मुख्य सामग्रीवर वगळा

निलम, गोमेद, ओपेल भाग 1

“तुम्ही कधीपासून खड्यांवर विश्वास ठेवायला लागले?” ज्योतिष कार्यालयामध्ये रिसेप्शन काऊंटरवर वहिनी बसल्या होत्या. त्यांनी माझा मिश्किल चेहेरा बघत प्रश्न विचारला.
“परिस्थिती अशी काही पुढे आली आहे की, ज्यांनी-ज्यांनी जे-जे करायला सांगितले ते-ते करण्याचा मी प्रयत्न करतो आहे.
“हं... मला ह्यांनी थोडं सांगितले आहे. अहो.. एवढे निराश नका होऊ. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख आहेच की.” वहिनींनी शाब्दीक दिलासा देत माझी कुंडली पुस्तिका घेवून सरांच्या केबिनमध्ये गेल्या. वहिनी बाहेर येवोस्तर ज्योतिष कार्यालयाच्या भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारची माहिती वाचत बसलो. पाठीला पाठ लावून बसलेल्या एका राशीला स्थिर झालो.
“ती तुमच्या काही कामाची नाहीये.” वहिनींचे सर स्वतः बाहेर येऊन दमदार आवाजात मला म्हणाले. डोळ्यावरचा डे-नाईट चष्मा काढून “या बसा...” म्हणत त्यांनी मला न्याहाळले.
त्यांचे ते काळेभोर केस, दाट काळ्या मिश्या, गुबगुबीत गोरे गाल, गळ्यात सोन्याची जाड चैन, पांढरे कपडे, मनगटात सोन्याचे ब्रेसलेट, दोन्ही हातांच्या बोटात मोठाले रत्न, एका हातात मोबाईल, दुसरा टेबलवर आणि दुसर्‍या हातात माझे फाटलेले कुंडलीचे पुस्तक.
“हं... तुमच्या कुंडलीत बरेच प्रोब्लेम आहे. तुम्ही शनीच्याच रथात बसले आहात असे म्हणायला काही हरकत नाही. शांती करावी लागेल, आणि निलम, गोमेद, ओपेल हे तीन रत्न परिधान करावे लागतील.”
ही सगळी मोठे-मोठे नावं ऐकुन उगाच आलो इथे असे वाटले.
“पण साधारण कितीऽऽऽ पेसे लागतील...?” थोडंसं चाचरतच विचारले.
“बारा ते पंधरा हजार लागतील.”
एक अडचण दूर करण्यासाठी दुसरी अडचण उभी करतोय की काय असे वाटले. तोंडावर हात ठेवत किलकिले डोळे करून त्यांच्या हातातल्या रत्नांकडे पहात होतो.
“विचार काय करताय. एकदाच खर्च होईल. सगळं बदलून जाईल. बोला...!” त्याच दमदार आवाजात सर बोल्ले.
मी वहिनींकडे बघत “एवढी रक्कम माझ्याकडे नाहीये हो... मी तुम्हाला विचार करून सांगतो.”
ती फाटलेली कुंडली काऊंटरच्या काचेवरून घातलेल्या मोठाले रत्नांच्या चार बोटांनी सरकवली. आणि “कळवा” एवढे बोलून साहेब निघून गेले.
मीही वहिनींना भेटून तिथून काढता पाय घेतला. कार्यालयातून खुट्ट मनाने पायर्‍या उतरत असतांना दाजींचा फोन आला. मी कुठे आहे?, काय आहे? म्हणून त्यांनी चौकशी केली. मी सगळं सांगितल्यावर ‘मी तिथे येतो.’ असं म्हणत त्यांनी मला तिथेच थांबायला सांगितले. नंतर आम्ही दोघे एका जुनाट वाड्यात छोटेखाणी ज्वेलरी दुकानात शिरलो. त्या दुकानाची परिस्थिती बघुन मला मालगुडी डेजची मिठाईवाल्या दुकानाची आठवण झाली. दुकानाची पाटी पूर्ण गंजलेली, दुकानापुढे पायरी चढतांना वर दोरी लावली होती जेणेकरून दोरी धरून पायरी चढता येईल अशी. जुन्या पद्धतीचे लाकडी बैठे काचेचे अर्धे तुटलेले काऊंटर, त्यात काही अडगळ ठेवली होती. भिंतीला छोटे-छोटे लाकडी कप्पे असलेले कपाट, काही ठिकाणी चांदीचे भांडे होते तर काही ठिकाणी नुसतेच कागदं पडलेली होती. कोपर्‍यात मोटर चालू होती. कारागीर भांड्यांवर छोट्या होतोडीने काहीतरी ठोकठाक चालली होती. भितीवर तोंड सोडून बसलेले एका बाबांचा फोटो दोरीला लटकवलेला मला पहात होता.
“बोला काय पाहिजे” सनईच्या आवाजासारखा एक आवाज माझ्या कानावर पडला. एक वयस्कर काका माझ्या समोर उभे राहिले. दाजींनी पटकन त्यांच्या पाया पडल्या. म्हणून मीही त्यांच्या पाया पडल्या. जुनी चामडी चप्पल, गोरेपान पाय, पांढरा पायजमा, पांढरा शर्ट, खिशाला 1-2 रूपयाचा पेन, डोळ्यावर दोर्‍याने बांधलेला चष्मा, गोरा चेहेरा, स्मित हास्य, डोक्यावर चांदी, दाढी-मिश्या केलेले. मला जरा ते काका सो-सो वाटले.
ज्योतिष कार्यालयातून सरांनी रत्नांचा कागद दिला होता. तो मी त्यांना दाखवला. जुन्या बैठ्या काऊंटरवर तो कागद ठेवून त्यांनी खुप सार्‍या रत्नाचा एक ज्वेलरी बॉक्स काढला. डोळ्याला भिंगाची काच लावून रत्न बघत होते. काचेत असलेल्या तराजूत ठेवत होते. अखेर तीन रत्न त्यांच्या नजरेतून काऊंटरच्या काचेवर उतरले.
“हे तुझ्या बोटांना छान शोभुन दिसेल.” काका अगदी हसून म्हणत होते.
त्यांच्या बोलण्याने मी लग्नाची अंगठी करतोय की काय असे वाटले.
“यांचे किती होतील” दाजींनी विचारले.
स्मित हास्य करत “बावीचशे रूपये होतील. कपालेश्वराला अभिषेक करून तिसर्‍या दिवशी देईन.”
“अरे... व्वा.! खुपच छान.” दाजींनी माझ्याकडे बघत. दोघांनी माना हलवल्या. आणि करायला सांगितले.
क्रमशः

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या गाडीच्या स्टीयरिंगवर कोणालाही बसू देणार नाही.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचतो न पोहोचतो काही शासकीय अधिकारी आणि प्रेसमधील मला ओळखणार्‍यांपैकी “तुम्ही इथे!; मग रावसाहेबांबरोबर ते दोघे कोण होते?” असं विचारायला सुरुवात केली. ते काय बोलत होते मला काही समजले नाही. पण इतके सारे लोकं जमल्याने रावसाहेबाविषयी नक्की वाईट बातमी होती. हे नक्की. त्यातील एका मित्राने माझा हात धरून बाजूला नेले. वॉर्ड नंबर सांगून ‘तिथे जा आणि ते दोघे कोण आहेत ते बघ’ असे सांगून पाठवत होता. त्याचा हात झटकत “रावसाहेब कुठे आहे?” मी रागावून प्रश्न केला. “ते...ते.. पोस्टमार्टम रूम मध्ये आहे.” क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि तेथून निघालो. जाता जाता त्याने ‘रावसाहेबांबरोबर तू आणि अण्णा आहेत असे सगळ्यांना वाटले म्हणून त्यांनी तुला आल्या आल्या असे विचारले.’ असं सांगत होता. वार्डात जाऊन नर्सना रावसाहेबाबरोबर अजून दोन व्यक्ती कुठे ऍडमिट आहेत म्हणून विचारले. नर्सने रजिस्टर बघता बघता “ते दोघे नाहीत तिघे आहेत. एक आयसीयूमध्ये ऍडमिट आहे आणि...” बेडकडे बोट करून “ते दोघे तिथे आहेत.” डोळ्यावर, डोक्यावर पट्टी केलेली, हात गळ्यात बांधलेला, सलाईन लावलेली अशा अवस्थेत ते दोघे पडलेले दिसले. कद...

15 दिवस माझे आणि...

मला पंधरा दिवस बाहेरगावी जाण्याची वेळ आली. बायको म्हणाली, “पोराला घेऊन मी नाही घरी एकटी राहणार; एक तर तो माझं ऐकत नाही. खूप त्रास देतो. सारखा ओरडतोे.” “मग जुन्या घरी जा!” असं मी म्हटल्याबरोबर बायकोने जे भांडणाचा सुर सुरू केला की, माझाही तिच्याबरोबर सुर जुळून गेला. अखेर भांडण घराच्या कामावर येऊन ठेपले. “तुम्ही घरकाम एकदा करून बघा; मग तेव्हा कळेल की किती दमछाक होते ते!” - बायको यावर मी ते चॅलेंज स्वीकारले, “ठरलं तर मग मी गावाहून शनिवारी घरी येणार आहे. तूपण माहेरी जा आणि डायरेक्ट सोमवारी ये. मी रविवारी अख्खा दिवस घरीच थांबेल. घरातील बाकीचे कामे, दोन वेळची भांडी, स्वयंपाक या सर्व गोष्टी पूर्ण करून रात्री आपण फोनवर चर्चा करू.” असे आमच्या दोघांमध्ये पक्के झाले. बायकोला दुसर्‍या दिवशी गाडीत बसवून माहेरी रवाना केले. मीही त्याच रात्री कामासाठी बाहेर गावी निघून गेलो. ती माहेरी अन मी गावी असतांनाच्या काळात नेहमीप्रमाणे फोनवर बोलताना तावा-तावात भांडायचे काही कमी केले नाही. तोपर्यंत मी ‘रविवारचे घर सांभाळायचे’ बाशिंग बांधून घेतले; आणि हिने ‘बघू कसा करतो ते!’ म्हणून बांगड्या वर केल्या. अखेर मी शनिवा...

वैष्णव देवींचा प्रवास भाग 1

“अंकल कुछ लेलो ना!” त्या चिमुकलीने तीन-चार स्वेटरचे पॅकिंग दाखवत विचारले. “अगं हे मुलींचे आहे. हे माझ्या काय कामाचे” त्यातलं एक स्वेटर हातात घेऊन बोललो. “अरे ती हिंदीत बोलत आहे. तुझी मराठी समजेल का तिला.” भाऊ हसतच म्हणाला. “मुझे मराठी समझ मे आती है. अंकल, आण्टी के लिए ले लो ना!” खूप आग्रह करत तिने केविलवाणे तोंड केले. “इसकी अभी तक शादी नही हुई है । शादी होने के बाद ले लेंगे !” खवचटपणे रावसाहेब बोलला. थोडा हशा पिकला. “अहो, असं का त्यांना चिडवता! उगीचच आपलं काही तरी” रावसाहेबांची बायको त्याला दटावत बोलल्या. अंकल काही घेणार नाही म्हणून ती पुढे निघून गेली. तेवढ्यात माझा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. “मी बोलतेय. हा माझ्या भावाचा नंबर आहे. तुम्हाला वेळ आहे का?” हा तिचाच फोन होता. घाईघाईने दरवाजाजवळ जाऊन बोलायला लागलो. “माझी तयारी आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना!” तिने हे बोलताच. “अरे वा... थँक्यू थँक्यू” म्हणत जागेवर उडी मारली. माझ्यामागे भाऊ कधी येऊन उभा राहिला समजले नाही. तो अगदी दबक्या आवाजात “अरे अशा वेळी थँक्यू थँक्यू म्हणायचे का?” असे म्हणत त्याने कपाळावर हात मारला. आणि “चालू दे......