मुख्य सामग्रीवर वगळा

वैष्णव देवींचा प्रवास भाग 2

पहिली मंडोळी कशाची...ऽऽऽ... एवढी हौस पुरवा...ऽऽऽ... (बॅकग्राऊंड म्युझिक)
पहिली वैष्णवी - तीने साडी घातलेली होती. डोक्यावर पदर, सावळी होती. आल्याआल्या सर्वांवर एक कटाक्ष टाकला आणि खाली बसली. आम्ही सगळे वरती. कुणी पलंगावर, कुणी खुर्ची-टेबलवर, कुणी शिलाई मशीनवर. जागा मिळेल तिथे बसलेले. नातं जवळचं असल्यामुळे घरातील सर्वच मंडळी उपस्थित होते. पोहे-चहा झाल्यावर. तीला बर्‍याच जणांनी बरेच प्रश्न विचारले. नंतर मला विचारणा झाली.
“तुमचे शिक्षण काय झाले?” या प्रश्नावरच सभा तहकुब झाली. कारण घरच्यांना आधीच सांगितले होते. शिक्षण आणि एकांतात पंधरा मिनिटे बोलायला वेळ द्या.
दुसरी वैष्णवी - यांचा फोटो, कुंडली न बघता डायरेक्ट भेटायला गेलो. घर सुंदर सजवले होते. कपाळावर कुंकु नसलेल्या त्या महिलेने स्वागत केले. आत प्रवेश केल्यावर हॉलमध्ये एक महिला उभ्या होत्या. त्या कदाचित त्यांच्या बहिण असाव्यात कारण चेहेरा मिळता जुळता होता.  मुलीला आवाज देवून पाणी-चहा बोलावून घेतले. ज्यांनी स्वागत केले त्या मुलीच्या आई होत्या हे समजले. पाणी-चहा देवून ती आत निघून जायची. हॉलमध्ये थांबत नव्हती. कदाचित भिती किंवा आईच्या आज्ञेत असावी. तोपर्यंत तिच्या आईने मला वरून खालून स्कॅन करून घेतले. त्यांच्या चेहेर्‍यावर मी अजिबात पसंत नव्हतो असे भाव होते. तरीही त्यांनी आम्हाला गच्चीवर जाऊन बोलण्याची परवानगी दिली.
तिच्या मागुन चालत असतांना तिचे लांब केस बघत होतो. उन खुप होते. दोन माणसं उभे राहातील एवढा आडोसा पाहिला. एकमेकांना बघत थोडे बोलायला सुरवात केली. तिने काळ्या केसांखाली पांढरे केसं झाकले होते. गोरी सुंदर होती, साडी घातलेली, हातावर हात ठेवत मिचमिचे डोळे करत बघत होती. बोलता-बोलता चक्क तिने माझा हात हात घेवून ‘तुम्ही मला पसंत आहात’ म्हणून हात मिळवला. मीही त्याला दुजोरा दिला. मी हात सैल केला पण तिने धरून ठेवला होता. आमचं बोलणं संपत नाही तोच खालून आवाज आला. पायर्‍या उतरता-उतरता घरच्यांचे चेहेरे बघितल्यावर कळुन गेले की, ये नही हो सकता.
तिसरी वैष्णवी - यांचा फोटो बघीतला होता. प्रत्यक्ष बघण्यासाठी मुलींच्या घरच्यांनी बोलावून चहा-पाणी केला. या समोर आल्या नाहीत पण; त्या मला आतल्या खोलीतून न्याहाळत होत्या. यांनी टि शर्ट, जिन्स घातलेली होती. थोड्या सडपातळ होत्या. केस सोडलेले, डोळे मोठे, कपाळ छोटे अशा काहीश्या दिसल्या. मुलीला अजुन शिक्षण घ्यायचे आहे. तेव्हा आपलं काही जमणार नाही... म्हणून राम राम ठोकला.
चौथी वैष्णवी - या दिसायला खुप सुंदर होत्या. मेकअप अजिबात नव्हता. फक्त लिपस्टीक लावलेली होती. साडी अगदी चापुन-चोपुन घातलेली होती. अंगकाठी भरलेली होती. ते जेव्हा चहा द्यायला आले तेव्हा त्यांच्या दंडाचा अंदाज घेतला आणि माझ्या. घाबरतच चहाचा कप उचलला. नंतर मान वर करून त्यांच्याकडे बघितले नाही. बघण्याचा कार्यक्रम रात्री होता. त्यामुळे एकांतात बोलण्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि जागाही नव्हती. तीन दिवसानंतर कुंडली जुळत नाही म्हणून कॅन्सल झाले.
पाचवी वैष्णवी - यांनी मात्र मोठी गंम्मत केली. यांचा वाडा जुना पण भरपूर मोठा आणि प्रशस्त होता. वाड्याच्या प्रत्येक खांबावर नक्षीदार कोरीव काम केलेले होते. त्यांच्या नावाची चौकशी करतच वाड्यापर्यंत आलो होतो. चांगलेच प्रसिद्ध होते. बरोबर बहिणाबाई होत्या. वाड्याच्या पायर्‍या चढतोच तोच कुणी महिला बाहेर येवून “काय काम आहे?” विचारत होते. बहिणीने पायरीवरच स्थळाविषयी माहिती दिली. त्यांनी “अजुन आमचा काही विचार पक्का झाला नाही. तुम्हाला कळवतो” असे बोलून पायर्‍यांवरूनच धाडले.
त्यांच्या अशा वागण्याचा बहिणाबाईला खुपच राग आला होता. ती तावातावाने तेथुन हमरस्त्यावर आली. आणि नाही-नाही ते बोलायला सुरुवात झाली. मी मात्र शांत...
सहावी वैष्णवी - यांचं गाव तसं कमी लोकवस्तीचं. गाव खुप मोठ्या डोंगराच्या पायथ्याशी वसलेले. निसर्गरम्य वातावरण. हायवेवरून तिचं घर दिसत होतं. पण बराच अंतर पायी चालत जावे लागले. यांचं दर्शन घरा बाहेरच झाले. त्यांनी स्वतःची कुठलीच तयारी केलेली नव्हती. मेकअप नव्हता. अंगात ड्रेस घरातला वापरण्याचाच होता. बहुतेक भांडी घासत होते. आम्ही घरात वाकुन गेलो. खाली सतरंजीवर बसलो. बर्‍याच गप्पा-गोष्टी, नात्यांची जुळवा-जुळव झाली. तोपर्यंत तिने चांगला ड्रेस घालुन जेवणाची ताटं घेवून आली. घरातल्या परिस्थितीवर मात करून तिने शिक्षण घेतले. हे मला लाजवेल असे होते. घरात दुसरीकडे कुठे जागा नव्हती म्हणून आमच्या दोघांना बोलायला बाहेर जायला सांगितले. शोले मधील जसे गाव होते अगदी तसेच गाव होते. तिचे घर गावाच्या उंचावर होते. तिने हाताने दाखवत गावाची ओळख करून दिली. घरचे जे म्हणतील त्याप्रमाणे होईल असे तिने शेवटी उत्तर दिले. त्यांचा निरोप घेवून घरी परतलो.
चार-पाच दिवसांनी ती स्वतः घरी आली. तिच्याबरोबर कुणी पाहुणे पण होते. त्यांना घर बघायचे होते. मोठ्या लोकांच्या गप्पा रंगत होेत्या. आम्ही दोघे मात्र गॅरेज मध्ये बोलत बसलो. तिला घर खुप आवडले होते. ती खुप खुश पण होती.
बराच वेळ झाला होता. त्यांना बराच लांबचा प्रवास होता. म्हणून आटोपते घेतले. तीने स्टॅण्डवरून मागे वळुन पाहिले. आम्ही सर्व त्यांना निरोप देण्यासाठी घराबाहेर उभे होतो. चक्क तिने दोनी हात उंच्च करून सगळ्यांना बाय-बाय केले. घरच्यांनी सर्वांनी माझ्याकडे पाहिले. “अरे ती तुला हात करतेय” मी बुचकळ्यात. काकुंनी माझा हात वर करून हवेत फिरवला. पण पुढे जे व्हायचे तेच झाले. त्यांनाही कुणी सांगणारे गुरू भेटले आणि हे पण स्थळ कॅन्सल झाले.
सातवी वैष्णवी - हे स्थळ आजोळकडचे. भरपूर लांबचा प्रवास करून पोहोचलो. येथे एकांतात बोलण्यासाठी शेजारच्यांचा घरातील हॉल मध्ये जागा दिली. कारण तिचे घर छोटे होते. तीला साडीची सवय नव्हती. तीने स्वतःच कबुल केले. “ड्रेस घालून येऊ का?” असे तीने विचारले. सावळ्या होत्या. बर्‍यापैकी मेकअप केलेला होता. उन प्रखर असल्याने खुप घामाघुम झाली होती. आमची पसंती झाली. जेवणं करून लग्नाच्या बोलणी विषयी गप्पा सुरू झाल्या. खुप उहापोह झाला आणि संपलाही. अखेर हे पण कॅन्सल होणार होते. असे असतांनाही ती गाडीपर्यंत सोडवायला आली.
आठवी वैष्णवी - यांचा फोटो आणि कुंडली जुळत होती. स्थळ खुपच लांबचे होते. म्हणून चहा-पाण्या करता एका नातलगाकडे बैठक झाली. तेथुन मुलीकडच्यांना फोन लावून असे समजले की, मुलीला आत्ताच पाहुणे बघुन गेले. जर त्यांनी लग्नाला होकार नाही दिला तर तुम्ही या. अन्यथा जमणार नाही असे स्पष्ट सांगितले. दुसर्‍याच दिवशी त्यांच्याकडून नकार आला. आणि हे पण...
नववी वैष्णवी - अखेर तो दिवस आला. मीही घरच्यांना सांगितले; हे शेवटचे स्थळ बघायचे. यापुढे आता कुठेही जायचे नाही. कंटाळुन गेलो होतो या गोष्टी करता करता.
त्यांच्या दारापुढेच गाडी लावली. घर समोरून छोटे पण मागील बाजुस बरेच मोठे होते. पुढे ओट्यावर धोतर घातलेले काळेसे बाबा बसले होते. शेजारी पत्र्याचे शेड बांधून खाली धुणी-भांडी करण्याची जागा होती. शेडच्या मागे बहुतेक रूम काढली होती. एक-एक करत घरात शिरलो. पुढे हॉल मागे किचन होता. माणसांमुळे जागा कमी वाटायला लागली. पाणी देवून मुलीला लगेचच बाहेर बोलावले. तिने ड्रेस घातलेला होता. सावळी होती. मेकअप अजिबात नाही, बारीक आवाज, शरीरयष्टी मध्यम होती. बोलणे चालु असतांनाच कुणीतरी बाहेरून मला खुणावत होते. मी बाहेर गेलो. “तुम्हाला तिच्याशी बोलायचे आहे ना! ती दुकानात बसली आहे. जा तिथे” म्हणत दुकानाकडे बोट दाखवला.  बहुतेक त्यांची बहिण असावी मी अंदाज लावला. शेडच्या शेजारी बाहेरच बाथरूम, टॉयलेट होते. पुढे बगीचा होता. एका मोठ्या झाड्याच्या आड त्या दुकानात शिरलो. दुकानाची ती मागची बाजु होती. आणि दर्शनी बाजुला दुकानातून मेन रस्ता दिसत होता. दुकान जनरल स्टोअर्सचे होते. ती तिथे नव्हती. दुकान निहाळत बाकावर बसुन घेतले. तेवढ्यात ती आली. याच व्यक्तीने  माझी बरीच माहिती विचारली. तसे तीचे शिक्षणपण माझ्यापेक्षा खुप होते. बोलतांनापण कानामागे केस घेणे, हातवारे करणे, ओठ हलवण्याची लकब, कधी माझ्याकडे, कधी दुकानातल्या वस्तुकडे बघत होती. अखेर एकमेकांची पसंती दर्शवली आणि हॉलकडे वळालो. बाहेर ज्यांनी मला दुकानात जायला सांगितले त्या उभ्या होत्या. “माझ्या वडीलांना असे बोलणे चालत नाही म्हणून मी गुपचुप तुम्हा दोघांना दुकानात बोलावले होते.” त्यांनी हे सांगितल्यावर तेव्हा मला समजले, की ते काळेसे बाबा हीचे वडील होते समजले
“काय रे झोपला का? का स्वप्न पाहातोय?” गदागदा हलवत भाऊने मला उठविले.
मी आपला हो-नाही करत डोळे चोळले आणि उठलो. भाऊला पुडी खायची होती म्हणून माझ्याकडे आला. मलाही तलप आली होती. दोघे उठून दरवाजापाशी जाऊन बसलो. “मग काय स्वप्न पाहिले?” भाऊने  तोंडात पुडी टाकत विचारले.
“हेच... आपले वैष्णवदेवींचा प्रवास” असे म्हणत मी दरवाज्या बाहेर हात फिरवला.
“हो... का...! वैष्णवदेवींचाऽऽऽ प्रवास! मला माहिती आहे तुला कुठल्या देवी आठवल्या असतील.” भाऊ प्रेमाने रागावून बोलला. पण खरंच बोलला. दोघेही खुप जोरजोरात हसत होतो.
माझा प्रवास बाहेरही चालु होता आणि आतुनही. अजुन दोन देवीकडे जाणे बाकी होते... पण तुर्तास बाहेरचा प्रवास चालू ठेवला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या गाडीच्या स्टीयरिंगवर कोणालाही बसू देणार नाही.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचतो न पोहोचतो काही शासकीय अधिकारी आणि प्रेसमधील मला ओळखणार्‍यांपैकी “तुम्ही इथे!; मग रावसाहेबांबरोबर ते दोघे कोण होते?” असं विचारायला सुरुवात केली. ते काय बोलत होते मला काही समजले नाही. पण इतके सारे लोकं जमल्याने रावसाहेबाविषयी नक्की वाईट बातमी होती. हे नक्की. त्यातील एका मित्राने माझा हात धरून बाजूला नेले. वॉर्ड नंबर सांगून ‘तिथे जा आणि ते दोघे कोण आहेत ते बघ’ असे सांगून पाठवत होता. त्याचा हात झटकत “रावसाहेब कुठे आहे?” मी रागावून प्रश्न केला. “ते...ते.. पोस्टमार्टम रूम मध्ये आहे.” क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि तेथून निघालो. जाता जाता त्याने ‘रावसाहेबांबरोबर तू आणि अण्णा आहेत असे सगळ्यांना वाटले म्हणून त्यांनी तुला आल्या आल्या असे विचारले.’ असं सांगत होता. वार्डात जाऊन नर्सना रावसाहेबाबरोबर अजून दोन व्यक्ती कुठे ऍडमिट आहेत म्हणून विचारले. नर्सने रजिस्टर बघता बघता “ते दोघे नाहीत तिघे आहेत. एक आयसीयूमध्ये ऍडमिट आहे आणि...” बेडकडे बोट करून “ते दोघे तिथे आहेत.” डोळ्यावर, डोक्यावर पट्टी केलेली, हात गळ्यात बांधलेला, सलाईन लावलेली अशा अवस्थेत ते दोघे पडलेले दिसले. कद...

15 दिवस माझे आणि...

मला पंधरा दिवस बाहेरगावी जाण्याची वेळ आली. बायको म्हणाली, “पोराला घेऊन मी नाही घरी एकटी राहणार; एक तर तो माझं ऐकत नाही. खूप त्रास देतो. सारखा ओरडतोे.” “मग जुन्या घरी जा!” असं मी म्हटल्याबरोबर बायकोने जे भांडणाचा सुर सुरू केला की, माझाही तिच्याबरोबर सुर जुळून गेला. अखेर भांडण घराच्या कामावर येऊन ठेपले. “तुम्ही घरकाम एकदा करून बघा; मग तेव्हा कळेल की किती दमछाक होते ते!” - बायको यावर मी ते चॅलेंज स्वीकारले, “ठरलं तर मग मी गावाहून शनिवारी घरी येणार आहे. तूपण माहेरी जा आणि डायरेक्ट सोमवारी ये. मी रविवारी अख्खा दिवस घरीच थांबेल. घरातील बाकीचे कामे, दोन वेळची भांडी, स्वयंपाक या सर्व गोष्टी पूर्ण करून रात्री आपण फोनवर चर्चा करू.” असे आमच्या दोघांमध्ये पक्के झाले. बायकोला दुसर्‍या दिवशी गाडीत बसवून माहेरी रवाना केले. मीही त्याच रात्री कामासाठी बाहेर गावी निघून गेलो. ती माहेरी अन मी गावी असतांनाच्या काळात नेहमीप्रमाणे फोनवर बोलताना तावा-तावात भांडायचे काही कमी केले नाही. तोपर्यंत मी ‘रविवारचे घर सांभाळायचे’ बाशिंग बांधून घेतले; आणि हिने ‘बघू कसा करतो ते!’ म्हणून बांगड्या वर केल्या. अखेर मी शनिवा...

वैष्णव देवींचा प्रवास भाग 1

“अंकल कुछ लेलो ना!” त्या चिमुकलीने तीन-चार स्वेटरचे पॅकिंग दाखवत विचारले. “अगं हे मुलींचे आहे. हे माझ्या काय कामाचे” त्यातलं एक स्वेटर हातात घेऊन बोललो. “अरे ती हिंदीत बोलत आहे. तुझी मराठी समजेल का तिला.” भाऊ हसतच म्हणाला. “मुझे मराठी समझ मे आती है. अंकल, आण्टी के लिए ले लो ना!” खूप आग्रह करत तिने केविलवाणे तोंड केले. “इसकी अभी तक शादी नही हुई है । शादी होने के बाद ले लेंगे !” खवचटपणे रावसाहेब बोलला. थोडा हशा पिकला. “अहो, असं का त्यांना चिडवता! उगीचच आपलं काही तरी” रावसाहेबांची बायको त्याला दटावत बोलल्या. अंकल काही घेणार नाही म्हणून ती पुढे निघून गेली. तेवढ्यात माझा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. “मी बोलतेय. हा माझ्या भावाचा नंबर आहे. तुम्हाला वेळ आहे का?” हा तिचाच फोन होता. घाईघाईने दरवाजाजवळ जाऊन बोलायला लागलो. “माझी तयारी आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना!” तिने हे बोलताच. “अरे वा... थँक्यू थँक्यू” म्हणत जागेवर उडी मारली. माझ्यामागे भाऊ कधी येऊन उभा राहिला समजले नाही. तो अगदी दबक्या आवाजात “अरे अशा वेळी थँक्यू थँक्यू म्हणायचे का?” असे म्हणत त्याने कपाळावर हात मारला. आणि “चालू दे......