मुख्य सामग्रीवर वगळा

नानी आत्या

मी भयानक स्वप्न बघून दचकलो आणि डोळे उघडले. त्या अंधारात म्हातारे विस्फारलेले केस, सुकलेला चेहेरा मोठे खोल गेलेले डोळे, लांब मोठे नाक, बारीक तोंड असलेला चेहेरा माझ्या चेहेर्‍या समोर होता. कपड्यात मुतावा असा वास माझ्या नाकाला झोंबला. पुरता घाबरलेल्या अवस्थेत ‘आजी’ करून मोठा आवाज दिला.
आजी ताडकन झोपेतून उठून खरखर केलेल्या आवाजात ‘कायऽऽऽ रेऽऽ...’ करत माझ्या दिशेने बघितले.
‘मेली थेरडे...’ म्हणत आजीने हॉलमधला लाईट लावला.
नानी आत्या माझ्या चेहेर्‍याला हात लावणार मी करंट लागल्यासारखा पटकन सरकलो.
आजीने नानी आत्याचे खवाटे धरले तसे ओढत तीला तिच्या जागेवर नेऊन पटकवले.
‘हरामी साली; आता रात्रीच्या वेळी पोरांना घाबरवते काय... तुला आता बघते थांब...’
मी त्या दोघांची धांदल गुडघ्यात डोके घालत बघत होतो. तिरपी नजर करत घड्याळात रात्रीचे तीन वाजले होते.
रात्रीतून नानी आत्या भोवती आजीने बॅरीकेटस्‌ लावले. ‘(नानी आत्या) तुला सकाळी बघते. (माझ्याकडे फिरून) काय रे... घाबरलास का?..., काय केलं तीनं तुला.’
मी (संभ्रमअवस्थेत) ‘अ... काही नाही, ती जवळ येऊन काय करत होती कायऽऽऽ माहित. (मधेच) तीने साडीत सु केलीये गं...’ म्हणत बाथरूमकडे गेलो. नंतर येवून झोपी गेलो.
सकाळी मोठ-मोठ्याने बोलण्याचा आजीचा आवाज कानावर पडला. अर्धवट झोपल्याने मी मिचमिचे डोळे करत नानी आत्याच्या दिशेने पाहिले. ती माकडासारखी बसून आजीकडे रोखून पहात होती. आजी हातात काठी घेवून तिला शाब्दिक फटकारत होती.
सकाळची माझी तयारी होईपर्यंत घरातील सर्व मंडळींना रात्रीचा किस्सा बर्‍यापैकी समजला असावा. कुणी गंभीर, कुणी मिशकिल चेष्टा, तर कुणाच्या कानपिचक्या चालू होत्या.
नानी आत्याचा चेहेरा बघावासा वाटत नव्हता. दात नसल्याने तोंडाचा चंबु झाला होता. बोबडी बोलाने ती आजीचा प्रतिकार करत होती. पण आजी समोर एक चालेना.
हॉलमध्ये अजुनही मुताचा वास येत होता.
दुपारपर्यंत घरात काय झाले माहित नाही. पण माझ्या मित्राने ‘नानी आत्या आखाड्याच्या पायरीवरून पडली.’ असे सांगितले.
आजी, ‘ती घर सोडून जाण्याच्या बेतात होती.’
नानी आत्या पुरती सुकली होती. तीला चालता येत नव्हते. पण सरकत सरकत आखाड्याच्या पायरीपर्यंत गेली होती. तिला बर्‍याच ठिकाणी लागले होते. खुप कण्हत होती. नंतर असेही समजले की, आदल्या रात्री तिने जेवणाच्या ताटात सु करून कोणाला समजू नये म्हणून पिऊन टाकले. हे ऐकल्यावर घरात कहरच झाला होता. तिच्या अशा वागण्याने घरातले सगळेच वैतागले होते.
काही दिवसांनी ती गेली (वर).
ती अंथ्रुणात दिसतंच नव्हती एवढी हाडकळी झाली होती. अशा अवस्थेत गेल्याने वाईट तर सगळ्यांनाच वाटत होते; पण तिचे हाल बघवले जात नव्हते.
गंगेवर पिंडदान करतांना आम्ही घरचे व सगळे नातलग बसलो होतो. जेवढे पांढरे केसावाले होते त्यांच्याकडे भिरभिरती नजर टाकली.
नानी आत्याची आठवण काढंत ‘म्हातारपण खरंच एवढं वाईट असतं का?’ असा विचार करत मनानेच उत्तर दिले ‘नको... चालता-फिरता कोणालाही त्रास न देता निघून जायचं (मरायचं)...’ पण तेवढ्यात आतुनही आवाज आला, ‘हे ठरवणारा तू कोण?’
मी जागेवर (भानावर) आलो आणि माझ्या समोर एका पाटीवर ‘समय से पहले भाग्य से अधिक किसी को कुछ नही मिलता’ असे लिहिले होते. आणि स्वतःशीच हसलो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या गाडीच्या स्टीयरिंगवर कोणालाही बसू देणार नाही.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचतो न पोहोचतो काही शासकीय अधिकारी आणि प्रेसमधील मला ओळखणार्‍यांपैकी “तुम्ही इथे!; मग रावसाहेबांबरोबर ते दोघे कोण होते?” असं विचारायला सुरुवात केली. ते काय बोलत होते मला काही समजले नाही. पण इतके सारे लोकं जमल्याने रावसाहेबाविषयी नक्की वाईट बातमी होती. हे नक्की. त्यातील एका मित्राने माझा हात धरून बाजूला नेले. वॉर्ड नंबर सांगून ‘तिथे जा आणि ते दोघे कोण आहेत ते बघ’ असे सांगून पाठवत होता. त्याचा हात झटकत “रावसाहेब कुठे आहे?” मी रागावून प्रश्न केला. “ते...ते.. पोस्टमार्टम रूम मध्ये आहे.” क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि तेथून निघालो. जाता जाता त्याने ‘रावसाहेबांबरोबर तू आणि अण्णा आहेत असे सगळ्यांना वाटले म्हणून त्यांनी तुला आल्या आल्या असे विचारले.’ असं सांगत होता. वार्डात जाऊन नर्सना रावसाहेबाबरोबर अजून दोन व्यक्ती कुठे ऍडमिट आहेत म्हणून विचारले. नर्सने रजिस्टर बघता बघता “ते दोघे नाहीत तिघे आहेत. एक आयसीयूमध्ये ऍडमिट आहे आणि...” बेडकडे बोट करून “ते दोघे तिथे आहेत.” डोळ्यावर, डोक्यावर पट्टी केलेली, हात गळ्यात बांधलेला, सलाईन लावलेली अशा अवस्थेत ते दोघे पडलेले दिसले. कद...

15 दिवस माझे आणि...

मला पंधरा दिवस बाहेरगावी जाण्याची वेळ आली. बायको म्हणाली, “पोराला घेऊन मी नाही घरी एकटी राहणार; एक तर तो माझं ऐकत नाही. खूप त्रास देतो. सारखा ओरडतोे.” “मग जुन्या घरी जा!” असं मी म्हटल्याबरोबर बायकोने जे भांडणाचा सुर सुरू केला की, माझाही तिच्याबरोबर सुर जुळून गेला. अखेर भांडण घराच्या कामावर येऊन ठेपले. “तुम्ही घरकाम एकदा करून बघा; मग तेव्हा कळेल की किती दमछाक होते ते!” - बायको यावर मी ते चॅलेंज स्वीकारले, “ठरलं तर मग मी गावाहून शनिवारी घरी येणार आहे. तूपण माहेरी जा आणि डायरेक्ट सोमवारी ये. मी रविवारी अख्खा दिवस घरीच थांबेल. घरातील बाकीचे कामे, दोन वेळची भांडी, स्वयंपाक या सर्व गोष्टी पूर्ण करून रात्री आपण फोनवर चर्चा करू.” असे आमच्या दोघांमध्ये पक्के झाले. बायकोला दुसर्‍या दिवशी गाडीत बसवून माहेरी रवाना केले. मीही त्याच रात्री कामासाठी बाहेर गावी निघून गेलो. ती माहेरी अन मी गावी असतांनाच्या काळात नेहमीप्रमाणे फोनवर बोलताना तावा-तावात भांडायचे काही कमी केले नाही. तोपर्यंत मी ‘रविवारचे घर सांभाळायचे’ बाशिंग बांधून घेतले; आणि हिने ‘बघू कसा करतो ते!’ म्हणून बांगड्या वर केल्या. अखेर मी शनिवा...

वैष्णव देवींचा प्रवास भाग 1

“अंकल कुछ लेलो ना!” त्या चिमुकलीने तीन-चार स्वेटरचे पॅकिंग दाखवत विचारले. “अगं हे मुलींचे आहे. हे माझ्या काय कामाचे” त्यातलं एक स्वेटर हातात घेऊन बोललो. “अरे ती हिंदीत बोलत आहे. तुझी मराठी समजेल का तिला.” भाऊ हसतच म्हणाला. “मुझे मराठी समझ मे आती है. अंकल, आण्टी के लिए ले लो ना!” खूप आग्रह करत तिने केविलवाणे तोंड केले. “इसकी अभी तक शादी नही हुई है । शादी होने के बाद ले लेंगे !” खवचटपणे रावसाहेब बोलला. थोडा हशा पिकला. “अहो, असं का त्यांना चिडवता! उगीचच आपलं काही तरी” रावसाहेबांची बायको त्याला दटावत बोलल्या. अंकल काही घेणार नाही म्हणून ती पुढे निघून गेली. तेवढ्यात माझा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. “मी बोलतेय. हा माझ्या भावाचा नंबर आहे. तुम्हाला वेळ आहे का?” हा तिचाच फोन होता. घाईघाईने दरवाजाजवळ जाऊन बोलायला लागलो. “माझी तयारी आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना!” तिने हे बोलताच. “अरे वा... थँक्यू थँक्यू” म्हणत जागेवर उडी मारली. माझ्यामागे भाऊ कधी येऊन उभा राहिला समजले नाही. तो अगदी दबक्या आवाजात “अरे अशा वेळी थँक्यू थँक्यू म्हणायचे का?” असे म्हणत त्याने कपाळावर हात मारला. आणि “चालू दे......