असेच एका रात्री मी आणि अण्णा फेरफटका मारण्यासाठी गंगेवर निघालो. कुठे जावं ? म्हणून रामवाडी पुलामार्गे जाण्यास निघालो. आमच्या शेजारून गोदावरीचे पाणी संथ गतीने वाहत होते. पाय वाटेवर लोकांची वर्दळ तशी कमी होती. बारमध्ये जसे मिणमिणते दिवे असते तसे महापालिकेच्या दिव्यांचा प्रकाश पडलेला होता. रात्र किररं करत होती. नदी काठचे बेडकं गळा फुगवत बोंबा ठोकीत होती. पुलावरून एखाददोन गाड्यांचे आवाज येत होते. वार्याचा पत्ताच नव्हता आणि आम्ही दोन भुतं त्या रस्त्याने मस्त गप्पा मारत चाललो होतो. अधनं-मधनं एखाददोन डोकी दिसली नंतर कुत्रे सोडून कुणी एक दिसत नव्हतं. रामवाडी पुलापर्यंत पोहचलो. आमच्या गप्पा रंगत किती वेळ झाला याचे भान दोघांना नव्हते.
मी आणि अण्णा परतीला पायी चालायला सुरूवात केली. गंमतीदार विषय चालु असतांना आण्णाचे लक्ष नदीकाठच्या कठड्यावर गेले आणि त्या दिशेला तो भरभर चालून कठड्यावरील ती चमकलेली वस्तु घेतली. मी आपला कुतुहलाने पुढे सरकलो. पाहिलं तर अण्णाला चष्मा सापडला होता.
अण्णाचे पुढचे प्लॅन सुरू झाले. ‘‘चला... आणखी एक फ्रेम झाली, पुढील दोन वर्षे काही टेंन्शन नाही. उद्याच जाऊन काच बसवून घेतो. नवीन फ्रेमचा खचर्र् वाचला...’’ असे म्हणून आण्णाने चष्मा खिशात घातला.
अण्णा माझ्याकडे डोळे वटारून ‘‘असा काय बघतोयेस. मला फ्रेम मिळाली. मी उद्या चष्मा करायला टाकणार आहे. का... तुला काही अडचण?’’
‘‘नाही... नाही.. मला काय अडचण आहे.. कर ना..’’ मी उत्तरलो. आमचा गमतीदार विषय राहिला बाजूला मी जरा गंंभीर झालो.
आण्णाने पावित्रा घेतला. ‘‘का रे तुला आवडले नाही का ?’’
‘‘नाही रे..., तसे काही नाही..’’ मी सावरून बोलायला सुरूवात केली. ‘‘हे बघ आण्णा... मला असे वाटते की, तो चष्मा जिथे होता. तिथे नेऊन ठेऊन ये. जा तर बरं...’’ मी थोडा गंभीर आणि गोंधळलेल्या अवस्थेत बोललो.
‘‘हे बघ, मी या फ्रेमला नवीन काचा टाकणारच आहे. तू चल बघू तू तुझ्या पारमार्थिक विषयात मला अडकवू नकोस. तू तेवढाच एक हरिषचंद्र राहीला आहे. ..तू ..तू चल रात्र झालीये आपण उद्या बोलू.’’
झालं आण्णानी चष्मा तर काही ठेवला नाही आणि पुढे काही एैकाला तयार नाही. मी मनातल्या मनात ‘‘जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा’’ असे म्हंटले आणि पुढे सरकलो.
पुढे घर आले. तो त्याचा घरी मी माझ्या घरी.
मध्ये काही दिवस निघून गेले कामानिमित्त आमच्या दोघांची काही भेट झाली नाही. आज मी आपल्या कामाचे बिर्हाड आटोपून टि.व्ही. पाहत बसलो होतो. तेवढ्यात आण्णाचा आवाज आला. ‘‘भाऊऽऽऽ’’
मी आवाज एैकून बाहेर आलो. भाऊने चक्क त्या फ्रेममध्ये काचा टाकून डोळ्यावर चढवलापण होता.
‘‘चल चक्कर मारायला जाऊ’’
मी आपली चप्पल घातली आणि नेहमीच्या अड्ड्यावरून कट्ट्याकडे निघालो. रस्ता नेहमीचाच, तिच किरकिरी रात्रं, भयान शांतता, मंद प्रकाश आणि आम्ही दोन भूतं. चालता चालता मध्ये का भेट झाली नाही म्हणून आम्ही दोघे कारणमिमांसा करत पुढे सरकत होतो.
‘‘भाऊ, मी चष्मा बनवला !’’
‘‘हो.. मी पाहिला. चांगला दिसतो आहेस.’’ मी उत्तरलो.
‘‘हं... थोडा ढिल्ला आहे, पण ठिक आहे. चालवून घेऊ.’’ अण्णाने चष्मा नाकावरून वर करत बोलला.
नदीकाठी एक चक्कर मारून परतत असतांना आम्ही योगायोगाने ज्या ठिकाणाहून आण्णाने चष्मा उचलला होता. अगदी तिथेच उभे होतो. तोच अण्णाने कुठे पाहीलं आणि आण्णा जाम ओरडला ‘‘भाऊ...भाऊ..!’’ त्याच्या बरोबर मी पण ‘‘अरे आण्णा... आण्णा.. स...स... साप’’ आण्णाच्या तोंडातुन हे शब्द एैकल्यावर मी पण खाली बघत उड्या मारत होतो. साप नक्की कुठून आला आणि कुठे जाणार हे कळलं नाही म्हणून आम्ही दोघेही एकमेकांना धरत सावरत पुन्हा उभे राहीलो. दोघांच्या अंगाचे थरकाप होत होते. जवळपास आमचा डान्स पाहण्यासाठी कुणीही नव्हतं. हे आमचं नशीब. मी श्वास टाकला नी तिथूनच तो साप जातांना आम्ही दोघांनी पाहिला. आता तो साप होता की नाग परमेश्वरालाच माहित पण भरपूर मोठा होता. तो चक्क आमच्या दोघांच्या मधून गेला. आम्ही दोघांनी उड्या मारून सुध्दा आमचा पाय त्यावर पडला नाही हे विशेष, बरे. आमच्या जीवाला काहीही झाले नाही म्हणून पुृन्हा एकदा धन्यता मानली.
मी सावरलो. पण आण्णा एवढ्या रात्रीचं त्याच जागेवर काय शोधत होता काही समजले नाही. मी विचारलं, ‘‘अरे आण्णा, चल आधी येथून, अरे साप येऊन गेला आता मुंगुस होऊन तू काय शोधत बसलायेस.’’
आण्णा - ‘‘माझा चष्मा’’
आण्णा असे बोलल्यावर मी त्याच्या डोळ्याकडे पाहिले, तर त्याचा चष्मा त्या झटापटीत कुठेतरी पडला. खरेतर साप-साप करत हा ओरडला. तेवढ्यात चष्मा खाली पडला आणि त्याचाच पाय चष्म्यावर पडला. तो कुठेतरी लाथाडला गेला असावा म्हणून ती फे्रम काही मिळत नव्हती. दुसरे म्हणजे चष्मा फुटल्याने त्या अंधारात त्यालाही काही स्पष्ट दिसत नव्हते.
त्याच्याबरोबर मीही शोधायला लागलो.
‘‘भाऊ..., (खालच्या आवाजात) फे्रम सापडली. (शिव्या देत) पण तिच्या आईला तिचा अख्खा सत्यानाश झाला.
....जाऊ देत, चल निघू या.’’ असे म्हणत चिडून त्या फे्रमला पाण्यात भिरकावली. आम्ही तेथून भरभर वर आलो. नेहमीच्या अड्ड्यावर येऊन बसलो. आण्णांनी जेवढ्या शिव्या द्यायच्या होत्या तेवढ्या शिव्या घासाडल्या.
आण्णा शांत झाला. ‘‘मी तुला म्हणत होतो. ज्याची वस्तु आहे तो ती घ्यायला परत येईल केव्हातरी, तर ती अशी गेली. आता कशाला चिडतोस. जी वस्तु आपली नव्हतीच तिच्यावर का हक्क दाखवायचा.’’ मी आपले उपदेशाचे पाढे वाचले.
‘‘तु आता तुझे पारमार्थिक भाषण नको चालु करु. च्याआईला एक तर पैसेही गेले, अन काचाही.’’ आण्णा खूप चिडून बोलला.
आण्णांला कसा बसा शांत केला. तो घरी निघून गेला. मी घराच्या पुढे असलेल्या ओट्यावर बसलो. वरती आकाशात चांदणे बघत झालेला प्रसंग आठवत होतो.
(मी स्वतःशीच बोलत होतो.) विषय छोटा होता, पण बरेच काही सांगून गेेला आणि तोडांत फक्त एकच शब्द आला, ‘प्रारब्ध’.
नेमकं अण्णाच्या बाबतीत हेच झालं. उभ्या आयुष्यात प्रारब्ध बरच काही करायला लावतं, करवून घेतो आणि माणूस नेमकं मनोवासनेतुन, काहीतरी करतो आणि नशिबाला दोष देत जगत असतो.
या छोट्याशा गोष्टीतून एकच समजते, चुकतं कोणाचेच नाही. फक्त प्रारब्ध ओळखलं गेलं पाहिजे आणि एकच प्रश्न आपल्या मनाला विचारावासा वाटतो, असे का घडले? तर याचे उत्तर झालेला प्रसंग आपण जेव्हा स्मरण करतो तेव्हा ‘प्रारब्ध’ देत असतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा