डोळे चोळत झोपेतून उठून बसलो (फोन कानाला लावत) “काय रेऽऽऽ”
रेकलेल्या म्हशीसारखा आवाज काढत “आपल्याला मौतीला जायचं आहे.” रावसाहेब
“कुणाच्या”
“महेशच्या म्हातार्याच्या” रावसाहेब
“कधी”
“अख्खी माहिती फोनवरच विचारून घे. लवकर उठ. त्या अण्णाला फोन कर. दोघेही स्टँडवर येऊन उभे रहा. मी निघालो.” फोन कट...
मिचमिचे डोळे करून खिडकीच्या बाहेर नजर टाकत अण्णाला फोन लावला. पाऊसाची रिपरिप चालू होती. वातावरण चांगलेच थंडगार झाले होते. घड्याळाकडे पहात अण्णाला रावसाहेबाचा निरोप दिला.
सांगितल्याप्रमाणे आम्ही दोघे स्टँडवर येऊन त्याची वाट पहात गप्पा मारत होतो. रिमझिम पावसात सायलेन्सरचा पुटपुटलेला आवाज करत रावसाहेबाची गाडी आमच्यासमोर येऊन उभी राहिली. रावसाहेबाची उंची कमी असल्याने रेनकोटमध्ये रावसाहेब झाकून गेलेला होता. पावसाच्या पाण्यात पानाचा तोबरा थुंकत गाडीवरून पुढे सरकला. आम्ही दोघे एकमेकांकडे बघत त्याच्या पाठीमागे गाडीवर बसलो.
दोन बोटात माणिकचंदच्या पुड्या धरून हवेत हात झटकले. “आत्ता खाऊ नका. मामाची मिसळ खाऊन झाल्यावर खा.” सक्त ताकीत देत गाडीचे एक्सलेटर पिळले. पुटपुट करत गाडी हसणापूरला निघाली.
शहर सोडून गावाकडे गाडी लागली होती. मोठ्ठ्या आकाशात छान काळे ढग दाटून आले होते. पाऊस हळुवार सुरू होता.
“केव्हा गेला रे...” अण्णा
गुळणा धरत “गेला असंल पाच-सहा वाजेला.” रावसाहेब.
“कधी नेणारए” अण्णा
एक्सलेटरवरचा हात हवेत करत हाताची मुद्रा केली ‘काय माहीत?’
गाडी मामाच्या मिसळवर येऊन थांबली. मिसळवरचा घमघमीत वासाने पोटातली भूक वाढवली. आपल्याला मौतीला जायचे आहे याचा थोडावेळ का होईना विसर पडला. मिसळच्या रस्सा-तररीवर येथेच्छ ताव मारला की नाकातून, डोळ्यातून पाणी सुरू झाले. नाकातले पाणी पुसत, तोंडातली गरम हवा बाहेर काढत गाडीवर बसलो. रावसाहेबाने दोन बोटात नाक धरून चांगलेच शिंकरले. तेच हात रेनकोटला पुसले. त्याची ही नेहमीची पद्धत बघून दोघांनी पुडी खाण्याचा विचार खिशातच ठेवला आणि थेट महेशच्या घरी निघालो.
गावातले बरेच मंडळी ठिकठिकाणी आडोसा घेऊन उभे होते. महेशने गाडीचा आवाज ऐकून हातानेच आत येण्याचे खुणावले. गाडी लावून रेनकोट न काढताच महेशच्या घरात शिरलो. मी नाकाची फुरफुर करत चष्म्याच्या काचा पुसत होतो. बाबाला हॉलमध्ये आणले होते. सगळ्या म्हातार्या बायका बाबाच्या भोवती तोंडाला पदर लावून आमच्याकडे बघत होत्या. अण्णाने पटकन मला एका कोपर्यात ओढले. तेवढ्यात आमच्या मागून काही टगे पोरं भराभर आत घुसले. त्या चौघा-पाच जणांनी बायकांना बाजूला करत म्हातार्याची चादर धरून ‘ये... उचल रेऽऽ’ म्हणत म्हातार्याला बाहेर नेत होते. खोलीचा दरवाजा निमुळता असल्याने तू निघू का मी निघू या गडबडीत चादर फाटली आणि बाबा चादरीतून खाली आला. “धररऽऽरे माझ्या बाबाला...” असं म्हणत काही बायकांनी टाहो फोडला. तोच पोरांनी बाबाचे हात, पाय पकडून तसेच बाहेर तीन पाटावर आणून पटकावले.
पाऊस बारीक बारीक चालू होता. अंगणात चिखलच चिखल होता. गर्दीतून वाट काढत आम्ही एका झाडाखाली हाताची घडी मारून उभे होतो. महेशची एकट्याची धावपळ चालू होती.
“या माठ्याने आज किराणा दुकान का चालू ठेवले ?” रावसाहेब
“अरे पाहुण्यांना उठा-बसायला चालू ठेवले असेल.” अण्णा
पण दुकानात लहान पोरांनी कोणी पोंगे घे, कोणी गूळ-शेंगदाणे खा अशी चंगळ चालू होती.
इकडे बाबा एकटाच पडला होता. त्याच्याकडे कोणी बघा ना. अशातच कोणी विचारले “पुढे काय??”
धोतरवाल्या बाबाने नाकातले केस पिळत ‘विस्तव भिजला; पाणी गॅसवर तापायला ठेवले आहे...’ असे कारण सांगितले. दुसरीकडे तिरडीच्या सामानात दोरा मिळाला नाही म्हणून महेशच्या किराणा दुकानातून पुड्या बांधण्याचा दोराबंडल तिरडी बांधायला घेतला. त्यात गवताची पेंढी नसून जुडीच वाटत होती. तिही कशीबशी तिरडीवर पसरवली.
पाणी तापून बाहेर आले. बाबाचे कपडे कात्रीने फाडले. दुकानातून साबण घेऊन बाबाला आंघोळ घातली. साबणामुळे बाबा पाटावरून घसरत होता. पाणी गारगरम काही न बघता बाबावर सडा मारला. काहींनी त्याला कमरेत वाकवत बसवण्याचा प्रयत्न केला. बायकांनी पाणी घालता घालता बिचार्या म्हातार्याच्या टकलावर तांब्या पडला. बोचरखिंड झालेली एक म्हातारी “लागलं गं माझ्या बाबाला...” म्हणत बाबाच्या चेहेर्यावर हात फिरवला.
ते दृश्य बघून अण्णा आणि रावसाहेब तोंड दाबत झाडामागे गेले. अखेर कशीबशी आंघोळ झाली. कपडे घालतांना शर्टाची एक बाही गेली. दुसरी जाईना म्हणून अख्खी बाही उभी कापली आणि काखेत, पोटात लपून जाईल अशी खोचली. पाऊस थांबायचे नाव घेईना. एका पोरानं बाबाच्या चेहर्यावर छत्री धरली होती. छत्री त्याला नाही की बाबाला नाही अशी झाली होती.
“चला चला... आटोपा लवकर उशीर झाला.” म्हणून एकाने घाई केली. बाबाच्या तोंडात पानाचा विडा कोंबला. दोन्ही नाकपुडीत कापूस पिळून घातला. हे सगळे प्रयोग एक जण सांगत होता बाकीचे करत होते. बंडल संपेपर्यंत बाबाला तिरडीला बांधले. टोपी उडून जाऊ नये म्हणून दोन-तीन वेटोळे डोक्यावरूनही फिरवले. सामानात गुलालाची पुडी जेवढी पॅकिंगमध्ये आली तेवढी बाबावर ओतून दिली. फुलांची माळ कोमेजून गेली होती. काही फुले उरली ती अर्धी अंगावर, अर्धी चिखलात सोडली.
“उचलाऽऽ...” असे म्हणत तिरडी उचलली. आम्ही तिघे सर्वांच्या मागे निघालो. रावसाहेबानं त्याचं पान आणि आम्ही आमच्या पुड्या तोंडात भरल्या.
पावसामुळे कोणी काही बोलत नव्हते. लोकांनी पटापट पाऊल उचलले. आम्ही तिघे पचाक-पुचुक करत लोकांच्या मागे जात होतो. स्मशानाला लांबून फेरा मारण्यापेक्षा मधल्या आड मार्गाने सगळे घुसले.
पायवाट्यावर अख्खा चिखलच चिखल होता तर दुसर्या बाजूने शेताचा बांध होता. पुढे चालणारे काही लोकं आणि तिरडीवाले शेताच्या बांधावर चढले. ज्यानी छत्री तोंडावर धरली होती त्याचा तोल गेला. छत्री बाबाच्या तोंडावर अडकली नि तो चिखलात पडला. बांध उतरता असल्याने पुढचे तिरडी वाले शेतात सरकले नि मागचे पडता-पडता सावरले. थोडे पुढे कुठे जाता तिरडी सैल झाली नि एक बांबू मोकळा झाला. बाबा खाली येणार तेवढ्यात बाकीच्यांनी तिरडी, बाबा, माणसांना सावरले. हातात आलेले सामान बाबाच्या अंगावर टाकून स्मशानापाशी पोहोचले.
उंचवटा, लोखंडी जिना, चार पत्रे ठोकलेले शेड असे स्मशान होते. बाबाचे वरती पाय, खाली डोक करत उंच जिना चढून सगळे स्मशानात घुसले. एव्हाना पावसाने जोर धरला होता. “भाऊ एक कॅरेट आणून ठेवले आहे. अजून लागत असेल तर त्याला सांगू का?” कुणी तरी महेशला सांगत होते.
आम्ही तिघे पायाच्या टाचा उंच करत कॅरेट बघत होतो. त्यात बियरच्या बाटल्यात रॉकेल आणून ठेवले होते.
मी आश्चर्य करत “एवढ्याऽऽ...?”
“अरे म्हातारा जळणार कसा...!” अण्णाने उत्तर दिले.
लोकांनी म्हातार्याला आणला तसा लाकडाच्या ढिगार्यावर नेऊन ठेवला. बाकीच्यांनी मोठ-मोठाले ओंडके म्हातार्यावर ठेवले.
“ये... तुला कायी कळतं का. वल्ली लाकडं कुठं उरावर ठेवितो.” एक जण रागावून.
दुसरा चिडून “सुकलेली कुठून आणू एवढ्या पावसात.”
एकाने लाकडाची मशाल करून महेशच्या हातात दिली आणि बाबाला डाग दिला. बाकीच्यांनी भराभर कॅरेटमधून बाटल्या उचलल्या. मिळेल तेथून कानाकोपर्यातून रॉकेल मारायला सुरुवात केली. लाकडाच्या ढीगार्यावर रॉकेलच्या मार्याने अग्नी भडकला. जे पत्र्याच्या आडोशाला उभे होते ते सगळे पावसात येऊन उभे राहिले. उरलेसुरले मागच्या मागे निघुन गेले.
मी चष्म्यावरचं पाणी पुसत भडकलेल्या अग्नीकडे बघत होतो. हसता-हसता मन खिन्नं झाले. रावसाहेबांनी खांद्याला धक्का देत “चला जास्त दुखोटा करू नका. नाहीतर म्हातारा स्वप्नात यायचा.”
महेशला भेटून तिथून निघालो. भरपावसात पुटपुट करत गाडी हसणापूरातून निघाली. तिघेही तिथला झालेला प्रकार एकमेकांना हसत-हसत सांगत होतो. बोलता बोलता रावसाहेब रॉकेलच्या बाटल्यांवर आला. “अरे भाऊ-अण्णा... त्या बाटल्या बघून काहीतरी आठवतंय रे... मौसम मस्त है । समा सुहाना है । मग काय विचार आहे.” रावसाहेब रंगात आला.
अण्णा गम्मतीतच “मग तिथल्याच बाटल्या तोंडाला लावायच्या होत्या ना!”
रावसाहेब जोरजोरात हसत “नको रे बाबा... अशी मौत...” म्हणत एक्सलेटर पिळले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा