रखरखत्या उन्हात आम्ही चौघे व्हिडिओ गल्लीत फिरत-फिरत एका निमुळत्या गल्लीत पटकन शिरलो. आम्हाला कुणी ओळखीच्यांनी पाहू नये म्हणून डोक्याला नाही पण तोंडाला रुमाल लावलेला होता.
एक इसम “पाँच रुपये... पाँच रुपये... पाँच रुपये...” करत तिरप्या नजरेने भुवया वर करत आम्हाला खुणावत होता.
घुंगराळे केस, एका कानावर दात कोरायची काडी, डोळ्यात सूरमा, तोंडात बारचा बोकणा, कानात बाळी, एका हातात रुमाल बांधलेला, शर्टाची बटणं उघडे, लोंबलेला बनियन, पायात स्लिपर खालून वाकडी तिकडी वळवलेली पॅन्ट असा सुकलेला एक इसम “चल आता क्या?... 15 मिनट का खेल है. माल एकदम गरम है.”
आम्ही एकमेकांकडे बघत त्याला पैसे दिले. तो दुसर्या निमुळत्या गल्लीत घेऊन “ये खुर्सी लो, अंदर जाके बैठो. शो अब्बी चालू होएगा.” असे म्हणत तो काळवंडलेला पडदा खासकन बाजूला केला. आत काही लोकं बसलेली दिसली. जणू काही व्हॅम्पायरच दिसत होती. त्याने जसा पडदा खाली सोडला तसा काळाकुट्ट अंधार झाला. लख्ख प्रकाशातून एकदम अंधारात आल्याने काहीच दिसत नव्हते. धडपडत-चाचपडत कुठेतरी खुर्च्या मांडल्या. आमच्या पाठोपाठ काहीजण खुर्च्या घेऊन आमच्या पुढे येऊन बसल्या.
त्या बंद खोलीत लाल झिरोचा बल्प लावलेला. समोर विटांच्या भिंतीवर पांढर्या रंगाचा चौकोन दिसत होता. शेजारीच डोक्यापाशी कुरकुर आवाजाचा टेबल फॅन लावलेला होता. वासावरून कोणी बिडी ओढत होतं, कोणी पिऊन आलेले होते. तेवढ्यात माझ्या शेजारच्या माणसाने भरपूर कांदा खाल्ल्याची ढेकर दिली. इतका भ्पकन वास आला की, मला उलटी होईल इतका नाकाला झोंबला. तोंडाला हात लावून उठणार तर माझा पाय कुठेतरी अडकला नि अण्णाच्या अंगावर पडलो.
“देऊ क्या तेरे कान के नीचे, क्यू खुर्सी हिला रहा है...” असं त्या दारूच्या नशेत असलेल्या माणसाने धमकावले.
अण्णाने मला सावरत परत खुर्चीवर ओढले.
“अरे माझ्या चप्पलेवर त्याने खुर्ची ठेवली आहे. म्हणून मी पडलो...” मी अण्णाच्या कानात कुजबुजलो.
अण्णाने कपाळावर हात मारला नि “शांत बस्सऽऽऽ...” म्हणून गप केले.
अंगाला घामाच्या धारा सुरू झाल्या. ‘कशाला या कबाडखाण्यात जीव द्यायला आलो’ असं वाटू लागलं. मला ते नको नकोस झालं होतं.
तो सुकलेला इसम “तेरी माँ की... अभी तक लगाया नही क्या? अब क्या बारात आएगी तब लगाएगा क्या? चल लगा साले...” असा शिव्यांचा पाडा गावून खसकन पडदा टाकून निघून गेला. तो नेमका कोणाला बोलला काही समजले नाही.
मी घाम पुसतांना ब्लप बंद झाला. त्या पांढर्या चौकोनात चित्र दिसायला सुरुवात झाली. अण्णा चष्म्याच्या काचा पुसून तोंड पुढे करून बघू लागला. माझं अर्ध लक्ष पडद्याकडे, अर्ध चपलेकडे. कशी काढू म्हणून जिवाची तगमग होत होती. टेबल फॅनचा आवाज आता जोराचा वाटू लागला. अचानक बाहेरून सायरनचा आवाज ऐकू आला. आणि खोलीत एकच हल्लकल्लोळ माजला. “भाऊ पळ पोलीस...”.
लोकं खोलीचा पडदा फाडून बाहेर पडली. मी माझी चप्पल, भाऊ त्याचा चष्मा सावरत अक्षरशः त्या गर्दीतून फेकल्या गेलो. वाट मिळेल तिथून पळत सुटलो. माझा एक पाय गटारीत आणि दुसरा कशाने माखला काही समजले नाही.
त्या गल्लीतून कसाबसा सुटून आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. एका पडक्या वाड्यापाशी मोठमोठाले श्वास घेत थांबलो. आजूबाजूला बघ्यांची गर्दी झाली. आम्ही त्या गर्दीत घुसून गेलो. ‘आम्ही त्यातले नाहीच’ अशा आविर्भावात त्या गर्दीतच उभे राहिलो.
समोरील दृश्य बघू लागलो. त्या निमुळत्या गल्लीच्या तोंडापाशी पोलिसांची गाडी उभी होती. तिथे बर्याच जणांना पोलिसांनी फटके मारमारून गाडीत घालत होते.
हृदयाचे ठोके वाढले होते. घसा कोरडा पडला होता. मला उन्हाचे चटके बसत होते. कारण त्या गर्दीत माझी चप्पल गेली. भाऊचा चष्मा गेला. आमच्या दोघांची पूर्ती गाळण उडाली होती. मी चेहेर्यावरचे पाणी पुसून-पुसून थकून गेलो होतो.
अण्णांने “चल” म्हणून गंगेकडे निघालो. स्मशानापाशी मारुती मंदिरात वरंड्यावर बसलो. तोपर्यंत मी गंगेच्या पाण्यात पाय सोडले, तोंडावर भराभरा पाणी मारले. पाय स्वच्छ केले. आणि सुटकेचा श्वास सोडला.
“भाऊ... माझी नवीन चप्पल गेली रे...”
“तू काय तुझी चप्पल घेऊन बसलाय... माझ्या चष्म्याच्या काचा गेल्या. ते पण मरू दे... आपण पोलिसांच्या तावडीतून सुटलो... नाही तर आपल्या घरच्यांनी आपली आरती केली असती.”
“भाऊ, तुला काय सांगू..., गॅरेजवर आणि कॉलेजला जायला एकच चप्पल होती; म्हणून पप्पांकडे चप्पलसाठी पैसे मागितले तर पप्पांनी वीस रुपयाची नोट पुढे करून ‘बुधवारच्या बाजारात चांगली स्लिपर मिळते ती घेऊन ये’ असे म्हटल्याबरोबर मी त्यांच्यावर चिडून गेलो, ‘पप्पा, मी कॉलेजला जातो. ही स्लिपर घालून गेलो की, मित्र हसतात.’ असं बोलून पैसे न घेता निघून गेलो. शेवटी मोठ्या काकांकडून शंभर रुपये घेऊन ही महाग चप्पल आणली. आणि ती अशी गेली. घरच्यांनी विचारलं तर काय सांगू.”
“च्यायला चुकलं सालं. नसतं त्या दोघांचं ऐकलं असतं तर आज अशी फजिती झाली नसती.”
“चल” म्हणून त्याने माझा हात धरला आणि बुधवारच्या बाजारात घेऊन गेला. गाड्यावरून वीस रुपयाची स्लिपर घेतली आणि घरी आलो.
दुसर्या दिवशी पप्पांबरोबर गॅरेजवर काम करताना “अरे वा... चांगली चप्पल घेतलीस तू. केवढ्याला घेतलीस...” असं म्हटल्याबरोबर झालेला सगळा प्रकार डोळ्यापुढे आला.
“अरे मी तुझ्याशी बोलतोय...”
“अ... हं.. वीस रुपयाला” मी मान खाली घालून त्यांच्यासमोरून निघून गेलो. गाडीची स्प्रिंग चढवत असताना “तुझ्यासाठी अजून एक नवीन चप्पल घेऊन ये, ही स्लिपर गॅरेजमध्ये वापर आणि नवीन कॉलेजला घालून जा.”
पप्पा बोलत असताना नकळत त्यांच्या चपलेकडे माझे लक्षं गेले. चार पदर मोकळे झालेले आणि खिळे ठोकलेली ती चप्पल पाहून डोळ्यात टचकन पाणी आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा