टकू खूप चिडचिड करतो, त्रास देतो, लवकर झोपत नाही. जसजसा मोठा होत चाललेला होता तसतसा त्याचा जास्त त्रास होत होता. आमच्याही दोघांची सारखी चिडचिड होत असे. एका भल्या माणसाने आम्हाला डॉ ब्रॅण्डीचा उपाय सांगितला.
आता सांगितल्याप्रमाणे दोन आठवड्यातून एकदा एक चमचा औषध पोर्याला द्यायचे आणि उरलेले आम्ही दोघांनी घ्यायचे म्हणून दुकानातून एक छोटी बाटली घेऊन घरी आलो.
त्या रात्री मस्त दोन काचेचे ग्लास काढले.
बायको म्हणाली “अ..हं.. तिघांनीही एक-एक चमचा घेवू. एकखट्टी संपवायची नाहीये ती. ते ग्लास ठेवून द्या आणि जेवायला बसा”.
मी मिश्किलपणे बाटलीला पाहिले, ‘एक-एक चमचा छ्या... च्यामारी ओठाला लावायची की पोटाला काही कळतच नाही राव...
“आता नको. नंतर बघू केव्हा तरी...” असं म्हणत बाटली फ्रिजमध्ये ठेवून दिली.
बायको चिडून “आला तुम्हाला राग. जशी कायी बाटली त्याला नाही तुमच्यासाठीच आणलीय.”
मनात विचार आला ‘रात्री गुपचुप पिऊन संपून टाकू एकदाची. तुलाही नको नि त्यालाही नको.’ असं म्हणत झोपी गेलो.
***
दोन-तीन दिवसांनी परत ती बाटली काढून बाहेर ठेवली. म्हंटलं नोर्मलला आली की रात्री तिला आणि मला दोन-दोन पेक करू आणि संपून टाकू.
बायकोनी बाटली बघताच क्षणी “अरे हो, मी विसरलेच की. बरं झालं तुम्ही बाटली काढली. तिघांना एक-एक चमचा द्या. नि जेवायला बसा.
च्यामारी तिचा तो चमचा-चमचा ऐकून ती ब्रँण्डी कमी टकूची सर्दी-खोकल्याची बाटलीच जास्त वाटत होती.
“अगं ती आत्ता नाहीच घ्यायची. खूप गार झाली आहे ना. म्हणून गरम करायला बाहेर ठेवली आहे. आपण बघू कधी तरी नंतर घेवू हं... तू जेवायला वाढ.” म्हणून बाटली तशीच पडू दिली.
जेवता-जेवता मी बाटलीला आणि बाटली मला पहात होती.
***
असेच काही दिवस निघून गेले. रात्री झोपतांना “अहो. त्या बाटलीचे काय करायचे? टकूलाही दिली नाही. आपणही घेतली नाही. तशीच पडून आहे. खराब नाही ना होणार?”
मी मनात विचार करत म्हटलं ‘प्यायला काढली तर तुझा चमचा मधे येतो. चार बोटाची बाटली ती. म्हणे चमचा-चमचा घेवू. कधी संपायची ती. म्हणे खराब तर नाही ना होणार!’
“जाऊ दे गं. माझी नाही इच्छा. बघू बाटलीचे काय करायचं तेे.” मी वैतागून म्हणालो.
बायकोने ओठाच्या कडा खाली करत “हमम.. जाऊ द्याऽ... आपल्याकडून नाही व्हायचे ते. आपण ना... असं करू, रोज गरम पाणी पेऊ. आणि तुम्ही ना... ही बाटली सकाळी घंटागाडी वाले त्या कांकांना देवून टाका अं...! झोपा आता... तुम्ही”
मी आपला करवट बदलत डोक्यावर हात मारला. डोक्यावरून चादर घेत म्हंटलं ‘ते गरम पाणीही नको आणि ते रंगीत पाणीही. आपलं हंड्यातलं कोमट पाणीच बरंये’ असं म्हणत झोपी गेलो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा