मुख्य सामग्रीवर वगळा

“लवशिप देते का?”; फे्रण्डशिपचा फज्जा

नंबर केव्हा येतो याची वाट बघता बघता खिडकीच्या आतील लोकांची जेवणाची वेळ झाली आणि काऊंटर अर्धा तासासाठी बंद झाले. आम्ही ओळीतील 15-20 जणांनी स्वतःचे नंबर घेऊन रांग मोडली. मी, इकडे-तिकडे जाण्यापेक्षा खिडकीपाशी उभे रहाण्याचे पसंत केले.  समोरील लोकांचे चेहेरे बघता-बघता एका रूममधून सुंदर तरुणी बाहेर पडली. तिच्या केसांची एक लट गालावरून फिरत होती. दातांची एक सारखी ठेवन तिच्या स्मित हास्याने दिसत होती. तिच्या डोळ्यांचा खेळ समोरच्याला खेळवत होती. कमनिय बांधा, साधे रहाणीमान, तिचे ते चालणे जणू मी याच्या आधी बघितल्यासारखे वाटले. आणि एकदम राधाचीच आठवण झाली.
(फ्लॅशबॅक)
सुधीर - “भाऊ, महिना झाला तू तिच्याकडे सारखा बघतोय पण तुमच्यात काही बोलणं झालं नाही.”
अविनाश - “हं.. शेवटचे दिवस राहीले. परत भेट नाही होणार जे काही बोलायचे ते आजच बोलून टाक.”
शरद - “यार, फे्रंडशिप तरी मागच तू.”
तमखाने - “होऊन जाऊ दे आज काहीतरी आर या पार.”
बोलता बोलता आमचा वर्ग सायन्स हॉल मधे घुसला. सरांची वाट बघत असतांना कुणीतरी हॉल मधील खिडक्या उघडल्या. त्याच रांगेत समोर दोन हाताच्या अंतरावर मुलींचा सायन्स हॉलच्या खिडक्या होत्या. एका खिडकीपाशी ती आणि तिच्या मैत्रीणी दिसल्या. सर्वच मुले-मुली चोरून-लपुन एकमेकांना खिडकीतून बघत होती. त्यात आमच्या नजरानजर होत असतांना मागून मित्र मला ‘अरे बोलून टाक’, ‘फ्रेण्डशिप माग’, ‘ती हो म्हणेल बघ’ वगैरे-वगैरे’ असे अनेक प्रकारे पुशअप करत होते. या भाऊगर्दीत माझ्याकडून ‘फ्रेंडशिप’ ऐवजी कधी “लवशिप देते का?” असे निघून गेले नि खिडकीचा धाडकन आवाज झाला. माझ्या कानावर कुणीतरी जोरात मारावे असे कुनऽऽ.. आवाज करत होते. सगळे मित्र खिदी-खिदी हसत होते. माझे तोंड केविलवाणे झाले. म्हंटले “आता ठार मेलो”.
थोड्यावेळाने ती खिडकी परत उघडली.
तेजाळे (चिडून) -  “डायरेक्ट लवशिप कसा काय मागतोस तू? कधी भेटला नाही, बोलला नाही, मैत्रीही नाही. ही कोणती पद्धत तुझी.”
तिच्या बाकीच्या मैत्रीणींने चांगलेच तोंडसुख घेतले. उपदेशाचे डोस सुरू झाले. तीने त्या गराड्यातून भसकन तोंड खिडकीत आणले. (संतापून) “ये तू मला अजिबात आवडत नाही. समलंस” आणि खिडकी पहिल्यापेक्षा जोरात आदळली. थोडावेळ हॉलमधे शांतता.
मी बंद खिडकीकडे तसाच बघत होतो. लवशिपची अख्खी रागरांगोळी झाली. डोक्यात फे्रण्डशिपचा ऑक्सिजन येण्याऐवजी लवशिपचा कार्बनडाय ऑक्साइड केव्हा आला काही समजले नाही. मनाचा लिटमस पेपर पार हिरवा, पिवळा, जांभळा झाला होता. नजर टेबलवरच्या बेडकावर स्थिर झाली. चिरफाड करून ठेवलेला तो आणि मी एकच अवस्था झाली होती. जीव, रसायन आणि भौतिकशास्त्राची चांगली ओळख झाल्यासारखे वाटले. सर आल्याचे समजताच पोरं पांगली. माझा तास आधीच झाल्याने माझ्या सुपीक मेंदूला अजुन अभ्यास झेपावणार नाही म्हणून इस्त्रीच्या दुकानात हँगरला कपडे टांगावे तसा मी सरांपुढे उभा राहीलो. सरांनी तोच बेडूक घेऊन विषयाला सुरवात केली. माझ्या मनाची इतकी कालवाकालव सुरू झाली की, सरांच्या जागी ती उभी होती आणि “तू मला अजिबात आवडत नाही. जा चालता हो इथनं” असे वाटायला लागले. पोरं कधी माझ्याकडे तर कधी सरांकडे पाहात होती. असा करत सायन्सचा तास आटोपला. मित्रांमधे कुणी टिंगल तर कुणी टपली देत निघून गेली.
नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर मुलींच्या शाळेमधून घरी जाण्याचा रस्ता धरला. पोर्चमध्ये ती आणि तिचा घोळका बहुतेक माझा समाचार घेण्यासाठी थांबल्या होत्या.
तेजाळे (रेकुन)- “ये, थांब; तुला काय बोलायचे आता इथे बोल.”
मी (रागाने) - “मला काहीही बोलायचे नाही.” कोणाकडेही न बघता गुमान रस्ता पकडला. मागे फिरूनसुद्धा पाहिले नाही.
(फ्लॅशबॅक पूर्ण)
हे सगळं आठवलं. स्वप्नातून जागा झालो. जिला बघितले ती गर्दीत हरवली होती पण तिला भेटण्याची इच्छा परत जागी झाली. काऊंटर सुरू झाले. नंबर येईस्तोवर नजर भिरभिरत होती. काम पूर्ण होऊन संध्याकाळ झाली पण ती नाही दिसली. घरी आलो. रात्रभर जागा होतो ती तीच आहे का या विचाराने.
सकाळचे घरातील कामे आटोपून कामावर न जाता थेट सिव्हिल गाठले आणि काऊंटरसमोर जाऊन उभा राहिलो तिची वाट पाहात. बराच वेळ झाला. अखेर जवळच्याच विभागात डोकावून पाहिले.... त्या तरूणींच्या घोळक्यात तिच्यावर नजर स्थिर झाली. ती, राधाच होती याची मला खात्री पटली. वेळ न दवडता भसकन केबिनमधे तोंड घातले. “एस्क्युज मी मॅम तुमचे नाव राधा आहे का?” न घाबरता बोललो.
ती - “हा... बोला काय होतंय तुम्हाला?”
मी - “तुम्ही मला ओळखलं का?”
ती - (कपाळावर आठ्या पाडत) “कोण तुम्ही?”
मी - “रूग्टाऽऽ...! पुष्पावती शाळाऽऽ...!, लवशिपऽऽ...!”
ती - “शाळाऽऽ... आठवली पण लवशिप... काही समजले नाही.” मी झालेला सर्व प्रसंग थोडक्यात सांगितला.
ती - “अरे बाबरे... तुम्हाला इतक्या वर्षानंतर अजून आठवतं हे सगळं. मी तर सगळे विसरले. पण इतक्या वर्षानंतर मला कसे ओळखले आणि तुम्ही इथे काय करताय?”
मी - “आपले दहावीचे शेवटचे काही महिने तुम्हाला सतत बघायचो. त्या वेळेस तुमच्याशी कसा वागलो यामुळे तुम्ही लक्षात राहिलात. माझ्या मुलाचे मेडीकल सर्टीफिकेट घेण्याकरीता त्या रांगेत उभा असतांना तुम्ही दिसलात म्हणून तुम्हाला भेटण्याची इच्छा झाली. काल भेट झाली नाही म्हणून खास भेटण्याकरीता परत आलो.”
आपण यांना पाहिलत का! अशा अर्विभावत ती माझ्याकडे बघून काहीतरी मधेच बोलायची परत थांबायची.
ती - “मला तर ते दोघे भाऊ अविनाश आणि सुधीर हेच आठवतात. बाकी कुणीही आठवत नाही.”
तिच्या या वाक्याने माझा पोपटच केला. त्यावेळीही आणि आताही. कारण मी जे वागलो हे नाही लक्षात राहीले पण ज्यांनी हिच्याकडे ढुंकुनही कधी पाहिले नाही. तिला हे बरे आठवले आणि ते कुठे राहातात हेसुद्धा तिने सांगितले. पण ती खरं बोलली हेही मात्र नक्कीच असो... त्यावेळेस आम्ही शाळेत सायन्स हॉल मध्ये भेटलो होतो आणि आता हॉस्पिटलमध्ये; त्यामुळे एखादा रूग्ण डॉक्टरांकडे आपल्याला काय रोग झाला आहे हे दाखवण्यासाठीच जातो म्हणून मॅडमनी मला तशी वागणुक दिली असावी.
आमच्यात त्यावेळेपासून ते आत्ताच्या भेटण्यापर्यंत फक्त चौकश्या झाल्या. जसे की, तु काय करतो, मी काय करते, लग्न, मुलं-बाळं, घर-संसार वगैरे-वगैरे.
शाळेत शिक्षकांना जसा नमस्कार करतात तसा नमस्कार करून “मी आपला जास्त वेळ घेतला. आपली भेट झाली. फार बरे वाटले.” असे  सुखोद शब्द वापरून तेथुन मागे न वळता सुसाट सुटलो. वाटले होते जुन्या काही आठवणी, गप्पा-गोष्टी, चहा-पाणी होईल पण काहीही झाले नाही. शिवाय कुठले डोसही दिले नाही हे नशीब.
या अशा फालतुच्या आठवणी लक्षात ठेवणं, झुरत राहाणं हे मुर्खपणाचे लक्षणे आहेत याची जाणीव झाली. कदाचित हल्लीच्या धावपळीच्या जीवनात मागे वळुन बघण्याची कोणाचीच इच्छा नसावी असेही वाटायला लागले आहे. सरतेशेवटी गाडीला किक मारली. माझ्या मनाला, ‘छोडो कल की बातें... कल की बात पुरानी...’ असे गुनगुनत सात्वनपर गोळी दिली नि ऑफीसचा रस्ता धरला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या गाडीच्या स्टीयरिंगवर कोणालाही बसू देणार नाही.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचतो न पोहोचतो काही शासकीय अधिकारी आणि प्रेसमधील मला ओळखणार्‍यांपैकी “तुम्ही इथे!; मग रावसाहेबांबरोबर ते दोघे कोण होते?” असं विचारायला सुरुवात केली. ते काय बोलत होते मला काही समजले नाही. पण इतके सारे लोकं जमल्याने रावसाहेबाविषयी नक्की वाईट बातमी होती. हे नक्की. त्यातील एका मित्राने माझा हात धरून बाजूला नेले. वॉर्ड नंबर सांगून ‘तिथे जा आणि ते दोघे कोण आहेत ते बघ’ असे सांगून पाठवत होता. त्याचा हात झटकत “रावसाहेब कुठे आहे?” मी रागावून प्रश्न केला. “ते...ते.. पोस्टमार्टम रूम मध्ये आहे.” क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि तेथून निघालो. जाता जाता त्याने ‘रावसाहेबांबरोबर तू आणि अण्णा आहेत असे सगळ्यांना वाटले म्हणून त्यांनी तुला आल्या आल्या असे विचारले.’ असं सांगत होता. वार्डात जाऊन नर्सना रावसाहेबाबरोबर अजून दोन व्यक्ती कुठे ऍडमिट आहेत म्हणून विचारले. नर्सने रजिस्टर बघता बघता “ते दोघे नाहीत तिघे आहेत. एक आयसीयूमध्ये ऍडमिट आहे आणि...” बेडकडे बोट करून “ते दोघे तिथे आहेत.” डोळ्यावर, डोक्यावर पट्टी केलेली, हात गळ्यात बांधलेला, सलाईन लावलेली अशा अवस्थेत ते दोघे पडलेले दिसले. कद...

15 दिवस माझे आणि...

मला पंधरा दिवस बाहेरगावी जाण्याची वेळ आली. बायको म्हणाली, “पोराला घेऊन मी नाही घरी एकटी राहणार; एक तर तो माझं ऐकत नाही. खूप त्रास देतो. सारखा ओरडतोे.” “मग जुन्या घरी जा!” असं मी म्हटल्याबरोबर बायकोने जे भांडणाचा सुर सुरू केला की, माझाही तिच्याबरोबर सुर जुळून गेला. अखेर भांडण घराच्या कामावर येऊन ठेपले. “तुम्ही घरकाम एकदा करून बघा; मग तेव्हा कळेल की किती दमछाक होते ते!” - बायको यावर मी ते चॅलेंज स्वीकारले, “ठरलं तर मग मी गावाहून शनिवारी घरी येणार आहे. तूपण माहेरी जा आणि डायरेक्ट सोमवारी ये. मी रविवारी अख्खा दिवस घरीच थांबेल. घरातील बाकीचे कामे, दोन वेळची भांडी, स्वयंपाक या सर्व गोष्टी पूर्ण करून रात्री आपण फोनवर चर्चा करू.” असे आमच्या दोघांमध्ये पक्के झाले. बायकोला दुसर्‍या दिवशी गाडीत बसवून माहेरी रवाना केले. मीही त्याच रात्री कामासाठी बाहेर गावी निघून गेलो. ती माहेरी अन मी गावी असतांनाच्या काळात नेहमीप्रमाणे फोनवर बोलताना तावा-तावात भांडायचे काही कमी केले नाही. तोपर्यंत मी ‘रविवारचे घर सांभाळायचे’ बाशिंग बांधून घेतले; आणि हिने ‘बघू कसा करतो ते!’ म्हणून बांगड्या वर केल्या. अखेर मी शनिवा...

वैष्णव देवींचा प्रवास भाग 1

“अंकल कुछ लेलो ना!” त्या चिमुकलीने तीन-चार स्वेटरचे पॅकिंग दाखवत विचारले. “अगं हे मुलींचे आहे. हे माझ्या काय कामाचे” त्यातलं एक स्वेटर हातात घेऊन बोललो. “अरे ती हिंदीत बोलत आहे. तुझी मराठी समजेल का तिला.” भाऊ हसतच म्हणाला. “मुझे मराठी समझ मे आती है. अंकल, आण्टी के लिए ले लो ना!” खूप आग्रह करत तिने केविलवाणे तोंड केले. “इसकी अभी तक शादी नही हुई है । शादी होने के बाद ले लेंगे !” खवचटपणे रावसाहेब बोलला. थोडा हशा पिकला. “अहो, असं का त्यांना चिडवता! उगीचच आपलं काही तरी” रावसाहेबांची बायको त्याला दटावत बोलल्या. अंकल काही घेणार नाही म्हणून ती पुढे निघून गेली. तेवढ्यात माझा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. “मी बोलतेय. हा माझ्या भावाचा नंबर आहे. तुम्हाला वेळ आहे का?” हा तिचाच फोन होता. घाईघाईने दरवाजाजवळ जाऊन बोलायला लागलो. “माझी तयारी आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना!” तिने हे बोलताच. “अरे वा... थँक्यू थँक्यू” म्हणत जागेवर उडी मारली. माझ्यामागे भाऊ कधी येऊन उभा राहिला समजले नाही. तो अगदी दबक्या आवाजात “अरे अशा वेळी थँक्यू थँक्यू म्हणायचे का?” असे म्हणत त्याने कपाळावर हात मारला. आणि “चालू दे......