मुख्य सामग्रीवर वगळा

आत्महत्या

तावा-तावा पायर्‍या चढत गच्चीवर गेलो. डोक्यात सणक गेली होती. जोरजोरात हात, पाय झाडत होतो. साचलेल्या पावसाच्या पाण्याने अंगावरचे कपडे खराब करून घेतले. दात आवळत, हाताची मूठ कठड्यावर मारत होतो. राग कोणावर व्यक्त करावा असं झालं होतं. गच्चीवरून खाली सोसायटीतल्या गाड्या दिसत होत्या. असं वाटत होतं सरळ स्वतःला झोकून द्यावं.


कठड्यावर उभा राहिलो. जीव घाबरत होता. प्रयत्न होत नव्हता. कापसासारखा पाऊस चालू होता. वार्‍याची सर मागे ढकलत होती. पोटात भीतीचा गोळा उभा राहिला.



“डबा तयार आहे खाली या” हिने खालून आवाज दिला.


“श्याऽऽऽ.. च्या आईला...” म्हणत कठड्यावरून उतरलो. टाकीत पाणी किती आहे हे बघण्यासाठी लोखंडी जिना चढत असताना जाडी काळी ढभुरी पाल पाइपावरून पळताना दिसली आणि पळताना धापकन गच्चीवर पडली. तिची काहीच हालचाल दिसत नव्हती. कदाचित मेली असावी.

पाण्याच्या टाकीत डोकावून पाणी बघून खाली उतरलो तर गच्चीवर ती पाल कुठेच दिसली नाही.



घरात शिरताच पुन्हा हिने भांडणाचा सूर ओढला.  “हे काय..., पाणी पाहिला गेले होते; मग कपडे कसे काय खराब झाले! पडले की काय?.”

मी एक नाही दोन नाही.

“येतांना भाजी घेऊन या. त्याचे फिट्सवरचे औषधं आणायचे आहे. पैसे काढून आणा. घरात खर्चायला पैसे नाहीये. संध्याकाळी लवकर घरी या. घरात वापरायला पाणी नाहीये. याला अजून खाऊ घालायचे आहे. या कार्ट्याने नुसता छळ मांडलाय काहीच काम सुचू देत नाहीये. आयुष्याची नुसती  फद-फद झालीये... ... ...”


कार्ट्याला सर्दी, ताप, खोकला झाला म्हणून चिडचिड, उचल-आपट चालू होती. त्याला सांगताही येईना, बोलताही येईना.

दोघांची आरा-तर्‍हा पाहिली रेनकोट घातला. दप्तर, डबा उचलला आणि बाहेर पडलो.


गाडीला किका मारून-मारून कशीबशी चालू केली.  एव्हाना पाऊस जोरात चालू झाला. मूठ पिळत भरधाव गाडी वडाळा गावात पोहोचली नाही ती टायर पंक्चर झाले.


वरती धो-धो पाऊस. खाली रस्त्यावर पाणीच पाणी. त्यात ही मुसीबत. खूप अंतर गाडी ढकलत पंक्चरचा एक बोर्ड दिसला.

तिथे जाऊन पाहातो तर त्याच्या दुकानात पाणीच पाणी. तो गाडी खोलायला तयार नव्हता. नाही हा करत एवढ्या पावसात पंक्चरवाल्याला गाडी खोलायला लावली.



“ भाई टायर-ट्यूब दोनो डालना पडेगा.” पंक्चवाला.


“अरे नही. कुछ भी जुगाड कर. लेकिन तू गाडी चालू कर.” मी वैतागून म्हणालो.


“अरेऽऽ लाइट नाहीये. मेरा पुरा सामान पाणी मे है. तुम्हारा टायर-ट्यूब पुरा गया है. तुम बस्स नया लाके दो नही तो छोड दो.” तोपण वैतागून बोलत होता.


गाडीला खूप शिव्या हासाडल्या. खिशात पैसे नाही. रेनकोट फाटलेला, आतले कपडे, बॅग पूर्ण ओले झाले होते. गाडी ओढून हात-पाय खूप दुखत होते.


त्यात जवळ असलेले एटीएम मशीनही बंद होते. खालून बूट फाटल्याने पाय दुखायला लागला होतो. खूप पायपीट करून एका मशीनमधून होते नव्हते सगळे पैसे काढले आणि पंक्चरवाल्याला दिले.


गाडी जशी चालू झाली तशीच दामटत नाशिकरोडला पोहोचलो. 


तिथल्या जॉबचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यात हा असा उशीर झालेला. बॉसची बोलणी खात-खात दिवस कसाबसा रेटला.


***

रात्री रस्त्यावरचे लाइट गेले होते. पाऊस काही थांबायचे नाव घेईना. ऑफिसला शेवटचा रामराम केला. मिळेल तेथून भाजी घेऊन घरी आलो. तोपर्यंत कार्ट्याने तिचा पारा वर करून ठेवला होता. अंगावरचे ओझे उतरवत असताना तिने दिवसभराचा पाढा सांगायला सुरुवात केली.


माझा थंड झालेला पारा चढला आणि कार्ट्याला बदडायला सुरुवात केली. मी थांबत नाही म्हणून ही मध्ये आली आणि तिचाही गळा दाबला.


तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत असताना तिचे निस्तेज बारीक झालेले डोळे पाहून माझा हात सैल झाला. ती खोकत-खोकत खाली पडली.

पोरगा पुरता घाबरलेला, अंगाचे कापरे होत हुंदके देत रडत होता.

समोर आरशाच्या कपाटात विस्कटलेले केस, मोठे विस्फारलेल्या डोळ्यांचा काळाकुट्ट राक्षसासारखा दिसणारा माझा चेहेरा मी बघत होतो.



डबडबलेल्या डोळ्यांनी माझे हात बघत होतो. अंगाला घाम, घामाचा वास, ‘मी काय करत होतो’ याची किंचितशी जाणीव झाली.



***

मिळेल ते कपडे घालून तसाच घरा बाहेर पडलो. मागे वळून बघितले नाही. गल्ली क्रॉस करत मुख्य रस्त्याचा दुतर्फा ओलांडताना माझा तोल गेला आणि सुसाट वेगाने येणारा ट्रक जवळून गेला. ट्रकवाला शिव्या देत निघून गेला.

गाडी इतकी जवळून गेली होती की, छातीचे ठोके स्पष्ट जाणवत होते.


विचार करत-करतच गणपती मंदिराच्या परिसरात येऊन बसलो. इतक्या झटापटीत परिस्थितीत बदल होत होते जणू वातावरण माझ्यावर सूड उगवत होता की काय. दिवसभराच्या शिणाने पोटात कावळे कोकलत होते. उद्या नवीन जॉबवर रुजू व्हायचे ते वेगळेच टेन्शन होते. कपडे धडाचे नव्हते, बूट फाटलेला, त्यात मुलाची तब्येत बरी नाही, बायकोची चिडचिड जीव मेटाकुटीला आला होता. मोठ मोठाले उसासे सोडंत त्याच्याच परिसरात बसून त्यालाच न भेटता बाहेर पडलो.


पाऊस आणि डोक्यातील विचार थांबायचं नाव घेत नव्हते. रस्त्यावरचे दिवे सोडले तर परिसरातील सगळेच दिवे गेले होते. भरभर चालताना साप दिसला. तो त्याच रस्त्याने पुढे जात होता. तो अंधारात कुठे जाईल समजणार नाही म्हणून दुसर्‍या रस्त्याने घरी पोहोचलो.


दरवाजा उघडाच होता. दोघेही झोपले होते. हिने स्वयंपाक गरम करून ठेवला होता. मेणबत्ती पेटवून जेवायला वाढून घेतले. खाता-खाता दोघांकडे बघितले. आपण काय वागलो म्हणून डोळे परत भरून आले. नंतर जो बांध फुटला रडू आवरेना. ताटात घेतलेले तेवढेच खाऊन गच्चीवर जाऊन बसलो.


पाऊसाची संततधार पडत होती. गच्चीचा एक कोपरा पकडून पांडवलेणीकडे बघत बसलो. मंद हवा, सगळीकडे अंधार, वातावरण आल्हाद झालेले.

जिना चढून पाण्याच्या टाकीवर गेलो. एका बाजूला चामरलेण तर दुसर्‍या बाजूला पांडवलेणीचा डोंगर. मधे काळाकुट्ट आकाश, रस्ते ओस पडलेले, सगळे झोपी गेलेले, गल्लीत एक कुत्रंही नव्हतं, गच्चीवरून ती भयाण शांतता दिसत होती. 

परत खालच्या गाड्यांकडे लक्ष गेले. माझी गाडी बघत होतो.

‘माझ्या हातून आज मोठा गुन्हा झाला आहे. त्यासाठी शिक्षा मिळालीच पाहिजे. मार उडी...!’

उडी मारणार तीच पाल माझ्यापुढे उभी होती. हळूहळू ती माझ्या दिशेने येत होती. मी तसतसा मागे सरकत होतो. मागे लोखंडी जिना होता. खाली उतरण्यापलीकडे पर्याय नव्हता.


माझीच मला लाज वाटत होती. जीव द्यायचा होता पण एका पालीला घाबरून खाली उतरलो.


***

दुसरा दिवस. कोणीच कोणाशी बोलत नव्हते. टकू झोपलेला होता. तिने डबा तयार करून ठेवलेला होता. कालच्या प्रकाराबद्दल माफी मागितली. ती काहीही न बोलता काम करत होती.


पाऊस चालूच होता. मलाही निघायचे होते. पायर्‍या उतरत ‘टकुचे औषधं, पैशाची व्यवस्था, बाजार ... ...’ असे फिडींग करत गाडी पाशी आलो. किका मारूनही गाडी काही चालू होईना. दिवस नेहमीप्रमाणे चालू झाला. गाडी ढकलत जवळच्या गॅरेजवर लावून दिली. मित्रांकडून उसने पैसे घेऊन नवीन जॉबवर पोहोचलो.



पहिलाच दिवस. त्यामुळे कुणी काही बोलले नाही.

दुपारच्या जेवणापर्यंत वेळ व्यवस्थित गेला आणि तिचा फोन आला. “माझी एक बाजू अजिबात काम करत नाहीये. तुम्ही लवकर घरी या.”

माझ्या कपाळाला आठ्या पडल्या. वरिष्ठांशी रिक्वेस्ट करून तिथून निघालो. थेट गॅरेजवर गेलो. गाडी रिपेअर करून घरी पोहचलो. ही खुर्चीवर बसून होती. टकू पायापाशी बसलेला होता. तिला नीट उभेही रहाता येईना.पुढे काहीही न बोलता कंबरेत हात घालून तिला उचलले. एका बोटाला टकूला घेऊन हळूहळू पायर्‍या उतरलो.


दवाखान्यात पोहोचलो. डॉक्टरांना यायला वेळ होता म्हणून तिला तिथेच बसवले. टकुला घेऊन गणपती मंदिरात गेलो. गणपतीला बघितले न बघितले हात जोडून काहीच न बोलता ओट्यावर बसून घेतले. टकूला खेळवून दवाखान्यात परत निघून गेलो.


तिला चिकनगुनिया झाल्याचे सांगितले. सात दिवस आराम करायला सांगितला. पथ्यपाणी सांगितले.

घरी आलो. तिचे अंथरून वेगळे केले. टकूला एका कोपर्‍यात बसवले. तिने सांगितल्याप्रमाणे वरण-भात बनवला. स्वयंपाक, भांडी धुऊन ठेवली, फरशी पुसून ठेवली. दोघांना औषधं दिले. अंथरून केले.

टकूला झोपवतांना ‘त्याला आज फिटस्चा खूप त्रास झाला.’ म्हणून हिने सांगितले.


तो झोपी गेला. कॉम्प्युटरवर काम करू म्हणून कॉम्प्युटर चालू केला. तो पण चालू होईना. आजही सकाळपासून माझी पुरती गाळण उडाली होती. उद्या ड्युटी, इकडे घेतले काम ते पण पूर्ण होईना, घराचे भाडे, दोन महिन्याचे लाइट बिल, टकूची फिट्सवरील औषधं, स्वयंपाक, धुणी-भांडी, खिशात पैसे नाही. गाडीचा प्रोब्लेम, पाण्याचा प्रोब्लेम, लोकांकडून घेतलेली उसनवार हे सगळं बघून जीव थोडा-थोडा झाला होता.

आता कुठलीच परिस्थिती हाताळू शकत नाही असं अंग गाळून बसलो होतो. बाहेर पाऊस चालूच होता. तेवढ्यात लाइट गेले.



***

कसाबसा उठलो. रेनकोट घातला. जगतापांकडे केलेल्या कामाचे पैसे मागू. जे मिळतील ते घेऊन येऊ या विचाराने गाडी काढली.


गाडी चालवत असतांना ‘जर त्याने पैसे नाही दिले तर. एकच पर्याय होता. तो म्हणजे आत्महत्या करायची. बस्स...’ हा विचार आणताच क्षणी माझ्या गाडीपुढे एक वयस्कर इसम येऊन थडकला. गाडी थांबवत मी त्यांना काही बोलणार.

“माफ करा साहेब. माझ्या चष्म्यावर पाणी साचल्याने मला पुढचे काही दिसले नाही. मला बैठकीला जायचे आहे ओ. मी रस्ता चुकलो आहे. लाइटपण नाहीये. तुम्ही सोडून देता का?’


त्यांच्या तोंडून ‘बैठक’ ऐकल्याबरोबर ‘मला कुणीतरी अंधारात रास्ता दाखवणारा मिळाला’ असे वाटायला लागले. काकांनी मला न विचारता गाडीवर बसलेपण ‘चल...’ म्हणून हुकूमपण दिला.


गाडी बैठकहॉलपर्यंत पोहचल्या पोहचल्या ‘आत्महत्या करणे म्हणजे पुनरपि जननं पुनरपि मरणं - मरण तर असेही येणार आहे. मग आत्महत्या कशाला!.’ हेच शब्द कानावर पडले.


‘साहेब, तुमच्यामुळे मी वेळेवर आलो. आपला फारफार आभारी जयसद्गुरू!’ असे म्हणून ते काका हॉलमध्ये निघून गेले.

सगळे विचार क्षणात पुसल्या गेले. सैरवैर झालेले मन शांत झाले. खरे तर काकांमुळे मी वेळेत शुद्धीवर आलो.


हिला न सांगताच घरातून बाहेर पडलो होतो म्हणून जगतापांकडे न जाता थेट घरी पोहचलो.



***

सकाळी दूध आणायला बाहेर पडलो. पाऊस थांबून कोवळे ऊन पडले होते. त्या सापाला परिसरातील लोकांनी मारून टाकले असे लोकांकडून समजले.

टकूला ताप नव्हता. ही उठून बसली होती. पाणी सोडायचे म्हणून गच्चीवर गेलो. पालीचा शोध घेतला तर ती पाण्याच्या टाकीत पडली होती. टाकीवरच पाय सोडून पुन्हा खाली गाड्यांकडे बघत होतो.


आता ‘आत्महत्या’ नाही.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या गाडीच्या स्टीयरिंगवर कोणालाही बसू देणार नाही.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचतो न पोहोचतो काही शासकीय अधिकारी आणि प्रेसमधील मला ओळखणार्‍यांपैकी “तुम्ही इथे!; मग रावसाहेबांबरोबर ते दोघे कोण होते?” असं विचारायला सुरुवात केली. ते काय बोलत होते मला काही समजले नाही. पण इतके सारे लोकं जमल्याने रावसाहेबाविषयी नक्की वाईट बातमी होती. हे नक्की. त्यातील एका मित्राने माझा हात धरून बाजूला नेले. वॉर्ड नंबर सांगून ‘तिथे जा आणि ते दोघे कोण आहेत ते बघ’ असे सांगून पाठवत होता. त्याचा हात झटकत “रावसाहेब कुठे आहे?” मी रागावून प्रश्न केला. “ते...ते.. पोस्टमार्टम रूम मध्ये आहे.” क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि तेथून निघालो. जाता जाता त्याने ‘रावसाहेबांबरोबर तू आणि अण्णा आहेत असे सगळ्यांना वाटले म्हणून त्यांनी तुला आल्या आल्या असे विचारले.’ असं सांगत होता. वार्डात जाऊन नर्सना रावसाहेबाबरोबर अजून दोन व्यक्ती कुठे ऍडमिट आहेत म्हणून विचारले. नर्सने रजिस्टर बघता बघता “ते दोघे नाहीत तिघे आहेत. एक आयसीयूमध्ये ऍडमिट आहे आणि...” बेडकडे बोट करून “ते दोघे तिथे आहेत.” डोळ्यावर, डोक्यावर पट्टी केलेली, हात गळ्यात बांधलेला, सलाईन लावलेली अशा अवस्थेत ते दोघे पडलेले दिसले. कद...

15 दिवस माझे आणि...

मला पंधरा दिवस बाहेरगावी जाण्याची वेळ आली. बायको म्हणाली, “पोराला घेऊन मी नाही घरी एकटी राहणार; एक तर तो माझं ऐकत नाही. खूप त्रास देतो. सारखा ओरडतोे.” “मग जुन्या घरी जा!” असं मी म्हटल्याबरोबर बायकोने जे भांडणाचा सुर सुरू केला की, माझाही तिच्याबरोबर सुर जुळून गेला. अखेर भांडण घराच्या कामावर येऊन ठेपले. “तुम्ही घरकाम एकदा करून बघा; मग तेव्हा कळेल की किती दमछाक होते ते!” - बायको यावर मी ते चॅलेंज स्वीकारले, “ठरलं तर मग मी गावाहून शनिवारी घरी येणार आहे. तूपण माहेरी जा आणि डायरेक्ट सोमवारी ये. मी रविवारी अख्खा दिवस घरीच थांबेल. घरातील बाकीचे कामे, दोन वेळची भांडी, स्वयंपाक या सर्व गोष्टी पूर्ण करून रात्री आपण फोनवर चर्चा करू.” असे आमच्या दोघांमध्ये पक्के झाले. बायकोला दुसर्‍या दिवशी गाडीत बसवून माहेरी रवाना केले. मीही त्याच रात्री कामासाठी बाहेर गावी निघून गेलो. ती माहेरी अन मी गावी असतांनाच्या काळात नेहमीप्रमाणे फोनवर बोलताना तावा-तावात भांडायचे काही कमी केले नाही. तोपर्यंत मी ‘रविवारचे घर सांभाळायचे’ बाशिंग बांधून घेतले; आणि हिने ‘बघू कसा करतो ते!’ म्हणून बांगड्या वर केल्या. अखेर मी शनिवा...

वैष्णव देवींचा प्रवास भाग 1

“अंकल कुछ लेलो ना!” त्या चिमुकलीने तीन-चार स्वेटरचे पॅकिंग दाखवत विचारले. “अगं हे मुलींचे आहे. हे माझ्या काय कामाचे” त्यातलं एक स्वेटर हातात घेऊन बोललो. “अरे ती हिंदीत बोलत आहे. तुझी मराठी समजेल का तिला.” भाऊ हसतच म्हणाला. “मुझे मराठी समझ मे आती है. अंकल, आण्टी के लिए ले लो ना!” खूप आग्रह करत तिने केविलवाणे तोंड केले. “इसकी अभी तक शादी नही हुई है । शादी होने के बाद ले लेंगे !” खवचटपणे रावसाहेब बोलला. थोडा हशा पिकला. “अहो, असं का त्यांना चिडवता! उगीचच आपलं काही तरी” रावसाहेबांची बायको त्याला दटावत बोलल्या. अंकल काही घेणार नाही म्हणून ती पुढे निघून गेली. तेवढ्यात माझा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. “मी बोलतेय. हा माझ्या भावाचा नंबर आहे. तुम्हाला वेळ आहे का?” हा तिचाच फोन होता. घाईघाईने दरवाजाजवळ जाऊन बोलायला लागलो. “माझी तयारी आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना!” तिने हे बोलताच. “अरे वा... थँक्यू थँक्यू” म्हणत जागेवर उडी मारली. माझ्यामागे भाऊ कधी येऊन उभा राहिला समजले नाही. तो अगदी दबक्या आवाजात “अरे अशा वेळी थँक्यू थँक्यू म्हणायचे का?” असे म्हणत त्याने कपाळावर हात मारला. आणि “चालू दे......