“चल गं पटकन... तू खूप हळूहळू चालते. तुझ्यामुळे मला खूप उशीर होतो. तुला अक्का-आत्याबरोबर जायला काय होते? तो बघ भोंगा वाजायला लागला.”
“अरे थांब अण्णा... माझे पाय खूप दुखताहेत. मी पडेनऽऽऽ.” तिने माझ्या खांद्यावर जो हात ठेवला होता त्याचा एक बोट खुब्यात रोवून कचकन खाली दाबला.
मी “ईऽऽऽ... आई गं.” म्हणत तिचा हात झटकन झटकला.
ती “अण्णाऽऽऽ, मी पडले...” म्हणत जमिनीवर कोसळली.
खांदा चोळत “मला तुझा खूप राग येतोय. माझा शर्ट सगळा खराब करून टाकते. ऊठ लवकर. नाहीतर मी निघून जाईन...”
स्टेशनरीच्या दुकानातून काका लगबगीने बाहेर आले. आत्याला आधार देत “मी तुम्हाला नेहमी पाहतो.” तिला उभे केले. “बघ किती थरथरतेय ती. तिचे पाय बघ” तिचे पाय वरून घासल्याने रक्त येत होते. काका मला दाखवत होते.
“पोरी रडू नकोस...” काका माझ्याकडे बघत “तू जरा हळू चाल. तिला चालता येत नाहीये.”
काकाकडे रागाने बघत आत्याच्या कोपरीला पकडले. खचकन ओढले नि तेथून निघालो. शाळेच्या गेटपाशी आणून तिचा हात अचानक सोडून दिला.
आत्याने स्वतःला सावरत पटकन गेट पकडला. मी तिला न पाहता शाळेत निघून गेलो. प्रार्थना होऊन गेली होती. तिची गंमत बघावी म्हणून एका भिंतीलगत लपून तिला पाहू लागलो.
उन्हामुळे घामाघूम झाली होती. केसांना चपचपीत तेल लावलेले डोकं चमकत होते. कपाळावरचे केस सावरत, डबडबलेले डोळे एका हाताने पुसत होती. पाठीवरचे दप्तर कसेबसे सावरले. तिच्या गुढघ्याला जखम झाली होती. जखमेवर थुका लावला. दोन्ही हात गेटला लावून पूर्ण ताकदीने पाय उचलून टाकत होती. अंगाचे कापरे होत होते. काही मुलं-मुली शाळेत येत असतांना तिला बघून पुढे जात होती. तीपण त्यांच्याकडे बघून थांबत होती. कदाचित तिला कोणाचा तरी आधार पाहिजे होता.
मला तिचा खूप राग येत होता. ती अजूनही गेटपाशी रेंगाळत होती. तेवढ्यात पाठीवर सरांनी थप्पकन लेझीम मारली. “चाऽऽऽल... हो वर्गात...”
मी तिथून पळ काढला. ‘हिच्यामुळे मला आज सरांचा मार खावा लागला. मी आता बघतोच हिला.’
शाळा सुटली. मी आत्याची वाट पहात गेटपाशी उभाच होतो तोच समोरून अक्का, छोटी आत्या आणि ही दिसली.
दोघी रागाने माझ्याकडे पहात होत्या. आत्याने छोटी आत्याच्या खांद्यावर हात ठेवत एका हाताने गुढघा चोळत खाली बघत होती.
अक्का “तू घरी ये, तुझे नावच आजीला सांगते.” म्हणत तिघेही निघून गेल्या.
मी त्यांना काहीही न बोलता दुकानातून पोंगे घेतले मस्त वरंढ्यात पोंगे खात बसलो.
संध्याकाळी घरी मात्र कहरच झाला. अक्काने आजीला झालेला प्रकार सांगितला.
“कारे... ती पांगळी आहे. तुला हळूहळू चालता येत नाही का?” “तिच्या पायाला बघ किती लागले.” आजी रागाने समजावून सांगत होती.
रागाने “मी काय करू; माझ्या खांद्यावर एवढा लोड देते की माझा खांदा दुखू लागतो. माझा शर्ट खराब होतो. शाळेत जायला उशीर होतो. सर मारतात.” “ती कशी काय पडली मला नाही माहीत.”
मी आत्याकडे रागाने पाहत होतो.
आत्याने पुन्हा केविलवाणा चेहरा करून रडू लागली. पायावर हळद लावली होती. रडून डोळे लाल झाले होते. केस सावरत फ्रॉकच्या बाहीला डोळे पुसत आजीला “तू पण मला पांगळी म्हण. देवाने मला जन्मालाच का घातले. उद्यापासून नाही जाणार मी शाळेत.” म्हणत ढसाढसा रडायला लागली.
तिचा सगळा अवतार पाहून मला तिचा चेहराच बघावासा वाटत नव्हता.
“अगं तू जन्मापासून पांगळी नव्हती गं; तुला कंबरेवर इंजेक्शन काय दिले आणि तुझं हे असं होऊन बसलं” आता आजीही रडायला लागली.
आजी रडता-रडता जुन्या गोष्टी सांगत होती. हॉलमध्ये अक्का, छोटी आत्याचेपण डोळे पाणावले. दोघीही माझ्याकडे रागाने पहात होत्या.
मी त्यांच्याकडे पाहिले न पाहिलेसारखं केलं आणि बाहेर खेळायला निघून गेलो.
आत्या चांगलीच माझ्या डोक्यात बसली होती. तिने माझ्या खूप तक्रारी घरात सांगून ठेवल्या होत्या. तिला चिडवण्यासाठी तिचे केस ओढायचो, तिला मुद्दाम धक्का देऊन पाडायचो, तिने काढलेली रांगोळी पुसून टाकायचो. यावरून घरातल्यांची पुन्हा बोलणी खायचो.
आत्या शाळेत जाणार नाही म्हणून मी खूप खूश होतो. ‘चला तिला घेऊन जायचा नि आणायचा ताण मिटला’. मस्त एकटा शाळेत जायला लागलो. नगरपालिकेचा भोंगा वाजायच्या आत मी शाळेत पोहोचायचो.
असे काही दिवस चालू राहिले. आत्या दिवसभरात देवपूजा करणे, हॉल आवरणे, झाडणे. झाडांना पाणी घालणे. सडा-रांगोळी करणे. संध्याकाळची दिवाबत्ती करायची. असा तिचा नित्यक्रम बनला. माझी आत्याशी तेव्हापासून कट्टी झाली होती. संध्याकाळी रामरक्षा म्हणण्यासाठी आम्ही सगळे भावंड एकत्र जमायचो. त्यात एकाने म्हणायचे. त्याच्या मागून बाकीच्यांनी म्हणायचे. आत्याची सांगण्याची वेळ आली की ती बोलताना अडकायची. मी मुद्दाम मागेपुढे म्हणायचो. मग बाकीचे माझ्यावर ओरडायचे.
एकदा ती आजारी पडली. जेवण-पाणी सगळे कमी झाले. खूप बारीक दिसायला लागली. अंथरुणात पडून रहायची. काही दिवसांनी वेड्यासारखं करू लागली. अंथरुणात गोल-गोल फिरायची. एकदा तर लखमापूरच्या बाबांची टोपी आडवी करून त्यांच्या गालात जोरात मारली होती. तेव्हा तर मीपण घाबरून गेलो. हिने आत्तापर्यंत कधीच कोणाला मारले नाही. याच हाताने माझ्या गालात मारली असती तर...
एक वेळ अशी आली की तिच्या अंगात तुळजापुरची देवी आली “चलाऽऽऽ तुळजापूरला...! तुळजापूरला...! पुरला... पुरला...” अशी जोरात ओरडायची.
आजीने तिला विचारले असता “मी देवी आहे.” म्हटल्याबरोबर तिला उठून खुचवर बसवले. आजीने, काकूंनी तिच्या केसांची वेणी-फणी केली. कुंकू लावले. पाय धुतले, पायाखाली आसन ठेवले. घरातल्या सगळ्यांनी तिला नमस्कार केला. मी आत्याकडे कोपऱ्यात उभा राहून बघत होतो.
तिचे घनदाट काळेभोर केसांची वेणी घालून खांद्यावरून पुढे सोडली होती. कपाळावर ठशठशीत कुंकू, चेहरा गोरापान, लांब नाक, मोठे डोळे. शांत नजरेने पाहात स्मितहास्य करत होती.
आत्या स्पष्ट पण हळूहळू बोलत होती. घरातील सगळेजण एक-एक करत तिच्यापुढे गाऱ्हाणे सांगू लागले. आजीने मलाही बळजबरीने तिच्या पुढे उभे केले. तिच्यासमोर यायला माझी हिम्मत होत नव्हती. कारण मी तिला खूप त्रास दिला होता. आता तर ही देवी झाली आहे. हिने मला शाप दिला तर...
मी पटकन जाऊन तिला नमस्कार केला.
तिने काहीही न बोलता माझे सर्व अपराध गिळून घेतल्यासारखे भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. थरथरणारे शरीर जणू स्थिर होऊन सुखाची विश्रांती घेण्यासाठी तत्पर व्हावे असे काहीसे वाटून गेले. स्मितहास्य करत तिने हळुवार डोळे मिटले. अलगद खुचवर डोके टेकवले.
हळूहळू हॉलमधून सगळे ज्याच्या त्याच्या कामाला निघून गेले. मीही तेथून पळ काढला.
***
एकदा शाळेत जात असताना भरधाव वेगाने एक स्कूटर माझ्या अंगावर आला. माझ्या पायाचा नख उडाला, गुडघ्याला दुखापत झाली. कपडे खराब झाले. जवळच असलेल्या एका मेडिकल वाल्याने माझ्या जखमेवर पावडर, बँडेज लावून घरी पाठवून दिले.
मी उन्हातान्हाचा दप्तराचे ओझे घेऊन लंगडत लंगडत घरी निघालो. शाळा आणि घर अंतर कमी असूनही मला अर्ध्या रस्त्यातून घरी यायला बराच वेळ लागला.
मी घरी परत का आलो म्हणून आईने, आजीने विचारले असता हे असं झालं म्हणून ‘तू रस्त्याने नीट चालला नसशील’ यावरून मलाच बोलले.
दोन तीन दिवस घरीच थांबून घेतले. शाळा नाही म्हणून लंगडत-लंगडत घरातील कामे करत होतो. पोरांबरोबर खेळायचे नाही ओट्यावर बसून रहाण्याची सक्त ताकीद दिली होती.
हॉल आवरणे, झाडणे. झाडांना पाणी घालणे. संध्याकाळची दिवाबत्ती. जे काम आत्या करत होती. ते माझ्याकडे आले. रामरक्षा म्हणत असताना हॉलच्या भिंतीकडे सहज लक्ष गेले. आत्या घरात फिरतांना भिंतीचा आधार घेऊन चालायची. त्यामुळे एका ओळीत काळवंडलेला पट्टा दिसत होता. त्या पट्ट्याने आत्याची आठवण जागी केली.
आत्या ज्या दिवशी गेली त्या दिवशी तिच्या पायावर डोके टेकवताना माझ्या डोळ्यात पाणी नव्हते. मला तिची गयावया काहीच नव्हती. ती चालतांना माझ्या खांद्यावर भार द्यायचा म्हणून त्रास व्हायचा, कविलवाणा चेहेरा करून बसायची म्हणून त्रास व्हायचा, कायम दुसऱ्यांवर अवलंबून रहायची म्हणून त्रास व्हायचा.
त्याचवेळेला माझ्या पायाकडे बघत मलाच प्रश्न केला ‘मग तिचं कुठे चुकत होतं?’
‘तीला स्वतःला त्रास होत असतांना देखिल आनंदाने जगत होती. त्रास तर तूच दिला. तिची प्रत्येकवेळी खोड काढणे, तिची तक्रार करणे. तिची शाळा सुटली, तिचा आनंद हेरावून तूच घेतला. तिला फक्त आधार हवा होता.’
याच गोष्टींमुळे की काय मी अपराधी आहे असे मला वाटायला लागले. मला तिचे स्मरण झाले. आत्या मला क्षमा कर. मी तुला खूप त्रास दिला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा