मुख्य सामग्रीवर वगळा

बलजितचा वाडा

संध्याकाळ व्हायला आली होती. आम्ही तिघे घर शोधता-शोधता अशोकास्तुपवर एका छोट्या बोळीत घुसलो. गाडी एका ठिकाणी पार्क करून पुढे पायी निघालो. दिवसभर फिरून तिघेही खूप थकलो होतो. उन्हाने अंगाचे पाणी-पाणी झाले होते पण घराचा मार्ग काही निघत नव्हता. एका बंद वाड्याला कुलूप दिसले. म्हटलं शेवटचा प्रयत्न करू.

“कोण पाहिजे तुम्हाला?” शेजारच्या ताई संध्याकाळची दिवाबत्ती करत असतांना त्यांनी आम्हाला पाहिले. त्यांच्याकडे वाड्याची चौकशी केली असता त्यांनी अशोकास्तुपवरच एका गॅरेजवाल्या सिंग नावाच्या व्यक्तीकडे जायला सांगितले.

वेळ न घालवता दोघांना तिथेच उभे करून गॅरेजवर पोहोचलो.



“अच्छा... अच्छा... तो भूत बंगला! आधीच पडायला झाला आहे. कशाला तिथे जाताय?... ठीक आहे. हा नंबर घ्या. त्यांच्याशी बोलून घ्या.” असे बोलून तो गॅरेजमध्ये निघून गेला.

त्या व्यक्तीचे बोलणे जरा खटकलेच. पण गरज होती. दिलेल्या नंबरवर पटकन फोन केला. त्याच्याशी बोलता-बोलता वाड्यापाशी येऊ लागलो.



“तो पाच मिनिटात येथे येतोय. बघूया काय म्हणतोय” असे हिला सांगत असताना. ही वाड्याच्या वरच्या भागाकडे पहात “अहो...! तुम्ही वाडा पाहिला का...?” असं म्हणत डोळे मोठे केले.

अंधार पडण्याआधी घरी जायला पाहिजे या विचाराने वाड्याचा वरचा भाग बघितलाच नव्हता.

वाड्याचा वरचा भाग मोडकळीस आला होता.  चपट्या लाल विटांचे जुन्या पद्धतीचे बांधकाम होते. वरती जाण्यासाठी लाकडी जिना होता. जिना संपल्यावर पुढे गॅलरी होती. गॅलरीला लोखंडी पट्यांची जुन्या पद्धतीची डिझाईन होती. बाजूला पिंपळाचे मोठे झाड होते. वाड्याला लोखंडी तावदान असलेल्या लाकडी खिडक्या होत्या. पुढे ओटा, अंगणात वाढलेले गवत. अंगाणात आम्ही जिथे उभे होतो तिथे वापरात नसलेली  दगडी मोरी होती.

“अहो...; हा वाडा बराच जुना दिसतो आहे.”

मी हिला काही म्हणणार तोच मागून एक दाढीवाला टक्कल असलेला एक इसम येऊन बारीक आवाजात “या” म्हणत खोली उघडायला गेला. 

मोबाईलचा लाइट लावून “बिल भरलेलं नाहीये. तुम्ही आलात तर उद्या लाइट चालू होईल.” असे म्हणत त्याने वाडा दाखवला.

मोबाईलच्या प्रकाशात “हा हॉल आहे. मागे स्वयंपाक खोली. त्याच्या मागे बाथरूम आहे. तुम्ही बाहेर जिथे उभे होता त्याच्या मागे संडास आहे. संडासमध्ये लाइट तुम्हाला लावून घ्यावा लागले. वरती कुणी रहात नाही. कुणी जातही नाही आणि जावूपण नका.”

मला येथून ऑफीस जवळ आहे एवढेच ध्यानात घेत. त्याच्याशी बोलणी करून चावी ताब्यात घेतली.


अशोकास्तुपवरून जशी गाडी काढली तशी ही शांत बसली होती. तिला वाड्याबद्दल बहुतेक काहीतरी सांगायचे असेल. तिला आरशातून बघत होतो. “अगं... काही दिवसाचा प्रश्न आहे. आपण दुसरी जागा शोधू.” असं म्हणून वेळ काढून नेत होतो.


घरी येऊन कसेबसे जेवणं आटोपले. ही काहीच बोलत नव्हती. वाड्यात जाण्यामागचे कारण तिला माहिती होते की माझा जॉब तेथून जवळच होता. तेथून दुसरीकडे घराची शोधमोहीम सुरू ठेवता येईल. शिवाय ही खोली खाली करून द्यायची होती.


दुसर्‍या दिवशी सुट्टी काढून दिवसभर सामान पॅक केले. गाडीत सामान भरले. भावाची, भाच्याची मदत घेऊन सामान वाड्यात आणून टाकले.



आता वाड्यात आम्ही तिघे आणि खोलीत पसरलेले सामान. छोट्याशा बल्बमध्ये पसरलेल्या सामानाकडे बघत एका कोपर्‍यात कंबर धरून बसून घेतले. रात्र झाली होती. खाण्याची व्यवस्था करावी म्हणून बाहेर पडणार तेवढ्यात लाइट गेले.


दरवाजा आणि खिडकीतून चंद्राचा प्रकाश खोलीत पडलेला होता. जमिनीवरून सामानावर एक सावली पुढे पुढे सरकत “ये बलजितऽऽऽ...” असा आवाज देत एक बाई अंगणात येऊन उभी राहिली.

फोनचा लाइट लावून “ते नाही; मी भाडेकरू आहे. आताच सामान आणून टाकले.” त्या प्रकाशात सडपातळ बांधा, केस मोकळे सोडलेले, मध्ये भांग, कपाळाला मोठा गोल बुक्का, डोळ्यात काजळ, होट लाल झालेले, गोल साडी नेसलेली वयस्कर बाई पान चावत-चावत “अस्सं... मला असं वाटलं की बलजीत आला आहे.”

थकलेला, पुरुषी आवाजाचा घोगरा सूर माझ्या अंगावर सोडून मला कटाक्षाने बघून निघून गेली.


मोबाईल सामानावर ठेवून अशोकास्तुपवर गेलो. पटकन नाश्ता पॅक करून वाड्यात आलो. ओट्यावर तोंड हात पाय धूवन नाश्ता प्लेटमध्ये घेतला टकुला खाऊ घालता-घालता मीही ताव मारला.

रात्र भरपूर झाली होती. घरातलं सामान आजूबाजूला करून मिळेल त्या जागी अंथरून टाकून तिघेही पसार झालो. अंग जाम दुखत होतं. आम्हाला केव्हा झोपा लागल्या काही समजले नाही. थेट सकाळीच पाणी भरायला उठलो.

ही सकाळीच उठून कामाला लागली होती. खोली झाडून-झटकून सामान भराभर लावायला घेतले. एकीकडे वाडा निहाळायाचे काम चालू होते. पहिला दिवस सामान लावण्यात गेला. वाडा जसा बाहेरून दिसत होता तसा आतून ठिकठिकाणी पोखरलेला होता. सामान लावता लावता हिची कुरबुर चालूच होती. “टकूला संडासमध्ये भिती वाटते की बसता आलं नाही. कुणास ठाऊक तो संडासला गेलाच नाही.” एका कोपर्‍यात गुमसुम बसलेला होता. दिवस गेला पण त्याच्याकडे लक्ष दिले नव्हते. थोडा वेळ त्याला दिला. रात्रीचे जेवणं आटोपले आणि झोपी गेलो.


दुसर्‍या दिवशी दुपारी जेवणासाठी घरी येणार म्हणून डबा न घेताच कामावर निघून गेलो.

दुपारी आलो तर टकू दारात बारीक तोंड करून बसलेला होता. अंगणात हाथ धूताधूता “तो आजही संडासला गेलाच नाही. अंगात तापपण आहे.” असं सांगत हिने जेवायला वाढले.

“संध्याकाळी दवाखान्यात जाऊ.” मी

“संडास फारच जुना आहे. पार पडायवर आला आहे. दरवाजा हलवला तरी ढेकळं पडतात.” पोळ्या लाटता लाटता ही सांगत होती. 

“काहीतरी उपाय करतो.” असं म्हणून निघून गेलो.

रात्री घरी आल्यावर संडासला गेलो. लाइट गेलेले होते. संडासच्या दरवाजाच्या फटीतून संपूर्ण वाडा चंद्राच्या प्रकाशात खरंच भूत बंगला दिसत होता. जणू आ वासून भयानक विचित्र भासत होता. खोलीत मोबाईलच्या लाइट व्यतिरिक्त कोणीच दिसत नव्हते. गॅरेजवाल्याने भूत बंगला डोक्यात घालून दिल्यामुळे माझे इमॅजिनेशन असावे. मी पटकन आटोपून दरवाजा ढकलला तर ढेकळं पडल्याचा आवाज झाला. 

टकूला दवाखान्यात दाखवून आणले. रात्रीचे जेवणं आटोपून झोपी गेलो. झोप कुठे लागली तर हिने गदागदा हलवून “अहो स्वयंपाक खोलीत काही तरी पडल्याचा आवाज झाला.”

अर्धवट झोपेतून उठून स्वयंपाक खोलीत शिरलो. लाइट लावली. बघितले न बघितलेसारखे केले. लाइट बंद करून “आता झोप उद्या बघू” असे म्हणून झोपून घेतले.


***

जगण्यातील कुरबुर करत चार-पाच दिवस पार पडले. त्या दिवशी टकुला प्ले ग्रुपला टाकायचे म्हणून त्याला बरोबर घेऊन बाहेर पडलो. त्याला सोडून ऑफिसला गेलो. दुपारी टकुला घ्यायला ही जाणार होती. त्यामुळे मी निश्चिंत ड्युटी करून रात्री घरी आलो.

दोघांचा चेहेरा उतरलेला होता. हिचे डोळे पाणावलेले होते. नेहमीप्रमाणे टकू कोपर्‍यात बसलेला होता. मला असं वाटलं की टकूने त्रास दिला असावा. तोंड हात पाय धूवन देवापाशी बसलो. तोपर्यंत भांड्यांची आदळ आपट सुरू झाली. टकू माझ्या शेजारी अलगद येऊन बसला. 

“काय झालं?” मी

“तो बलजित घराचे दार न वाजता सरळ स्वयंपाक खोलीत शिरला होता. मी इतके घाबरले होते की, सरळ अंगणात येऊन उभे राहिले. म्हणे माझ्या काही वस्तू आहे त्या घ्यायला आलो होतो.” 

हे ऐकल्यावर त्याला लगेचच फोन करून दोन-दोन शब्द झाले. विषय घर खालीकरेपर्यंत गेला. मीही चिडून सूनावून टाकले.

थोडावेळ कुणीच कोणाशी बोलत नव्हते. 

***

एके दिवशी लहान भाऊ भेटायला घरी आला. तो वाड्यात शिरताच त्याला नकारात्मक गोष्टी जाणवल्या. त्याने ताबडतोब घर सोडायला सांगितले.


रात्रीचे जेवणं आटोपून अशोकास्तुपवर कधी नाही ते शतपावली करायला बाहेर पडलो. वाड्यातून जसं बाहेर पडलो तसं टकूला, आम्हा दोघांना फार भारी वाटत होते. एकदम उत्साह, आनंद वाटत होता. एकमेकांशी छान हसून गप्पा मारत होतो. जो मी मनातून अनुभवत होतो. तोच अनुभव हिने सुद्धा बोलून दाखवला.

दिवसभर एवढं सगळं करत असताना आमच्याकडे कसलाच उत्साह नव्हता. काहीतरी चुकल्यासारखे, उदास भकास वाटत होते. भिती वाटत होती. असं काहीसं झालं होतं.

“भाऊ म्हणतोय घर सोडून द्या” मी

भाऊ आला तेव्हा हिने त्याचे बोलणे ऐकले होते. “रोज रात्री वरून काहीतरी ठोकल्याचा, घासल्याचा चालण्याचा आवाज येतो. स्वयंपाक खोलीत काम करत असतांना माझ्या मागे कुणी तरी उभे असल्याचा भास होतो. वरून ठिकठिकाणी माती पडते अन्न-पाणी खराब होते.” ती बोलत होती. 

“तुम्ही, टकू निघून गेल्यावर तो वाडा खायला उठतो. भर दुपारी अंधार पडल्यासारखे वाटते. टकू या घरात आल्यापासून गुमसुम बसलेला असतो. त्याला संडासची भिती वाटते. ती शेजारची बाई कधी दिसत नाही. आणि दिसली तर तिच्याशी बोलायची भिती वाटते. गल्लीत कोणाचा आवाजही येत नाही. त्या दुसर्‍या ताई सकाळीच कामावर निघून जातात. ते संध्याकाळीच दिवाबत्ती करतांना दिसतात. माझ्या बरोबर दुसरा कोणी सोबती नाही.” 

हे ऐकल्यानंतर मला खूप वाईट वाटत होते. आपण येथे येऊन चूक केली आहे. हिने इतक्या दिवस सांगितले  का नाही! याचा विचार करत त्या गल्लीत शिरलो. गल्लीत कोणाचाच आवाज नव्हता. घरात घुसण्यास पाय जड झाल्यासारखे जाणवले.

अंथरून करून टकूला “निबोणीच्या झाडा मागे चंद्र...” गाणं म्हणत झोपी लावले आणि मीही...

मोकळे सोडलेले पांढरे केस, पांढरी साडी घातलेली त्या म्हातारीने कातडी लोंबलेली दोन्ही हात माझ्या छातीवर ठेवलेले मी स्वप्नात पाहिले. माझा श्वास अडकला. कसाबसा उठून हुंदके देत उठून बसलो.

हिने पटकन “अहो काय झाले...” म्हणत पाठ-छाती चोळली.

मी भानावर आलो “काही नाही मळमळतय” म्हणून सांगितले.

“पाणी देऊ का?” ही

नाही चा हात हालवत. “तू झोप”

तिची कुठल्या न कुठल्या गोष्टीवरून तकतक होत होती. त्यात मी असे विचित्र पाहिले. हे जर तिला सांगितले असते तर तिने आणखी त्रास वाढवून घेतला असता. म्हणून नाही सांगितले. 

“आपण गुरूजींकडे जाऊ या का? त्यांना तरी विचारू. ते मार्ग सांगतील.” ती बोलली.

मी होकाराची मान हलवत उशीवर डोके टेकवले.



दुसर्‍या दिवशी कामावर जाण्याआधी वरती काय असावे याची उत्सुकता लागली. लाकडी जिना हळूहळू चढत वर गेलो. खूपच घाणेरडा, कुबट वास येत होता. नाका-तोंडाला रुमाल लावून खिडकीतून वाकून आत बघितले. कौलाचा भाग तुटून खाली पडलेला होता. झाडाचा पालापाचोळा, पाणी, कबुतराचे पिसं, विटा, लोखंड, कपडे असे बरेच सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. एका भिंतीवर हट्टीकट्टी तब्येतशीर पांढरी मांजर बसलेली होती. दरवाजाला कुलूप लावलेले होते. पुढे जाण्याची हिम्मत होईना. भरभर खाली आलो तर जिन्यापाशी तीच केस सोडलेली मावशी उभी होती.

तिला बघून घाबरलोच. “काहीनाही वरती आवाज कसला होतोय म्हणून गेलो होतो बघायला.”

मोठी पिचकारी मारत “घुश्शीऽऽ असतील मोठाल्या...” त्याच कटाक्षाने पहात घोगर्‍या आवाजात “तो माणूस चांगला नाहीये. शहाणा असशील तर तू हा वाडा सोडून दे.” थोडी जवळ येऊन बोलली.

मी तिचा अवतार बघत थोडा मागे मागे सरकत “बरं...” म्हंटलो आणि तेथून काढता पाय घेतला.



अखेर आम्ही गुरूजींकडे गेलो. त्यांच्या पुढ्यात प्रश्नांचा कागद आणि कुंडली ठेवली. त्यांनी ते वाचून डोळे बंद केले. “तिथला कार्यकाळ आटोपला आहे. सध्या भाड्याचेच पाहिचे आहे.” डोळे उघडले माझ्याकडे पाहिले परत बंद केले. “जा होईल काम तुझे” असे म्हणत कागद कुंडली पुढे सरकवली. पुढील कामे मार्गी लागण्यासाठी काही योजना करायला सांगितल्या.

माझ्या डोक्यात पुन्हा सामानाचं शिफ्टिंग, उचल-आपट सुरू झाली. हे चक्र केव्हा थांबणार माहीत नव्हते. संध्याकाळ व्हायला आली होती. सांगितल्याप्रमाणे सामान, पोथी, बरोबर भाजीपाला असे घेऊन बंद पडलेल्या मोरीपाशी येवून उभे राहिलो. खंडीभर विचाराने आम्ही तिघे त्या वाड्याला पहात होतो. आणि वाडा आम्हाला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या गाडीच्या स्टीयरिंगवर कोणालाही बसू देणार नाही.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचतो न पोहोचतो काही शासकीय अधिकारी आणि प्रेसमधील मला ओळखणार्‍यांपैकी “तुम्ही इथे!; मग रावसाहेबांबरोबर ते दोघे कोण होते?” असं विचारायला सुरुवात केली. ते काय बोलत होते मला काही समजले नाही. पण इतके सारे लोकं जमल्याने रावसाहेबाविषयी नक्की वाईट बातमी होती. हे नक्की. त्यातील एका मित्राने माझा हात धरून बाजूला नेले. वॉर्ड नंबर सांगून ‘तिथे जा आणि ते दोघे कोण आहेत ते बघ’ असे सांगून पाठवत होता. त्याचा हात झटकत “रावसाहेब कुठे आहे?” मी रागावून प्रश्न केला. “ते...ते.. पोस्टमार्टम रूम मध्ये आहे.” क्षणभर त्याच्याकडे पाहिले आणि तेथून निघालो. जाता जाता त्याने ‘रावसाहेबांबरोबर तू आणि अण्णा आहेत असे सगळ्यांना वाटले म्हणून त्यांनी तुला आल्या आल्या असे विचारले.’ असं सांगत होता. वार्डात जाऊन नर्सना रावसाहेबाबरोबर अजून दोन व्यक्ती कुठे ऍडमिट आहेत म्हणून विचारले. नर्सने रजिस्टर बघता बघता “ते दोघे नाहीत तिघे आहेत. एक आयसीयूमध्ये ऍडमिट आहे आणि...” बेडकडे बोट करून “ते दोघे तिथे आहेत.” डोळ्यावर, डोक्यावर पट्टी केलेली, हात गळ्यात बांधलेला, सलाईन लावलेली अशा अवस्थेत ते दोघे पडलेले दिसले. कद...

15 दिवस माझे आणि...

मला पंधरा दिवस बाहेरगावी जाण्याची वेळ आली. बायको म्हणाली, “पोराला घेऊन मी नाही घरी एकटी राहणार; एक तर तो माझं ऐकत नाही. खूप त्रास देतो. सारखा ओरडतोे.” “मग जुन्या घरी जा!” असं मी म्हटल्याबरोबर बायकोने जे भांडणाचा सुर सुरू केला की, माझाही तिच्याबरोबर सुर जुळून गेला. अखेर भांडण घराच्या कामावर येऊन ठेपले. “तुम्ही घरकाम एकदा करून बघा; मग तेव्हा कळेल की किती दमछाक होते ते!” - बायको यावर मी ते चॅलेंज स्वीकारले, “ठरलं तर मग मी गावाहून शनिवारी घरी येणार आहे. तूपण माहेरी जा आणि डायरेक्ट सोमवारी ये. मी रविवारी अख्खा दिवस घरीच थांबेल. घरातील बाकीचे कामे, दोन वेळची भांडी, स्वयंपाक या सर्व गोष्टी पूर्ण करून रात्री आपण फोनवर चर्चा करू.” असे आमच्या दोघांमध्ये पक्के झाले. बायकोला दुसर्‍या दिवशी गाडीत बसवून माहेरी रवाना केले. मीही त्याच रात्री कामासाठी बाहेर गावी निघून गेलो. ती माहेरी अन मी गावी असतांनाच्या काळात नेहमीप्रमाणे फोनवर बोलताना तावा-तावात भांडायचे काही कमी केले नाही. तोपर्यंत मी ‘रविवारचे घर सांभाळायचे’ बाशिंग बांधून घेतले; आणि हिने ‘बघू कसा करतो ते!’ म्हणून बांगड्या वर केल्या. अखेर मी शनिवा...

वैष्णव देवींचा प्रवास भाग 1

“अंकल कुछ लेलो ना!” त्या चिमुकलीने तीन-चार स्वेटरचे पॅकिंग दाखवत विचारले. “अगं हे मुलींचे आहे. हे माझ्या काय कामाचे” त्यातलं एक स्वेटर हातात घेऊन बोललो. “अरे ती हिंदीत बोलत आहे. तुझी मराठी समजेल का तिला.” भाऊ हसतच म्हणाला. “मुझे मराठी समझ मे आती है. अंकल, आण्टी के लिए ले लो ना!” खूप आग्रह करत तिने केविलवाणे तोंड केले. “इसकी अभी तक शादी नही हुई है । शादी होने के बाद ले लेंगे !” खवचटपणे रावसाहेब बोलला. थोडा हशा पिकला. “अहो, असं का त्यांना चिडवता! उगीचच आपलं काही तरी” रावसाहेबांची बायको त्याला दटावत बोलल्या. अंकल काही घेणार नाही म्हणून ती पुढे निघून गेली. तेवढ्यात माझा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. “मी बोलतेय. हा माझ्या भावाचा नंबर आहे. तुम्हाला वेळ आहे का?” हा तिचाच फोन होता. घाईघाईने दरवाजाजवळ जाऊन बोलायला लागलो. “माझी तयारी आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना!” तिने हे बोलताच. “अरे वा... थँक्यू थँक्यू” म्हणत जागेवर उडी मारली. माझ्यामागे भाऊ कधी येऊन उभा राहिला समजले नाही. तो अगदी दबक्या आवाजात “अरे अशा वेळी थँक्यू थँक्यू म्हणायचे का?” असे म्हणत त्याने कपाळावर हात मारला. आणि “चालू दे......