंग बांधून घेतले; आणि हिने ‘बघू कसा करतो ते!’ म्हणून बांगड्या वर केल्या. अखेर मी शनिवा...

वैष्णव देवींचा प्रवास भाग 1

“अंकल कुछ लेलो ना!” त्या चिमुकलीने तीन-चार स्वेटरचे पॅकिंग दाखवत विचारले. “अगं हे मुलींचे आहे. हे माझ्या काय कामाचे” त्यातलं एक स्वेटर हातात घेऊन बोललो. “अरे ती हिंदीत बोलत आहे. तुझी मराठी समजेल का तिला.” भाऊ हसतच म्हणाला. “मुझे मराठी समझ मे आती है. अंकल, आण्टी के लिए ले लो ना!” खूप आग्रह करत तिने केविलवाणे तोंड केले. “इसकी अभी तक शादी नही हुई है । शादी होने के बाद ले लेंगे !” खवचटपणे रावसाहेब बोलला. थोडा हशा पिकला. “अहो, असं का त्यांना चिडवता! उगीचच आपलं काही तरी” रावसाहेबांची बायको त्याला दटावत बोलल्या. अंकल काही घेणार नाही म्हणून ती पुढे निघून गेली. तेवढ्यात माझा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. “मी बोलतेय. हा माझ्या भावाचा नंबर आहे. तुम्हाला वेळ आहे का?” हा तिचाच फोन होता. घाईघाईने दरवाजाजवळ जाऊन बोलायला लागलो. “माझी तयारी आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना!” तिने हे बोलताच. “अरे वा... थँक्यू थँक्यू” म्हणत जागेवर उडी मारली. माझ्यामागे भाऊ कधी येऊन उभा राहिला समजले नाही. तो अगदी दबक्या आवाजात “अरे अशा वेळी थँक्यू थँक्यू म्हणायचे का?” असे म्हणत त्याने कपाळावर हात मारला. आणि “चालू दे......