मुख्य सामग्रीवर वगळा

स्टेटमेंट - संशय - विश्वास


पासबुक बघता बघता “मला चार दिवसात तीन महिन्याचे स्टेटमेंट पाहिजे.” पप्पा रागवून माझ्याशी बोलत होते.

“अहो पप्पा, मला इतकं कसं काय लक्षात राहणार की पैसे कसे कसे खर्च केले म्हणून...” मी

“का? तू डायरी मेंटेन करत नाही का?”

“हो; करतो. पण त्यात खर्च कुठे लिहितो.” मी

“ते काही सांगू नकोस. मागील एक महिन्याचा हिशोब पाहिजे म्हणजे पाहिजे” पप्पा आणखी रागावून बोलत होते.

मी मान खाली घालून त्यांचे बोलणे ऐकत होतो.

“मला वाटले होते की, तुम्हाला गॅरेजच्या बाहेर काढून सेविंगच्या बाबतीत काही शिकाल म्हणून. पण मी साफ चुकलो. इथे तर (पासबुक झटकत) खडखडाट आहे. बारा-पंधरा तास कामावर जाऊन तू करतो काय? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.”

पप्पा गुडघ्यांचा आधार घेत उभे राहिले.

आईकडे बघत “तुमच्या लाडक्याला काही जमत नसेल ना... तर बंद करा कामावर जाणं. गॅरेजवर परत या. काहीही होणार नाही यांच्याकडून.” पप्पा खूप चिडून बोलत होते.

“आहो पप्पा, आत्ता कुठे गॅरेजमधून बाहेर पडून स्क्रीन प्रिंटिंग शिकलो, कॉम्प्युटर शिकलो, आता कुठे जॉब मिळाला आहे. ते करून परत तुमच्याबरोबर गॅरेजवर पण मदत करतो आहे.” मी

“गप्प बस्सऽऽऽ... काही सांगू नकोस. मला एक महिन्याचे स्टेटमेंट पाहिजे.” पासबुक जमिनीवर आपटत तेथून निघून गेले.

आई पोळ्या लाटता-लाटता पप्पांकडे बघत “पोराचं काय म्हणणं आहे अजिबात ऐकून घेतलं नाही. गेले निघून...” हळू आवाजात पुटपुटली.

आई लाटणं हात घेऊन “जा रे तू पण... हातपाय धुऊन जेवायला येऊन बस.” म्हणून मायेने रागावून बोलली.

पप्पा असे का बोलले?, ऐरवी कधी असे चिडलेले पाहिले नाही. माझ्याकडून असे काय घडले की त्यांनी स्टेटमेंट मागितले, माझ्या विषयी कुणी काही सांगितले का? अशा बर्‍याच शंका मनात आल्या.

पप्पांचा थोडा राग आला होता पण त्यांच्या बोलण्यावरून काही गोष्टी समजून घ्यायच्याच होत्या. आता प्रश्न हा होता की स्टेटमेंट कसे तयार करू?.

जेवण करून रात्री विचार करता करता झोपी गेलो.



दुसर्‍या दिवशी ऑफीसला गेल्यावर अकाउटंट निंबाळकर सरांना झालेला सर्व प्रकार सांगितला. त्यांची मदत घेतली. त्यांनी एक्सेल शीट बनवून दिले. ते भरायचे कसे समजून घेतले. संध्याकाळी घरी आल्यावर कॉमप्युटरवर लगेचच काम सुरू केले. आणि चार दिवसात साध्या पद्धतीने स्टेटमेंट तयार केले.


रात्री पप्पा निवांत असतांना मी त्यांचा मूड पाहिला. पप्पा हॉलमध्ये बातम्या बघत होते. पानाचा विडा खात असतांना मी पासबुक आणि स्टेटमेंट घेऊन त्यांच्या पुढे उभा राहिलो.

त्यांनी पटकन माझ्या हातातून प्रिंट, पासबुक घेऊन सोफ्यावरून खाली सतरंजीवर मांडी घालून बसले. चष्मा लावला. स्टेटमेंटवरच्या सर्वात शेवटच्या दोन्ही कॉलमची एन्ट्री बघितली. नंतर वरपासून खालपर्यंत प्रत्येक कॉलमवर बोट हळूहळू खाली सरकू लागले.

काहीवेळ गेला. प्र्रिंट, पासबुक मला देऊन टाकले. चष्मा काढला. पान चावता चावता. दोन्ही हाताने भुवया दाबत होते.

मी उभाच होतो. पप्पांना बघण्यापलीकडे काहीच केले नाही. स्वयंपाक खोलीतून आई सगळं टिपत होती.

तीही पान खाता-खाता हॉलमध्ये आली. “तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. पुढे सगळं व्यवस्थित होईल.” असे पप्पांना सांगत, मलाही “जा तू. तुझं काम कर बघू.” म्हणून मला तेथून काढून दिले.

आज माझी परीक्षाच होती. पण वाटले तसे काहीच झाले नाही. नंतर बराच वेळ ते दोघे एकमेकांशी बारीक आवाजात बोलत होते.



बरेच दिवस पप्पांनी अबोला धरला होता. त्या संध्याकाळी मला स्वाध्यायला जायचे म्हणून पटापट आटोपले. मोबाईल आईकडे दिला. सायकल घेऊन निघून गेलो.


स्वाध्याय आटोपल्यावर भालेराव काकांनी हॉलच्या बाहेर बोट करत “छत्री घेऊन ते गृहस्थ बाहेर उभे आहेत ते तुमच्या परिचयाचे आहेत का? कारण ते स्वाध्याय होवोस्तर तुमच्याकडेच बघत होते.”

मी गर्दीतून बाहेर डोकावून बघताच मलाही आश्चर्य वाटले “अहो ते माझे वडील आहेत.”

“हो का. त्यांना ‘आत बसा’ म्हंटले; पण ते दोन तास बाहेरच उभे राहिले.” भालेराव काका

मी गर्दीतून वाट काढंत लगेचच पप्पांकडे गेलो.“पप्पा तुम्ही...! तुम्ही इथे कसे आलात? म्हणजे तुम्हाला पत्ता कसा काय मिळाला?”

हॉलच्या खिडकीतून डोकावून फोटोंना नमस्कार करीत “अरे मी रिक्षाने आलो. पत्ता तसा सोपा होता. त्यात काय.”

“तुम्ही अचानक इथे आलात...?” मी शंकेनेच प्रश्न विचारला.

“तू इतक्या रात्री कुठे जातोस...? म्हटलं चला... जाऊन बघू या.”

“स्वाध्याय संपला आहे. आपण निघूया!” मी 

पप्पा हॉलमध्ये चौफेर नजर मारत “अं... हो... तू पुढे चल. मी येतोच.” म्हणून भालेराव काकांशी बोलत बसले.

पप्पा स्वतःहून आल्याने मला बरे वाटले. पण शंका काही संपत नव्हती.


मी घरी आल्यावर हातपाय धुताधुता आईला ‘पप्पा तेथे आल्याचे’ सांगितले. यावर ती एकही शब्द बोलली नाही. तिने जेवायला वाढून दिले. जेवता जेवता स्वाध्यायमध्ये काय काय भाग झाले त्याविषयी बोलत होतो. तेवढ्यात पप्पा आले. आमच्याशी न बोलता ते त्यांच्या खोलीत निघून गेले.

आई चिंतेत दिसली. कदाचित तिला माहिती होते की ते आज माझ्या मागावर आहेत. पण तिने मला कळू दिले नाही. जेवण ऑटोपून मीही झोपायला निघून गेलो. पप्पांच्या मनात काय चालले आहे हे मला जाणून घ्यायचे होते. पण कसे...



दोन दिवस गेले. गॅरेजमध्ये पप्पा त्यांच्या लाकडी खुर्चीवर बसून पुस्तक वाचत होते. गॅरेजवर गाडी कामाला नव्हती. माझा विषय आज एैरणीवर घ्यायचाच म्हणून मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. “पप्पा, तुम्ही माझ्या बाबतीत काय विचार करताय?”

चष्म्याच्या वरच्या भागातून त्यांनी मला पाहिले. “अरे ये...! बस. बरं झाला तू आलास.”

मी कुठलीच वेळ न दवडता जवळचा ठोकळा घेऊन त्यांच्यापुढे बसलो.

पुस्तक बाजूला ठेवून “तुझ्या स्वाध्याय विषयी बोलणारच होतो. खूप छान सांगतात. मला आवडले. जात जा...”

“पप्पा; मी त्याच्या विषयी नाही बोलत आहे. स्टेटमेंटवरून पुढे काहीच बोलले नाही तुम्ही.” मी.

चष्मा काढत “स्टेटमेंटऽऽऽ हम्म...” पप्पा त्यांच्या शेजारी ठेवलेल्या मोठ्या जॅकवरचा गट्टू फिरवत बोलत होते.

“असं वाटलं की, आमच्यासारखे हात काळे करून घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या आयुष्याला सुधारावे. आर्थिक नियोजन शिकावे. शिक्षणाचा उपयोग करून चांगल्या ठिकाणी मस्त पंख्याखाली आरामखुर्चीत बसून जॉब करावा. पण तुझे स्टेटमेंट पाहिले. मला हवा तसा बदल काही दिसला नाही.” पप्पा बोलत होते. गट्टू फिरत होता. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील जुन्या गोष्टींना उजाळा देत. बराच वेळ बोलत होते.



मी मध्येच त्यांचे बोलणे थांबवले “तुम्ही स्वाध्यायमध्ये का आले होते?” जॅकवरचा गट्टू फिरवता फिरवता खाली पडला.

मी गट्टू उचलून घेतला. पप्पा थोडा विचार करत “अरे तू आठवड्यातून दोन दिवस इतक्या रात्रीचा बरेच दिवसापासून कुठे जातोय? काय करतोय? काही समजत नव्हते. बरं देवघरात ते ग्रंथ आणून ठेवले. सकाळ संध्याकाळ वाचत बसतोस. मला हळूहळू तुझ्यावर शंका यायला लागली. नंतर नंतर तुझ्या वागण्यात बदल होत होता. माझा संशय वाढत गेला म्हटलं हे पोरगं संन्यास वगैरे घेतो की काय? असं वाटायला लागले.

मी हसत “मग...”

“मग काय! मी तिथे गेल्यावर दीड दोन तास ते ऐकले आणि स्तब्धच झालो. असे कधी मी ऐकलेच नव्हते. 

मी गट्टू पप्पांकडे देत “मगऽऽऽ...!”

“म्हटलं हा काही तसं करणार नाही.” पप्पांनी स्मित हास्य केले. “चांगले आहे. तू या वयात परमार्थ करतोय... बरं वाटलं. चांगला मार्ग आहे. धरून ठेव. नक्की तुला मार्गदर्शन चांगले मिळेल. खरं मी तुझ्यावर संशय घ्यायला नव्हता पाहिजे.” पप्पांनी गट्टू घेऊन जॅकवर लावला. आता गट्टू दाबून धरला होता.

“पण परमार्थ करता करता थोडे आर्थिक गोष्टींकडे पण बघ. पुढे तुलाच करायचे आहे हे सर्व. मी कितपत हे सगळं ओढू.”

मी त्यांचं बोलणं ऐकत होतो. पप्पां माझ्याशी मनमोकळे बोलत होते. खूप बरे वाटत होते. लहानपणापासून त्यांची भिती माझ्या मनात होती. ती यामुळे दूर होत होती. एक वेळ अशी होती की, पप्पा हॉलमध्ये आले की आम्ही स्वयंपाक घरात, ते स्वयंपाक घरात आले की आम्ही अंगणात पळून जायचो.

पप्पा बोलता बोलता थांबले,

मी हिम्मत एकवटली “पप्पा, तुम्ही मला तबल्याच्या क्लासला बसवले पण मी पूर्ण नाही करू शकलो. मी अभ्यासात मागे राहिलो. तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो. मला माफ करा. पण पप्पा, तुम्हाला आठवते! मी ऑफिस कामा करता ऑफिसमधून एक कॉमप्युटर घरी आणला होतो. तेव्हा तुम्ही रागावला होता की लोकाची वस्तू घरी आणली ती खराब झाली तर नवीन कुठून आणायची. जेव्हा की मला माझा कॉमप्युटर घ्यायचा होतो. तेव्हा तुम्ही नाही म्हणून सांगितले. मला माझ्या कामाकरता मोबाईल आणि सायकल हवी होती. तेव्हाही तुम्ही नाही म्हणून सांगितले. पण आज माझ्याकडे तीनीही गोष्टी आहे.

स्क्रीन प्रिंटिंगसाठी लागणार्‍या सर्व गोष्टी हळूहळू करत मिळवल्या. माझा जॉब व्यवस्थित चालू आहे. आज माझा खर्च जास्त आहे पण पुढे पुढे तुम्हाला स्टेटमेंटमध्ये अपेक्षित बदल दिसतील. तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. राहिला संन्यासाचा प्रश्न; तर मीच माझ्या लग्नासाठी विषय मांडला होता. तेव्हाही तुम्ही नाही म्हटलात.”

पप्पांनी माझ्यावर नजर रोखून धरली. गट्टूवरचा हात खाली आला. मी बोलता बोलता घाबरत होतो. “तुम्ही रागावू नका... मी फक्त सांगण्याचा प्रयत्न करतोय. प्लीज...”

त्यांच्या डोळ्यात पाण्याचे वलय स्पष्ट दिसत होते. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. मला जे सांगायचे होते. ते त्यांना कळले होते. “आता माला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.”

बस्सऽऽऽ.. हाच शब्द त्यांच्या तोंडून ऐकायचा होता.

मी एकदाचा उसासा सोडला. एवढं भराभरा बोललो  माझा शर्ट काखेत, पाठीवर ओला झाला होता.

मी त्यांच्या पायावर पटकन डोके टेकवले. त्यांनी माझ्या पाठीवर शाब्बासकीचा जबरदस्त दोन तीन वेळेस हात मारला.

मी माझी पाठ धरत परत ठोकळ्यावर बसलो.

“तुला हे बोलायचे कुणी शिकवले.” पप्पा

पाठ धरत “स्वाध्यायमध्ये जाऊन” चेष्टेत बोललो.

यावर आम्ही दोघेही हसलो.

पप्पांचा मूड पाहून मी दुसरा टोला लगेच हाणला, “पप्पा... मला आता टू व्हिलर घ्यायची आहे.”

त्यांनी कपाळावर आठ्या पाडत मिश्किल हसत “तथास्तु” म्हटले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या गाडीच्या स्टीयरिंगवर कोणालाही बसू देणार नाही.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचतो न पोहोचतो काही शासकीय अधिकारी आणि प्रेसमधील मला ओळखणार्‍यांपैकी “तुम्ही इथे!; मग रावसाहेबांबरोबर ते दोघे कोण होते?” असं विचारायला सुरुवात केली. ते काय बोलत होते मला काही समजले नाही. पण इतके सारे लोकं जमल्याने रावसाहेबाविषयी नक्की वाईट बातमी होती. हे नक्की. त्यातील एका मित्राने माझा हात धरून बाजूला नेले. वॉर्ड नंबर सांगून ‘तिथे जा आणि ते दोघे कोण आहेत ते बघ’ असे सांगून पाठवत होता. त्याचा हात झटकत “रावसाहेब कुठे आहे?” मी रागावून प्रश्न केला. “ते...ते.. पोस्टमार्टम रूम मध्ये आहे.” क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि तेथून निघालो. जाता जाता त्याने ‘रावसाहेबांबरोबर तू आणि अण्णा आहेत असे सगळ्यांना वाटले म्हणून त्यांनी तुला आल्या आल्या असे विचारले.’ असं सांगत होता. वार्डात जाऊन नर्सना रावसाहेबाबरोबर अजून दोन व्यक्ती कुठे ऍडमिट आहेत म्हणून विचारले. नर्सने रजिस्टर बघता बघता “ते दोघे नाहीत तिघे आहेत. एक आयसीयूमध्ये ऍडमिट आहे आणि...” बेडकडे बोट करून “ते दोघे तिथे आहेत.” डोळ्यावर, डोक्यावर पट्टी केलेली, हात गळ्यात बांधलेला, सलाईन लावलेली अशा अवस्थेत ते दोघे पडलेले दिसले. कद...

15 दिवस माझे आणि...

मला पंधरा दिवस बाहेरगावी जाण्याची वेळ आली. बायको म्हणाली, “पोराला घेऊन मी नाही घरी एकटी राहणार; एक तर तो माझं ऐकत नाही. खूप त्रास देतो. सारखा ओरडतोे.” “मग जुन्या घरी जा!” असं मी म्हटल्याबरोबर बायकोने जे भांडणाचा सुर सुरू केला की, माझाही तिच्याबरोबर सुर जुळून गेला. अखेर भांडण घराच्या कामावर येऊन ठेपले. “तुम्ही घरकाम एकदा करून बघा; मग तेव्हा कळेल की किती दमछाक होते ते!” - बायको यावर मी ते चॅलेंज स्वीकारले, “ठरलं तर मग मी गावाहून शनिवारी घरी येणार आहे. तूपण माहेरी जा आणि डायरेक्ट सोमवारी ये. मी रविवारी अख्खा दिवस घरीच थांबेल. घरातील बाकीचे कामे, दोन वेळची भांडी, स्वयंपाक या सर्व गोष्टी पूर्ण करून रात्री आपण फोनवर चर्चा करू.” असे आमच्या दोघांमध्ये पक्के झाले. बायकोला दुसर्‍या दिवशी गाडीत बसवून माहेरी रवाना केले. मीही त्याच रात्री कामासाठी बाहेर गावी निघून गेलो. ती माहेरी अन मी गावी असतांनाच्या काळात नेहमीप्रमाणे फोनवर बोलताना तावा-तावात भांडायचे काही कमी केले नाही. तोपर्यंत मी ‘रविवारचे घर सांभाळायचे’ बाशिंग बांधून घेतले; आणि हिने ‘बघू कसा करतो ते!’ म्हणून बांगड्या वर केल्या. अखेर मी शनिवा...

वैष्णव देवींचा प्रवास भाग 1

“अंकल कुछ लेलो ना!” त्या चिमुकलीने तीन-चार स्वेटरचे पॅकिंग दाखवत विचारले. “अगं हे मुलींचे आहे. हे माझ्या काय कामाचे” त्यातलं एक स्वेटर हातात घेऊन बोललो. “अरे ती हिंदीत बोलत आहे. तुझी मराठी समजेल का तिला.” भाऊ हसतच म्हणाला. “मुझे मराठी समझ मे आती है. अंकल, आण्टी के लिए ले लो ना!” खूप आग्रह करत तिने केविलवाणे तोंड केले. “इसकी अभी तक शादी नही हुई है । शादी होने के बाद ले लेंगे !” खवचटपणे रावसाहेब बोलला. थोडा हशा पिकला. “अहो, असं का त्यांना चिडवता! उगीचच आपलं काही तरी” रावसाहेबांची बायको त्याला दटावत बोलल्या. अंकल काही घेणार नाही म्हणून ती पुढे निघून गेली. तेवढ्यात माझा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. “मी बोलतेय. हा माझ्या भावाचा नंबर आहे. तुम्हाला वेळ आहे का?” हा तिचाच फोन होता. घाईघाईने दरवाजाजवळ जाऊन बोलायला लागलो. “माझी तयारी आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना!” तिने हे बोलताच. “अरे वा... थँक्यू थँक्यू” म्हणत जागेवर उडी मारली. माझ्यामागे भाऊ कधी येऊन उभा राहिला समजले नाही. तो अगदी दबक्या आवाजात “अरे अशा वेळी थँक्यू थँक्यू म्हणायचे का?” असे म्हणत त्याने कपाळावर हात मारला. आणि “चालू दे......