रात्र बरीच झाली होती. तरीही ऋतिकने मोठी गाडी काढली आणि आम्ही चौघेही घराबाहेर पडलो.
(प्रियंकाने एक विडींग गिफ्ट ऑर्डर घेतली होती. त्या कामासाठी आम्ही चौघेही भिडलो होतो. शक्य तेवढे काम पूर्ण करून फायनल हात दुसर्या दिवशी द्यायचा ठरला. सगळेच थकून गेलो होतो. मग घरी जेवणा ऐवजी बाहेर खाण्याचा प्लॅन बनवला गेला.)
मी प्रियंका आणि ऋतिकच्या व्यावसायिक गप्पा ऐकत होतो. या दोघांनी आर्ट अॅण्ड क्राफ्टचा व्यवसाय सुरू केला होता हे मला माहित होते. पण त्यांचे काम नेमके कसे चालते? त्यात काय काय करायचे असते? काय प्रोडक्ट आहे? हे मला जाणून घ्यायचे होते. मी याच गोष्टीसाठी समजून घेण्यासाठी गोव्याला आलो होतो.
आज तिचे वर्करूम जेव्हा पहात होतो. आर्ट अॅण्ड क्राफ्टमधील एकही गोष्ट आजपर्यंत पाहिली नव्हती ती मी इथे बघत होतो. इतक्या सुंदर, मोहक आणि मन वेधून घेणार्या वस्तु होत्या. पेपर्स, कलर्स, लाकूड, लोखंड, कॉपरपासून अशा भरपूर वस्तू, गिफ्ट अजून कशा-कशापासून कायकाय तयार केले होते. बापरे... खरंच असे वाटत होते की ही दुनियाच खूप निराळी आहे. मनाने केलेली कल्पना ती प्रत्यक्षात समोर पहात होतो. असं वाटत होते की या कल्पनेतून बाहेर पडूच नये. माझ्यासाठी वेळ थांबला होता.
गाडीत गप्पा मारता-मारता एका खाऊ गल्लीत आलो. गाडी पार्क करून नाष्टा ऑर्डर केला.
“आण्णा तुला गाडीतून जो समुद्रकिनारा दाखवला तो हा स्पॉट आहे.” ऋतिक
खाऊगल्लीच्या थोड्याच अंतरावर समुद्रकिनारा होता. मनसोक्त नाष्टा करून झाल्यावर आम्ही त्या स्पॉटवर पोहोचलो.
मुख्य रस्त्याच्याकडेला फुटपाथ नंतर एक पार्किंग झोन होता. तेथून पुढे बॅरेकेट लावलेले होते आणि त्याच्या पुढे काळाकुट्ट अंधार होता.
“पण मला तर काहीच दिसत नाहीये...” मी
“भैया, आज हाईमास्ट बंद है, और ओहोटी के कारण पानी अंदर चला गया है। और रात भी काफ़ी हो गई है। हम कल फिर आएंगे और आपको समुंदर दिखाएंगे।
प्रियंकाने असे सांगितले आणि आम्ही समुद्र किनार्याकडे न जाता माघारी फिरलो.
आम्ही सर्व गाडीत बसलो. मी, यजु मागे बसलो होतो. आमच्या दोघांचे ट्युनिंग चांगले जमले होते. त्याला हिंदी, इंग्रजी छान बोलता येत होते. मी मात्र हिंदीतही अडकत होतो. यजु लहान पण खुप हुशार होता. शिवाय आईला वर्करूममध्ये मदतीला सरसावायचा.
आम्ही आज कायकाय कामे केली त्याची यादी प्रियंका ऋतिकला सांगत होती. दोघांनीही माझे कौतुक केले.
(यांच्या मोठ्या भावाला काम कसे सांगावे म्हणून प्रियंका सुरूवातीला काम सांगताना कचरत होती. पण मी स्वतः आग्रह करत काम सुरू केले. एका तासाभरात प्रियंकाने माझ्या कामाचा अंदाज बांधला. त्याची ही दोघांकडून मिळालेली पावती होती.)
घरी आल्यावर भाऊने कॉफी करायला ठेवली. त्याच उत्साहाने कॉमप्युटर चालू करून सॉफ्टवेअर शिकवायला घेतले. खरंतर पहाट व्हायला काही तासच उरले होते. तरीही भाऊने कॉफी घेवोस्तर सॉफ्टवेअर टीप्स देवून क्लास सुरू केला.
थोड्यावेळाने मीच भाऊला झोपायला सांगून त्याला काढून दिले. मला आता लगेच झोप लागणार नव्हती म्हणून मी हळूच दरवाजा उघडून रूम बाहेर पोर्चमध्ये चकरा मारू लागलो.
पहाट जसजशी उजाडत होती तसतशे आजूबाजूचा परिसर दिसायला लागला. बंगल्याच्या गच्चीवरच भाऊची मोठी एैसपैस रूम असल्याने हवेशीर वातावरण होते. बंगल्याच्या आजुबाजुलाही निसर्गरम्य वातावरण होते. उंचावरून लांब-लांबपर्यंतचे दृष्य खुप सुंदर दिसत होते. बंगल्याला लागून मुख्य रस्त्यालगत ऋतिकने गाडी लावलेली होती. बंगल्याच्या बाहेरून लोखंडी जिना डायरेक्ट गच्चीवर काढून दिलेला हेाता.
कुणी उठल्याचा आवाज झाला. म्हणून मी पटकन आत येवून माझ्या जागेवर आडवा झालो.
ऋतिक सकाळीच उठून तयारपण झाला होता. देवपुजा करून ऑफिसला निघायची तयारी होती.
नंतर माझा डोळा केव्हा लागला काही समजले नाही. त्या कावळ्याच्या आवाजाने जाग आली. किचनच्या खिडकीतून किचनओट्यापर्यंत तो कावळा रोज यायचा. प्रियंकाला त्याची चाहूल लागलीच होती. तिने पटकन त्याला खाण्यासाठी काहीतरी दिले.
यथासावकाश माझी, यजूची सकाळची आंघोळ, चहापाणी करून आम्ही रेडी झालो होतो.
घराच्या दारापुढे एका उंच खांबावर पक्षांसाठी घरटे तयार केले होते. यजुने पक्षांना खाण्यासाठी त्या घराट्यात काही पदार्थ नेवून ठेवले.
थोड्यावेळाने कुठुन इतके कावळे तेथे जमतात की बस्स... गंगेवर पितरांच्या वेळेस ऐवढे कावळे पाहिले नसतील तेवढे कावळे तिथे जमा व्हायचे. त्यांच्या कावकावाने परिसर कर्णकर्कश व्हायचा.
ती सर्व गम्मत पाहून आम्ही तिघे कालच्या कामाला लागलीच भिडलो.
ऑर्डर देण्यासाठी तयार झाली होती. होताकरता संध्याकाळ झाली होती. तेवढ्यात ऋतिक घरी आला. त्याने त्याच उत्साहात जॉबवर फाईनल हात मारून ऑर्डर गाडीत भरली.
“अण्णा आज तुला समुद्र दाखवतो.” ऋतिक
कदाचित ऋतिक आणि प्रियंकाचा काही प्लॅन झाला असावा. मी अंदाज बांधला.
आम्ही तिघे गाडीत बसलो. दोघेही बारीक आवाजात काही सिरियस गप्पा करत होते.
मला आज समुद्र जवळून पाहता येईल याच कल्पनेने मी भारावून गेलो होतो.
मी ऋतिकला गाडीच्या रिअर व्ह्यू आरशामध्ये पहात होतो. चेहेर्यावर कायम उत्साह, सकाळची देवपूजा, ऑफीसचे काम, घरी प्रियंकाला ऑर्डरसाठी मदत, मी पाहुणा म्हणून मला गोवा फिरवणे, सॉफ्टवेअर शिकवणे अशा बर्याच गोष्टी हसत, आनंदाने करत होता. दुपारीसुद्धा तो आणि त्याचा मित्र जेवायला घरी आला तेव्हा ऑफीसमधील मस्त गमती सांगत जेवण करून ऑफिसला निघून गेला होता.
ऑर्डर ज्या ठिकाणी द्यायची होती ती पोहोचवली. ऑर्डर क्लाईंटला आवडली होती. ते दोघेही खूप खूश होते.
ऑर्डर देवून मी जेव्हा गाडीत बसणार तर ऋतिकने मला पुढे बसायला सांगितले आणि प्रियंका मागे बसली. मला काही समजले नाही.
आता गाडीतला माहोल बदलला. गाडीमध्ये इंग्लिश गाणे चालू झाले. माझे पाय त्या गाण्यांवर थिरकायला लागले. आम्हाला ज्या बीचवर पोहचायचे होते. तेथे मुख्य रस्तापर्यंत दोन्ही साईडने लोकांची गर्दी दिसायला लागली.
ऋतिकने माझ्या गुडघ्यावर हात ठेवून हळूच “अण्णा काचा खाली कर. चष्मा पुसून घे. तुझे हार्डबिट्स वाढतील.”
मी गाडीची काच खाली केली.
“नई नई नई नई मुझे लगा ही था, के तुम इस बीच पे ले आओगे । मुझे ये बीच बिलकुल भी अच्छा नही लगता । भैया को भी अच्छा नही लगेगा, तुम गाडी बस घुमालो ।”
खिडकी बाहेरचे जे दृश्य मी बघत होतो. ते फक्त थिएटरमध्येच बघितले होते. रसत्याच्या दोन्ही बाजुनी सुंदर देशी-विदेशी तरुण-तरुणी, मुले-मुली, म्हातारे, अबालवृद्ध कमी कपड्यांमध्ये नवयौवनात न्हाऊन निघाव्या अशा दिसत होत्या. बनियन, बरमुडा, शॉटर्स, ब्रा-निकर, कुणी अर्धे उघडे फिरतांना दिसत होते. डोक्यावर गोल मोठी कॅप, कानात हेडफोन, हातात मोबाईल, पायात स्लीपर, गळ्यात, मनगटात, बोटात वेगवेगळी आभुषणे घातलेला पेहेराव, कोणाच्या अंगावर गोंदवलेले असे लोक दिसत होते. प्रत्येकजण एन्जॉय करत होता.
परदेशातील लोकांची गोरी तुकतुकीत स्कीन रात्रीच्या अंधारात स्पष्ट दिसत होती. मी डोळे मोठे करून पहात होतो. कुठे-कुठे बघू? कोणाला बघू? असं माझं झालं होतं. माझं अर्ध लक्ष खिडकीच्या बाहेर आणि अर्ध लक्ष गाडीच्या रिअर व्ह्यू आरशामध्ये होते. कारण मागे प्रियंका बसली होती. तिची नजर चुकवून मी बाहेरचे दृश्य बघत होतो. ऋतिक पुन्हा पायावर थाप मारत “अण्णाऽऽऽ... कसं वाटतंय?”
मी वरवर “पण अरे प्रियंका म्हणते... गाडी इकडे नको घेऊ. तर आपण का जातोय तिकडे? दुसरीकडे जाऊ या ना...?”
(मी मनातल्या मनात म्हटलं ‘तू गाडी अशीच हळू चालु दे. मी फक्त बघतो.’ अक्का)
“काय अण्णा तू पण... तू गोव्याला आला आहे छान एन्जॉय कर...” ऋतिक
“अरे एन्जॉय करने के लिए यही बीच मिला तुम्हे! । चलो ऊस तरफचलते है । तुम बस गाडी घुमा लो ।” प्रियंका ऋतिकला रागावून म्हणत होती.
नाही हा करत ऋतिकने गाडी फिरवली. आता मात्र गाडी जोरातच काढली आणि थेट दुसर्या बीचवर गाडी आणली.
गाडी पार्क करून चपला गाडीतच ठेवल्या. बराच वेळ पायी चालत अखेर मला त्या अथांग समुद्राचे दर्शन झाले. कधी न पाहिलेला समुद्र आज प्रत्यक्ष पहात, अनुभवत होतो. मी रेतीत भरभर चालत समुद्र किनारी पोहोचलो. तिकडून समुद्राची एक मोठी लाट माझ्या दिशेने धावत येत होती. जणू आम्ही दोघे भेटण्यासाठी आतुर झालो होतो. लाट जशी जवळ आली तशी पटकन हाताची ओंजळ करून तिला हातात घेतले. पायावर पाणी आदळले. समुद्राचे पाणी उडाल्याने अंगावर रोमांच उठला. लाटांचा आवाज, पाण्याचा वास, पायावरून रेती घरंगळत जात असतांना अंगात गुदगुल्या व्हायच्या. हे सगळेच माझ्यासाठी नवीन, अप्रुप होते.
ऋतिक-प्रियंका माझ्याकडे बघतच राहिले. “भैय्या आपने कभी समुंदर नही देखा ।” प्रियंका
“नही मै पहिली बार देख रहा हू ।”
“अण्णा जाय एक चक्कर मारून ये.” ऋतिक
ते तिथेच थांबले. मी समुद्राच्या किनार्याने पुढे पुढे जात होतो. मी समुद्राच्या आत खेचल्या जात होतो. मला चक्कर आल्यासारखे वाटत होते. मला भीती वाटत होती. बीचवर अंधार होता. कुठुन लांबून एक लाल लाईट फिरत यायचा परत जायचा. समुद्राच्या मोठमोठ्या लाटा अंगावर भराभर येत होत्या. लोक आनंद घेत होते. कोणी गिटार घेऊन गाणे म्हणत होते. कडेला एक टेंट बांधलेले छोटे खाणी हॉटेल असावे. तिथे छोटे छोटे बाकडे ठेवले होते. लोकं मस्त बसून कुणी ड्रिंक करत होते, कुणी सिगरेट ओढत होते, कुणी फोटो काढत होते. सगळेच लोकं ग्रुप-ग्रुपने बसलेले होते. तरुण-तरुणी स्विमिंग ड्रेसमध्ये पाण्यात उड्या मारत होते, पडत होते.
मी लोकांच्या मजा आणि समुद्र निहाळत पुढे चालत होतो. हे सगळे बघत असताना मलाही हलकं-हलकं झाल्यासारखे जाणवत होते. मनावरचा ताण कमी झाला होता.
या अथांग समुद्रात बोट घ्यावी आणि दूरवर निघून जावे असे वाटत होते.
“अण्णाऽऽऽ तू खूप पुढे आलाय. आपली गाडी मागे राहिली. अजून असाच चालला असता तर पुढचा बीच लागला असता.” ऋतिक चेष्टेत बोलत होता.
“मला वाटलेच होते तू हरवून जाशील.” ऋतिक आणि प्रियंका माझा मागोवा घेत आले होते.
“ऋतिक मला फार भारी वाटते रे. माझे गच्च डोकं सॉलिड रिकामे झाल्यासारखे वाटत आहे.”
“क्या बात है अण्णा. याला म्हणतात गोवा. चल तुला अजून हलका हलका, कुलकुल करतो” ऋतिक
गप्पा मारत मारत आम्ही गाडीकडे येत असताना रस्त्याच्याकडेला मोठमोठे लाइटिंग केलेली रंगीबेरंगी दुकाने सजलेली दिसली. एका ठिकाणी अंगावर काढलेले टॅटूचे बॅनर लावलेले होते. त्याच दुकानात अंगात कलर बनियन, हाफ जीन्स, मनगटात गोल्डन ब्रेसलेट, भारदस्त दंडावर टॅटू काढलेला, गळा भरलेला, केस फ्लॉवर पॉटसारखे मोठे, ताट झालेले. काळाकुट्ट जाड धिपाड्ड व्यक्ती त्याच्या काऊंटरवर दोन्ही हात टेकून दोन्ही खुब्यात मान घालून अत्यंत कामूक झालेल्या नजरेने एका ठिकाणी एक टक स्थिर झाला होता.
काही फॉरेनच्या मुली गोल मोठ्या कॅप असलेल्या दुकानात उभ्या होत्या. त्या सर्व एखाद्या हिरोईनसारख्या सुंदर, देखण्या होत्या. स्त्री लावण्य त्यांच्यात कुटुन-कुटुन भरलेले होते. ते बहुतेक फोटोशूटसाठी आलेले असावेत. कारण खूप मोठा क्रु त्यांच्या बरोबर होता. त्यांचे मोकळे सोडलेले सोनेरी केस, मांजरीसारखे चमकणारे डोळे, ओठांवर लाईट लिपस्टीक असावी, सगळ्यांच्या अंगात एकसारखा पुरुषी पांढरा बनियन घातला होता. त्यांचे वक्ष स्थळ अर्धे अपूर्ण पारदर्शी स्पष्ट दिसत होते. खाली हाफ शॉर्ट टाईट जीन्स, मांडीवर दोरेसुटलेले, पायात जाड स्लीपर घातलेली होती.
“अण्णा आपल्याकडे टेन्ट आहे मी तो लावू का?” ऋतिकने फिरकी घेतली.
मी दचकलोच... मला थोडा वेळ विसरच पडला. दोघेही कदाचित माझ्या विषयीच बोलत असतील. ‘देखो भैया क्या देख रहे है’ वगैरे-वगैरे.
मी शरमेने मान वळवली नि चालता झालो.
भाऊने गाडीत बसल्या बसल्या “अण्णा काय घेणार”
“आत्ता काही खायची इच्छा नाहीये.” मी
“अण्णा... मी खायची नाही पियाची म्हणतोय!” “तू थांब मला माहित आहे तू काय घेतो ते” ऋतिक
भाऊने गाडी डायरेक्ट वाईनशॉपसमोर उभी केली. “ऋतिक गाडीमध्ये प्रियंका आहे.” मी
“तू टेन्शन नको घेऊ. तिला माहिती आहे.”
“तू गोव्याला आलाय आण्णा, आत्ताच तू बोल्ला ना. डोकं हलकं झालंय. मग आता कुलकुल कर. दुनिया गई तेल लेणे. तू फक्त एजॉय कर.”
भाऊने असा पंप मारला की मी डायरेक्ट “किंगफिशर स्ट्राँग मोठी एक”
ऋतिक टंणकन उडाला आणि जोरात हसून “ये हुइना बात. एक से क्या होगा दो लेंगे ।”
बाटली, खाण्यासाठी चकणा, त्यांच्यासाठी कोल्डड्रींक असे सामान गाडीत घेतले. आता मी मागच्या सीटवर आणि प्रियंका पुढे बसली होती.
गाडी एका मोठ्या पुलावरून सुनसान रस्त्यात घातली. मी त्यांना कोल्ड्रींग देवून माझाही ग्लास भरला.
“अण्णा आरामात घे. काही घाई नाही.” ऋतिक
दोघेही जॉब निमित्त बरेच लांब लांबपर्यंत प्रवास केला शिवाय गोव्यात इतकी वर्ष राहूनसुद्धा त्यांना अंडे, नॉनव्हेज, ड्रिंक असे काहीही चालत नव्हते. ना सवय लावून घेतली. एकदा रात्री मढगाव स्टेशनवरून घरी येत असतांना आम्हाला खूप भूका लागल्या होत्या. रस्ते सामसुम झाले होते. एका गाड्यावर फक्त अंडापाव मिळाला पण त्यांनी त्याही वेळेस काही खाल्ले नव्हते.
मी पहिली बाटली संपून दुसरी सुरु केली. एकीकडे खात होतो. ऋतिक लहानपणीच्या आठवणी जाग्या करत गप्पा मारत होता. मी काचेच्या बाहेरून गोव्यातील जुन्या पद्धतीचे इंग्लिश घरे निहाळत होतो. आकाशात धुसर चंद्र दिसत होता. रस्ते सामसुम झाले होते. गाडी अगदी हळुहळु चालत होती. गाडीत बारीक आवाजात इंग्लिश गाणे चालू होते. मीही गाण्याबरोबर डुलत होतो. ठेका धरत होतो.
गप्पा मारता मारता प्रियंकाने मुख्य विषयात हात घातला होता. “भैय्या आपके पास जो कला है उसकी जरुरत यहाँ है । मै आपकी घर की परशानी समज सकती हू । मुझे इन्होनेही कहा था के भैय्या पहेले ऐसे नही थे । वो हालात के वजह से बदल जुके है ।”
“हो अण्णा, तू बदलला आहे. तुझी खरी गरज इथे आहे. तू विचार कर...” ऋतिक बोलत होता मी एैकत होतो. खरंतर दोघेही माझ्या हिताचेच बोलत होते. कारण व्यावसायिक आणि माझ्या आयुष्याच्या दृष्टीने आमुलाग्र बदल होणार होते. आणि त्याचा निर्णय मला घ्यायचा होता.
मी वयाने मोठा जरी असलो तरी अनुभवाने ते मोठे होते. आमची गाडी फिरत-फिरत मांडवा नदीपाशी आली. कसीनो जहाज जेथे उभा होता तेथे गाडी थांबवली. नदीवर दगडी तटबंदीकेलेली गोल बुरूजावर जेथे लोकांना बसण्याची व्यवस्था होती तेथे येवून बसलो. विषय पुढे चालू ठेवला.
मी नोर्मल होतो. दोघांच्या बोलण्यानंतर मी जमिनीवर आलो. दोघांचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतले. गाडीत बसलो, घरी आलो आणि झोपून घेतले.
(माझा प्रत्येक दिवस गोव्यात खुप छान, मजेत, आनंदात जात होता. काही कालावधीसाठी का होईना मला घरच्यांचा, टकूचा, ऑफिसचा, तेथील कामकाज, टेन्शन, दडपण, धावपळ, मानसिक ताण या सर्व गोष्टी विसरून गेलो होतो. गोव्याच्या वातावरणात मिसळून गेलो होतो. इथल्या हवेत एक वेगळीच जादू होती.)
***
काही दिवसांनी...
“भैय्या आज स्टॉल लगाना है । कुछ तयारी करनी है । और शाम को पार्टी मे जाना है ।” प्रियंकाने चांगली बातमी दिली.
दिवसभराचे सगळे कामं उरकून स्टॉलवर लागणारे सर्व सामान पॅक करून आम्ही रेडी झालो. संध्याकाळी ऋतिकने आल्यावर गाडीत सामान भरले.
माझ्या आवताराकडे पाहून त्याने त्याचे कपडे मला घालायला दिले. आम्ही तिघे एका कॅफेमध्ये आलो. गेल्यावर स्टॉल लावला. गोव्यातील पब्लिक आणि परदेशी पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली होती.
रोज नवीन चेहेरे, त्यांची आवड-निवड, पेहेराव, कोण कुठुन आलेले. भाषा, रंग, रूप असे सर्व काही बघत होतो. पण मला कधी कंटाळा नाही आला. अगदी आनंदाने करत होतो.
स्टॉल लवकर बंद करून पॅकींग करून घेतले. सामान गाडीमध्ये भरले. ज्या हॉटेलमध्ये पार्टी होती. तेथे जायला निघालो.
गाडीच्या रिअर व्ह्यू आरशामध्ये “अण्णा तु डान्स करशील ना?” ऋतिक
“नाही” मी
“तू तर गाडीत डान्स करत होता.” ऋतिक
“केव्हा” मी
“तू ड्रिंक करत असतांना मी तुला आरशातून पाहिले होते.” ऋतिक
“त्याला काय डान्स करणं थोडी म्हणता.” मी
हॉटेलमध्ये आल्यावर आमची इन्ट्रीच टाळ्या वाजवून झाली. कारण ऋतिकसुद्धा ग्रुप डान्सर होता आणि यात ग्रुपडान्समध्येही डान्स करणार होता. म्हणून तो मला ‘डान्स करशीला ना!’ म्हणत होता.
कपल डान्स जेव्हा सुरू झाला त्यात ऋतिक आणि प्रियंका डान्स करत होते.
मी एकटाच त्यांची नक्कल करत हातपाय हलवत होतो.
एका सुंदर मुलीने “कॅन यु डान्स विथ मी” मला विचारे.
“मुझे डान्स नही आता” मी शरमेने त्यांना नाही म्हणालो.
(मनात उकळ्या फुटत होत्या. ‘एक सुंदर मुलगी तुला स्वतःहून म्हणतेय की माझ्याबरोबर डान्स कर’ तर तू का आढेवेढे घेतोयेस?)
त्यांनी स्वतःहून दोन्ही हात पुढे केले.
मग मी मागे हटलो नाही. त्यांचा हात हातात घेतला. त्यांच्या प्रत्येक स्टेपवर माझी स्टेप पडत होती. त्या माझ्याकडे पहात होत्या. मी त्यांच्याकडे. आम्ही बराच वेळ डान्स करत होतो. असाच डान्स कंन्टीन्यू चालू रहावा असे वाटत होते. मला भारी वाटत होते. तेवढ्यात गाणे बंद झाले. डाळ्यांचा कडकडाट झाला. आम्ही एकमेकांना डान्सची कमेंट देत टाळी दिली. त्यांचे आभार मानले. ऋतिक प्रियंकानेही कौतुक केले.
ऋतिकने ओळख करून दिली तेव्हा समजले की त्या भाऊच्या डान्स पार्टनर होत्या. त्यांनी मला डान्स करतांना पाहिले.
तेथून आम्ही घरी यायला निघालो. मी गाडीत मागे बसलो होतो. भाऊने गाडीत हॉटेलमधलेच गाणे लावले. मी डोळे बंद करून हॉटेलमधला प्रत्येक सीन आठवत होतो. मी त्यांच्याबरोबर डान्स करत होतो. आणि तेवढ्यात माझा फोन वाजला.
ऋतिकने गाणे बंद केले.
“टकूची तब्येत बरी नाही. तुम्ही ताबडतोब घरी या” बायको.
गाडीच्या काचा बंद असल्याने फोनचा आवाज बाहेर दोघांना स्पष्ट ऐकू गेला.
टेप बंद करून दोघांनी विचारणा केली.
रिकामे झालेले डोके गच्च झाले. घर, टकू, ऑफिस, टेन्शन, दडपण, मानसिक ताण या सर्व परत आल्या. काही दिवसांसाठी बदललेला आण्णा परत पुर्ववत झाला. आमची गाडी त्याच समुद्र किनार्याजवळून जात होती जिथला हायमास्ट बंद होता. आणि मला फक्त काळाकुट्ट अंधार दिसत होता.
ऋतिक मला रिअर व्ह्यू मधून पहात होता. माझीही नजर न कळत त्यांच्याकडे गेली.
मला आता गरम व्हायला लागले होते. खिडकीची काच खाली केली. रस्ते सामसूम झाले होते. समोर माडवा नदीत कसीनो जहाज उभे होते. मनाशीच हसत ‘या अथांग समुद्रात बोट घ्यावी आणि दूरवर निघून जावे.’
छ्या कसलं काय? डबक्यातलं बेडूक परत डबक्यातच जाणार होते.
गाडी घरी आली. प्रत्येकाने गाडीतले सामान घेवून जड पावले टाकत जिना चढलो. माझ्यामुळे त्या दोघांचाही उत्साह मावळतीला गेला होता.
घरी आल्यावर भाऊने कॉफी तयार करायला ठेवली. त्याच उत्साहाने कॉमप्युटर चालू करून सॉफ्टवेअर शिकवायला घेतले. कॉफी मला दिली. माझा मुड बदलवण्याचा प्रयत्न करत होता.
“उद्याच तिकट काढून घेवू. तू टेंशन काही घेवू नको. आपण नेक्स्ट टाईम प्लान करू”
मी फक्त शांत बसून राहीलो.
???
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा