मुख्य सामग्रीवर वगळा

निर्णय (Decision)


“तुम्हाला काही समजले का?” अजय
“म्हणजेऽऽ?, तुम्ही नेमके कशाबद्दल बोलताहेत?” मॅकी
“मला पंडित सरांचा फोन आला होता. आशा... हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे. त्या मुंबईला आहेत.” अजय
“अहोऽऽ... काय सांगताय! मी आत्ता काही दिवसापूर्वीच तिला फोन केला होता. पण तिचा फोन अभिमन्यूने घेतला होता. सांगत होता की, ‘रूटीन चेकअपसाठी दवाखान्यात आलो आहोत. ती आतमध्ये आहे. मी तिला फोन करायला सांगतो’ म्हणून. त्याच्यानंतर काही फोन नाही. का? काय झाले त्यांना?” मॅकीने घाबरूनच विचारले.
“अं... बातमी तशी एक चांगली आहे आणि एक वाईट आहे. त्यांना दोन जुळी मुलं झाली आहेत आणि दुसरी म्हणजे त्यांचा एक पाय कापावा लागला.”

मॅकीने मोठा श्वास भरला आणि रिसिर्व्हरवरच ‘बापरेऽ’ करत सोडला.
अजय थोडा थांबून “आताऽऽ... पाय का कापवा लागला ते एवढं नीटसं कळलं नाही पण; तुम्ही त्यांना फोन जरूर करा. ते तुमच्या फोनची वाट बघत असतील.”

टु...उक, टु...उक, टु...उक फोन वाजत राहिला. मॅकीचे डोळे भरून आले होते. हाताला घाम येत होता. फोन ठेवून तो पॅन्टला सतत हात पुसत होता. नंतर अश्रू अनावर झाल्याने हुंदके देत रडत होता. तिच्याबाबतीत असे का घडले?...

मॅकीचे काम असल्याने ऑफीसला आला होता. तेव्हाच अजयचा फोन आला. मॅकी प्रोडक्शनमधून निघून लंच टेबलवर जाऊन बसला. आणि पुन्हा ओक्साबोक्शी रडू लागला.

थोडावेळ गेल्यानंतर मॅकी शांत झाला खरा पण मनात काही विचार करत होता.

***
मॅकी - “तुम्हाला आशा सून म्हणून पसंत आहे का?” पप्पा माझ्याकडे एकटक बघत होते. काहीच बोलत नव्हते. माझी अपराधी नजर वळवून घेतली.
पप्पा - मिशीवरून दाढीवर हात फिरवत “सध्या तुम्ही दोघे मित्र आहात. मित्रासारखेच वागा. पुढे जाऊ नका. जोपर्यंत मोठ्याचा शोध लागत नाही. तोपर्यंत हा निर्णय घेण्यास थांबू या. समजलं मी काय म्हणतोय ते.”

***
आशाची बहीण - “तुम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहात म्हणून तुम्हाला घरात घेतले समजलं का. आम्ही ब्राह्मण आहोत. तुझी आणि तिची बरोबरी होईल का?, तुझे शिक्षण काय... तू ऑफीसला काय काम करतो... चांगलं माहिती आहे मला. माझ्या नवर्‍याची आणि तुझी बरोबरी होऊच शकत नाही.”
आई - अगं, असं बोलू नकोस. गरीब आहे बिचारा. त्याने त्याचं मत ठेवलंय. आपण अजून कुठं काही त्याचं घर-दार पाहिलंय.
बहीण - “तू थांब जरा, मला बोलू दे. हिला अक्कल नाहीये. काय पाहिलंय याच्यात कोण जाणे. या पुढे तू इथे यायचं नाही. आणि तू उद्याच रिझाइन लेटर देऊन घरी थांबायचंय समजलंस. या आता तुम्ही...”
वडील - “तुम्ही दोघांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे. माझ्या स्वभावाचा तुम्ही फायदा घेतला. तुम्हाला काय करायचे आहे ते करा. मी आता आत्महत्या करतो. आता काही जगण्यात राम राहिला नाही. मला असं वाटलं होतं की, पहिल्या पोरीच्या वेळेस नाही समाजात उभं रहाता आलं दुसर्‍या पोरीचं तरी कन्यादान करीन. पण हे सुख तरी कुठे आहे माझ्या नशिबात.”

***
ठाकरे साहेब - “तुमची पत्रिका जुळतेय पण तुमच्या हट्टापायी ही पत्रिका वाडीत पाठवली होती खरी पण; त्यांनी स्पष्ट नाही म्हणून सांगितले. आता तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. तुमचा स्वारींवर विश्वास असेल तर त्यांच्या निर्णयाला ठाम रहा. बाकी तुमची मर्जी.

***
तात्या - “या घरात लग्नाचा तूच एकटा राहिला आहेस. लहाण्याचे जमून आले आहे. तुझं वय बघ. नंतर तुला कोणी विचारणार नाही. एकटा कसं जगशील. एवढा हट्टीपणा काय कामाचा. तू एक उत्तम परमार्थ करतोयेस. त्याला गालबोट लागेल. इतरांचा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. निदान तुझ्या आईकडे बघ. अप्पा गेला, मोठा कसा वागला त्यामुळे  तो घर सोडून गेला. तुझी आई खचून गेली आहे. तिचा विचार कर. तिच्या मागे आता तुम्हीच आहात.”

***
आशा - “माझा निर्णय झालाय. माझा विचार सोड. मी होऊन जाईल सेटल. पण तुला तुझे करिअर आहे. आपण आपल्या आई-वडिलांच्या म्हणण्यानुसार जाऊयात. ते सुखी तर आपण सुखी. या समाजाचे आपण देणं लागतो. हे कर्ज याच जन्मात फेडून जायचे आहे. राहिली आपली मैत्री. ती कायम अशीच टिकून राहील.”

एक एक प्रसंग मॅकीच्या डोळ्यासमोरून भरभर जात होता. तेवढ्यात फोन वाजला. फोन आशाचाच होता. त्याच आतुरतेने मॅकीने फोन उचलला पण; फोनवर त्याची बोलण्याची हिम्मत होईना.

“हाऽऽ... बोल रे” अगदी नेहमीच्या आवाजात आशाने साद घातली. जसे काही झालेलेच नाही. आणि मॅकी पुन्हा रडायला लागला.

“अरे तू रडतोस का?, काय झाले तुला? तुला माझ्याबद्दल काही समजले का?”
“जाऊ देत. त्या पायाने काही दुर्गुण केले असतील म्हणून तो गेला. अजून एक पाय आहे ना. मी कुठं मेलीये आणि तुझ्याशी पहिल्यासारखेच बोलतीय ना... मग... रडणं थांबव आता; नाही तर मलाही रडू येईल.

मॅकी रडता रडता, “अगं कुठल्या मातीची बनलीयेस तू. दुसर्‍याला आनंदी ठेवता ठेवता किती दुःख पदरात पाडून घेतली तू. तुला हे कसं जमतं? इतके कसे सहन करतेस? जुळी मुलं झाली आणि दुसरीकडे अपंगत्व! घरच्यांची इच्छा पूर्ण करता करता किती नुकसान करून घेतलं स्वतःचं.”

“जाऊ दे रे... पण मला काही वाटत नाही त्याचं. दुःख एवढेच आहे की, सासूबाईंनी नातवंडांची तोंड सुद्धा बघितली नाही रे. सासूबाईं गेल्या...”

मॅकी अवाक झाला. आशाच्या सांगण्यावरून सासूबाईंना नातू हवा म्हणून त्या तगादा लावत होत्या. म्हणून यांनी दवाखाना, पंचकर्म, पथ्य-पाणी असे प्रयत्न चालू केले. काही महिन्यांनी सगळं जुळून आलं. जुळी असल्याचे कळले. डिलेव्हरी झाली. त्यात औषधांची रिअ‍ॅक्शन झाली. पायाला गँगरींन झाले. पाय गेला. इकडे सासूबाईंना अटॅक आला. अभिमन्यूची खूप धावपळ झाली. या सगळ्या गोष्टी लागोपाठ होत गेल्या. हे एकदम आभाळ कोसळावं असं आशाच्या बाबतीत झालं होतं.

फोनवर आशा बरंच काही बोलत होती. नवर्‍याविषयी तोंडभरून कौतुक करत होती. “पण माझा नवरा खूप चांगला आहे. आता तर मी त्याच्यावर पहिल्यापेक्षा जास्त प्रेम करायला लागलेय.”
रडण्याचा हुंदका आवरेना तरीपण “मी पुढील आयुष्यात अभिमन्यूला साथ देऊ शकणार नाही आता. कारण मी झाली पांगळी, हे दोन पोरं, त्यात सासूबाई गेल्या, डोक्यावर हॉस्पिटलचे हे भलामोठ्ठे खर्च. माझ्या नवर्‍याने हु का चु केले नाही. पण बिचारा अजूनही माझं करतोय. माझ्या कापलेल्या पायाला बँन्डेज तोच लावतो. कामावरून आला की पहिले हे काम करतो. जेवताना माझ्याबरोबर बसतो. पोरांचे शी-शुु तोच काढतो.” असं बरंच काही आशा सांगत होती.

त्या दोघांचे एकमेकांवरील प्रेम पाहून खूप बरे वाटत होते. या सगळ्या प्रकारला सात-आठ दिवस निघून गेले होते. आशा बर्‍यापैकी या धक्क्यातून सावरली होती. त्यात हॉस्पिटलचे कौतुक करतांना मॅकीच्या मुलाची ट्रिटमेंट ‘येथेच कर’ असेही आशाने बालून दाखवले.

खरंच, परमार्थ काय शिकवतो याची जाणीव आशाच्या बोलण्यातून पदोपदी होत होती. मॅकी व आशाला एकच शिकवण होती. तिची निष्ठा दांडगी होती. एक वेळेस सांसारिक कमी पण पारमार्थिक जास्त बोलेल.

“फोन तास दीड तास चालला. जुन्या-नवीन आठवणींना उजाळा मिळत होता. पण जुन्यातील ती आशा आता राहिली नव्हती. कदाचित तिलाही जुन्या गोष्टींबद्दल बोलायचे नव्हते. असो... जुन्या गोष्टीत मी मात्र मलाच शोधत होतो.


बर्‍याच महिन्यांनी आशाला भेटण्याची वेळ आली. आशा काही दिवसांसाठी माहेरी गेलेली होती. मॅकीच्या त्यावेळच्या जुन्या सहकार्‍यांपैकी रूपाने मॅकीला फोन करून आशाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. रूपा पुण्यावरून खास आशाला भेटायला येणार होती. त्याप्रमाणे त्यांनी जाण्याचे ठरविले. मॅकीने ठरल्याप्रमाणे मुलाला बरोबर घेऊन तिला स्टेशनवरून पिकअप केले.

घराचे दार वडिलांनी उघडले. मॅकीने त्यांना पाहिले.
“नमस्कार, कोण आपण.” आशाचे वडील.
“मी रूपा... आशाची मैत्रीण. आशाऽऽऽ?”
“हो हो... आहे ना. या ना आपण.” अगदी अदबेने वडिलांनी वाट दाखवत आम्हाला आत घेतले. जुन्या घराच्या जागी आता बंगला होता. वडिलांनी जिन्याकडे बोट करत जायला सांगितले.

जिना चढत असतानाच आशा समोर दिसली. आशाने मोठे डोळे करत मॅकीकडे पाहिले. मॅकीही अगदी एकटक बघत होता. लग्न झाल्यानंतर बर्‍याच वर्षांनी एकमेकांना पाहिले होते. आशा पूर्वीपेक्षाही गोरीपान, गुबगुबीत झाली होती. पांढर्‍याशुभ्र ड्रेसवर छान दिसत होती. आशाने पायावर पांघरून घेतले होते. तिच्या पुढे दोन्ही पोरं खेळत होती. खेळण्या अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. आशाने आम्हाला बघितल्यावर तिच्या डोळ्यात पाणी तरळले पण पटकन झाकलेही. “या या तुमचीच वाट बघत होते मी.” पुन्हा तीच साद घालत बोलण्यास सुरुवात केली.

मॅकीचा मुलगा आशाच्या मुलांबरोबर खेळत होता. मॅकी आशाकडे बघत होता. आशा जमिनीवर बोटाने रेघोट्या ओढत होती. पोरांचा आवाज सोडलातर बाकी सगळं शांत होतं. तोपर्यंत वडील पाणी घेऊन आले होते.

“बाबा याला ओळखलंत का? हा मॅकी.” पूर्वी घरी आला होता वगैरे करत आठवण करून देत आशा बाबांना सांगत होती.
बाबांनी मॅकीला ओळखलंही. पाणी दिले. मॅकीला डोळे भरून पाहिले. आणि हात जोडून “बाबा, काही चुकलं असेल या म्हातार्‍याकडून तर माफ कर. हे बघ काय झाले रे माझ्या पोरीचे.” बाबांनी आशाच्या पायाकडे दोन्ही हात करत केविलवाणे मॅकीकडे बघत होते.
“बाबा..., जाऊ द्या ना. हे आमचे कर्माचे भोग आहेत. यात तुमची काहीही चूक नाहीये. माझे हे असे झाले. मॅकीच्या मुलाला पहा. तो गतीमंद आहे. मॅकी किती आधीपासून लढतोय त्या गोष्टीशी. हे आमचे प्रारब्ध आहे.”

बाबा थोडे सावरले आणि मॅकीच्या मुलाकडे बघू लागले. तेवढ्यात आशाची बहीण तिथे आली. तिने सगळ्यांकडे पाहात मॅकीकडे एकटक नजर लावली. जणू याला कुठे पाहिले आहे का? अशी.
आशानेच जुनी गोष्ट सांगून तिचा पेच कमी केला. मॅकीच्या मुलाचे आशा बहिणीला सांगत होती.

चहा पिता पिता आशाची बहीण मॅकीच्या बायकोबद्दल विचारत होती. कोण, कुठली, किती शिक्षण झाले वगैरे वगैरे. मुळात तिला मॅकी आधीपासून आवडतच नव्हता. तिला मॅकी सध्या काय करतो आहे  याची जास्त उत्सुकता होती. तशी ती खुन्शीनेच मॅकीकडे बघत होती. पण तिला हे माहीत नव्हते की, आशा आणि मॅकी हे लग्नानंतरही मित्र म्हणून बरोबर होते. एकमेकांच्या संसारातील सुख-दुःखाच्या गोष्टी शेअर करत होते. एकदा तर मॅकीने आशाच्या सासरकडील आडनावावरून तिच्या बहिणीला चिमटा काढला होता. म्हणे की, ‘तुझ्या बहिणीला मॅकी नको पण आडनावं बरी चालतात’ म्हणून. कारण योगायोगाने दोघांची आडनावं सारखीच झाली होती.
असो... कुणाच्या मनात काय चाललं आहे कुणास ठाऊक. एक वेळ ‘या पुढे तू इथे यायचं नाही.’ अशी म्हणणारी आशाची बहीण आता नरमली होती. कारण तिच्याच निर्णयाने पुढील गोष्टी घडत गेल्या.

बोलण्यात बराच वेळ झाला होता. रूपाला पुण्याला जायचे होते. रूपाने आशाच्या मुलांच्या हातात पैसे दिले आणि आम्ही काढता पाय घेतला.

‘आशा आणि मॅकीची अशा पद्धतीने भेटे होईल असे कधीच वाटले नव्हते.’ हे रूपाने बोलून दाखवले होते. खरेतर अपंगत्व दोघांनाही आले होते. मॅकीलाही त्याच्या गंतीमंद मुलामुळे पुढे काहीही करता आले नाही.

कुणाच्या आयुष्यात काय होईल हे सांगता येणं मुश्कील आहे. पण आशा आणि मॅकीच्या आयुष्याचे निर्णय कोणीतरी घेऊन मोकळे झालेले होते.
आणि आता ‘तुम्ही आणि तुमचे आयुष्य !’... अशा बेभरोशावर सोडून दिले होते. आयुष्याच्या या वळणावरती दोघांवरील बंधनं कदाचित मोकळे झालेले होते. पण घेतलेले निर्णय आणि आलेली जबाबदारी हे स्वीकारणं यापुढे काहीही पर्याय राहिला नव्हता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या गाडीच्या स्टीयरिंगवर कोणालाही बसू देणार नाही.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचतो न पोहोचतो काही शासकीय अधिकारी आणि प्रेसमधील मला ओळखणार्‍यांपैकी “तुम्ही इथे!; मग रावसाहेबांबरोबर ते दोघे कोण होते?” असं विचारायला सुरुवात केली. ते काय बोलत होते मला काही समजले नाही. पण इतके सारे लोकं जमल्याने रावसाहेबाविषयी नक्की वाईट बातमी होती. हे नक्की. त्यातील एका मित्राने माझा हात धरून बाजूला नेले. वॉर्ड नंबर सांगून ‘तिथे जा आणि ते दोघे कोण आहेत ते बघ’ असे सांगून पाठवत होता. त्याचा हात झटकत “रावसाहेब कुठे आहे?” मी रागावून प्रश्न केला. “ते...ते.. पोस्टमार्टम रूम मध्ये आहे.” क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि तेथून निघालो. जाता जाता त्याने ‘रावसाहेबांबरोबर तू आणि अण्णा आहेत असे सगळ्यांना वाटले म्हणून त्यांनी तुला आल्या आल्या असे विचारले.’ असं सांगत होता. वार्डात जाऊन नर्सना रावसाहेबाबरोबर अजून दोन व्यक्ती कुठे ऍडमिट आहेत म्हणून विचारले. नर्सने रजिस्टर बघता बघता “ते दोघे नाहीत तिघे आहेत. एक आयसीयूमध्ये ऍडमिट आहे आणि...” बेडकडे बोट करून “ते दोघे तिथे आहेत.” डोळ्यावर, डोक्यावर पट्टी केलेली, हात गळ्यात बांधलेला, सलाईन लावलेली अशा अवस्थेत ते दोघे पडलेले दिसले. कद...

15 दिवस माझे आणि...

मला पंधरा दिवस बाहेरगावी जाण्याची वेळ आली. बायको म्हणाली, “पोराला घेऊन मी नाही घरी एकटी राहणार; एक तर तो माझं ऐकत नाही. खूप त्रास देतो. सारखा ओरडतोे.” “मग जुन्या घरी जा!” असं मी म्हटल्याबरोबर बायकोने जे भांडणाचा सुर सुरू केला की, माझाही तिच्याबरोबर सुर जुळून गेला. अखेर भांडण घराच्या कामावर येऊन ठेपले. “तुम्ही घरकाम एकदा करून बघा; मग तेव्हा कळेल की किती दमछाक होते ते!” - बायको यावर मी ते चॅलेंज स्वीकारले, “ठरलं तर मग मी गावाहून शनिवारी घरी येणार आहे. तूपण माहेरी जा आणि डायरेक्ट सोमवारी ये. मी रविवारी अख्खा दिवस घरीच थांबेल. घरातील बाकीचे कामे, दोन वेळची भांडी, स्वयंपाक या सर्व गोष्टी पूर्ण करून रात्री आपण फोनवर चर्चा करू.” असे आमच्या दोघांमध्ये पक्के झाले. बायकोला दुसर्‍या दिवशी गाडीत बसवून माहेरी रवाना केले. मीही त्याच रात्री कामासाठी बाहेर गावी निघून गेलो. ती माहेरी अन मी गावी असतांनाच्या काळात नेहमीप्रमाणे फोनवर बोलताना तावा-तावात भांडायचे काही कमी केले नाही. तोपर्यंत मी ‘रविवारचे घर सांभाळायचे’ बाशिंग बांधून घेतले; आणि हिने ‘बघू कसा करतो ते!’ म्हणून बांगड्या वर केल्या. अखेर मी शनिवा...

वैष्णव देवींचा प्रवास भाग 1

“अंकल कुछ लेलो ना!” त्या चिमुकलीने तीन-चार स्वेटरचे पॅकिंग दाखवत विचारले. “अगं हे मुलींचे आहे. हे माझ्या काय कामाचे” त्यातलं एक स्वेटर हातात घेऊन बोललो. “अरे ती हिंदीत बोलत आहे. तुझी मराठी समजेल का तिला.” भाऊ हसतच म्हणाला. “मुझे मराठी समझ मे आती है. अंकल, आण्टी के लिए ले लो ना!” खूप आग्रह करत तिने केविलवाणे तोंड केले. “इसकी अभी तक शादी नही हुई है । शादी होने के बाद ले लेंगे !” खवचटपणे रावसाहेब बोलला. थोडा हशा पिकला. “अहो, असं का त्यांना चिडवता! उगीचच आपलं काही तरी” रावसाहेबांची बायको त्याला दटावत बोलल्या. अंकल काही घेणार नाही म्हणून ती पुढे निघून गेली. तेवढ्यात माझा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. “मी बोलतेय. हा माझ्या भावाचा नंबर आहे. तुम्हाला वेळ आहे का?” हा तिचाच फोन होता. घाईघाईने दरवाजाजवळ जाऊन बोलायला लागलो. “माझी तयारी आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना!” तिने हे बोलताच. “अरे वा... थँक्यू थँक्यू” म्हणत जागेवर उडी मारली. माझ्यामागे भाऊ कधी येऊन उभा राहिला समजले नाही. तो अगदी दबक्या आवाजात “अरे अशा वेळी थँक्यू थँक्यू म्हणायचे का?” असे म्हणत त्याने कपाळावर हात मारला. आणि “चालू दे......